You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
येमेन: नवीन सरकार बनताच विमानतळावर स्फोट
येमेनच्या दक्षिणेकडील एडन शहरातल्या विमानतळावर स्फोट झाल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत.
नवीन सरकारच्या सदस्यांना घेऊन येणारं विमान शेजारच्या सौदी अरेबियाहून विमानतळावर पोहोचताच स्फोट झाल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांत अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ सुखरूप असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी हा हल्ला दहशतवादी कट असल्याचं म्हटलं आहे.
इरियानी यांनी ट्वीट केलं की, "आमचं मंत्रिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे आणि इराणच्या पाठिंब्यानं विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही आमच्या जबाबादारीपासून पळ काढणार नाही. इतकंच काय तर इतर येमेनी लोकांच्या तुलनेत आमचं जीवन अधिक मौल्यवान नाहीये. ईश्वरानं मृतांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो."
2015मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धापासून येमेन विनाशाच्या उंबरठ्यावर आहे..
हूती विद्रोहींच्या देशातील बहुतेक भागावर नियंत्रण आणि सौदी समर्थित राष्ट्रपती अब्दूरब्बू मंसूर हादी यांना देश सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतर सौदी अरबच्या नेतृत्वातील सैन्यानं येमेनच्या युद्धात हस्तक्षेप केला होता. तेव्हापासून येमेनमधील परिस्थिती आणखीनच चिघळत आहे.
या युद्धात आतापर्यंत 1 लाख 10 हजार जणांनी जीव गमावला आहे.
इतकंच काय तर हजारो नागरिकांचा मृत्यू अशा कारणांमुळे झाला आहे, तो कदाचित टाळता आला असता. यात कुपोषण, आजारपण आणि भूकबळींचा समावेश आहे.
बुधवारच्या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे. ज्यात स्फोट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. या स्फोटाच्या काही क्षणापूर्वीच नवीन कॅबिनेटचे सदस्य विमानतळारवर पोहोचले होते.
मंत्र्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली होती. पण स्फोटानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर तर काही वेळ गोळ्या चालण्याचा आवाजही आला.
AFP वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीनं सांगितलं की, त्यांनी कमीतरमी दोनदा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला.
असं असलं तरी अद्याप हल्ल्याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. सौदीमधील टीव्ही चॅनेल अल-हदथनं एक व्हीडिओ जारी करत म्हटलंय की, एक मिसाईल टरमॅकशी धडकलं आणि स्फोट झाला.
यापूर्वी ऑगस्ट 2019मध्ये अदानमधील एका सैन्य कवायतीदरम्यान हूती विद्रोहींच्या मिसाईल हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला होता.
आयसीआरसी (इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस)नं म्हटलं की, बुधवारच्या हल्ल्यात आमचा एक सदस्य मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहे.
येमेनमधील न्यूज वेबसाईट अल-मसदरच्या ऑनलाईन रिपोर्टनुसार, श्रम मंत्रालयाचे सचिव यास्मीन अल अवधी यांचा मृत्यू झाला आहे. सोबत युवक कल्याण उप-मंत्री मोनेर अल-वज़ीह आणि परिवहन मंत्री नासिर शरीफ जखमी झाले आहेत.
हल्ल्यानंतर पंतप्रधान मइन अब्दुलमलिक सईद आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला कडेकोट सुरक्षेत बाहेर नेण्यात आलं.
"मी आणि माझं मंत्रिमंडळ एडनमध्ये आहोत आणि सुरक्षित आहोत, असं सईद यांनी ट्वीट करत म्हटलं.
त्यांनी लिहिलं, "दहशतवाद्यांनी एडनमधील विमानतळाला लक्ष्य केलं. येमेनविरुद्धच्या युद्धाचा हा भाग आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)