You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : अमेरिकेत आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात
अमेरिकेत फायझर लशीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाली आहे. सोमवारपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना लशीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
ते सांगतात, "लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार आहे."
फायजर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे.
शनिवारी (12 डिसेंबर) अमेरिकेत 3309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार जगभरात एका दिवसात इतके मृत्यू आतापर्यंत कोणत्याच देशात झाले नव्हते.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यापासूनच कोरोना मृत्यूंचं प्रमाण वेगाने वाढत चाललं आहे.
शुक्रवारी फायझरच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देताना FDAनं म्हटलं होतं की, हे पाऊल कोरोनाच्या संकटात निर्णायक ठरेल.
असं असलं तरी ट्रंप सरकारनं लशीच्या वापरासाठी परवानगी द्यावी यासाठी FDAवर दबाव आणला होता.
अमेरिका सरकारच्या लसीकरण अभियानाचे प्रमुख जनरल पर्ना यांनी एका पत्रकार परिषदेत लसीकरण मोहिमेबाबत सविस्तर सांगितलं.
"पुढच्या 24 तासांतच लस शिपिंग कंटेनर्समध्ये पॅक होईल. सोमवारी (14 डिसेंबर) लस 145 ठिकाणी पोहचण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी 425 ठिकाणी तर बुधवारी 66 ठिकाणी लस पोहोचेल, या माध्यमातून या आठवड्यात सुमारे 30 लाख लोकांचं लसीकरण केलं जाऊ शकेल," असं पर्ना म्हणाले.
"कोव्हिड-19 ला हरवणारी लस सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहचेल, याबाबत आपल्याला 100 टक्के खात्री आहे. लस निर्मितीच्या कामात या आठवड्यात बरीच प्रगती झाली. पण जोपर्यंत अमेरिकन नागरिकांपर्यंत ही लस पोहोचत नाही, तोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही," असंही जनरल पर्ना म्हणाले.
फायझर कंपनीच्या कोरोना लशीला ब्रिटन, कॅनडा, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. या देशांप्रमाणे अमेरिकेतही कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी आणि केअर होममध्ये राहणाऱ्या लोकांना देण्यात येईल.
प्राधान्यक्रमातील व्यक्तींनंतर जानेवारी महिन्यात ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. एप्रिल महिन्यापर्यंत ही लस सर्वांना मिळालेली असेल, असं सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)