You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत वि. ऑस्ट्रेलिया टेस्ट: मेलबर्नच्या ग्राउंडवर याआधी भारताने मिळवलेले तीन ऐतिहासिक विजय
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आठवडाभरापूर्वी 36 धावात गारद होणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक विजय साकारला. भारतीय संघाने चौथ्या दिवशी 8 विकेट्सनी विजय साजरा केला. हा या ग्राउंडवरील चौथा ऐतिहासिक विजय आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला सांस्कृतिक वारसा आहे. एमसीजीवर मॅच जिंकणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. टीम इंडियाने याआधी इतिहासात या मैदानावर तीन वेळा विजय मिळवला आहे. या तीन विजयांचा घेतलेला आढावा.
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहरातल्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड स्टेडियमवर होणारी टेस्ट मॅच बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखली जाते.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची प्रेक्षकक्षमता एक लाखाएवढी आहे. या मैदानाच्या परिसरात क्रिकेटचा वारसा जपणारं संग्रहालयही आहे. क्रिकेटच्या बरोबरीने या मैदानावर अन्य खेळांचे सामनेही होतात.
चंद्रशेखर आणि गावस्कर चमकले
30 डिसेंबर 1977 - 4 जानेवारी 1978 - 222 धावांनी विजयी
भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या विजयाचं श्रेय चंद्रशेखर आणि गावस्कर या दुकलीला जातं. चंद्रशेखर यांनी पटकावलेल्या 12 विकेट्स आणि गावस्कर यांनी झळकावलेलं शतक यांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियातला पहिलावहिला विजय मिळवला.
बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारला.
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीइतकंच केरी पॅकर लीगला या विजयाचं श्रेय जातं. आताच्या घडीला ट्वेन्टी-20 लीगचं जगभर पेव फुटलं आहे. मात्र 80च्या दशकात केरी पॅकर यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना राबवली.
ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू, डेनिस लिली तसंच अन्य महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळले नाहीत. भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीच्या दोन टेस्ट गमावल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावत बाजी मारली.
भारतीय संघाने 256 धावांची मजल मारली. मोहिंदर अमरनाथ यांनी 72 तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी 59 धावांची खेळी केली. चंद्रशेखर यांनी घेतलेल्या 6 विकेट्सच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 213 धावांत गुंडाळला. भारताला 43 धावांची आघाडी मिळाली.
लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 343 धावा केल्या. 387 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 164 धावांतच गडगडला. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावातही 6 विकेट्स पटकावल्या.
विश्वनाथ यांचं शतक, कपिलच्या पाच विकेट्स
7 ते 11 फेब्रुवारी 1981- 59 धावांनी विजयी
गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 237 धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांना कोणाचीही खंबीर साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली यांनी 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 419 धावा करत मोठी आघाडी मिळवली. अॅलन बॉर्डर यांनी 124 धावांची शतकी खेळी साकारली, ग्रेग चॅपेल यांनी 76 तर डग वॉल्टर्स यांनी 78 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने 324 धावा केल्या. चेतन चौहान यांनी 85 तर सुनील गावस्कर यांनी 70 धावांची खेळी केली. गावस्कर यांना LBW देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.
आऊट नसल्याचं वाटल्याने गावस्कर यांनी चौहान यांच्या साथीने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. गावस्कर यांनी डाव आहे त्या स्थितीत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र व्यवस्थापक सलीम दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली.
ऑस्ट्रेलियाला 143 धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले. मात्र कपिल देव यांनी 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विश्वनाथ यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आला.
बुम बुम बुमराह
26 ते 30 डिसेंबर 2018
दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी विजयाचा पराक्रम रचला होता. या विजयात मेलबर्न इथला विजय खास असा होता.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आणि 443 रन्सची मजल मारत बॅट्समननी हा निर्णय सार्थ ठरवला. चेतेश्वर पुजाराने 481 मिनिटं खेळपट्टीवर ठाण मांडत 106 रन्सची संयमी खेळी केली. पर्दापणाची संधी मिळालेल्या मयांक अगरवालने 76 रन्सची खेळी केली होती. कर्णधार विराट कोहलीने 82 रन्सची खेळी केली होती. रोहित शर्माने नाबाद 63 तर ऋषभ पंतने 39 धावांची वेगवान खेळी केल्याने भारतीय संघाला चारशेचा टप्पा ओलांडता आला.
जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा डाव 151 रन्समध्येच गुंडाळला. बुमराहने डावखुऱ्या शॉन मार्शला टाकलेला स्लोअर वन आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. भारतीय संघाला .. रन्सची आघाडी मिळाली.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 8 बाद 106 रन्सवर डाव घोषित केला. मयांक अगरवालने 42 तर ऋषभ पंतने 33 रन्सची खेळी करत भारताची आघाडी वाढवली. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने सहा विकेट्स घेतल्या. या डावात भरवशाच्या विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला भोपळाही फोडता आला नाही तर अजिंक्य रहाणे एका रनचं योगदान देऊन तंबूत परतला होता.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 399 रन्सचं लक्ष्य ठेवलं. पॅट कमिन्सने 63 रन्स करत बॅटिंगमध्येही योगदान देत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव 261 रन्समध्येच आटोपला. भारतीय संघातर्फे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
मॅचमध्ये 9 विकेट्स घेणाऱ्या बुमराहला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या मॅचसाठी भारतीय संघाने मयांक अगरवालला पदार्पणाची संधी दिली. हनुमा विहारीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर खेळला होता. त्या मॅचमधले सात खेळाडू आता सुरू असलेल्या मॅचमध्ये आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)