You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
INDvsAUS : हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीसह टीम इंडियाचा दुसरी ट्वेन्टी-20 आणि मालिकेवर कब्जा
विशेषज्ञ बॅट्समन म्हणून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याच्या 22 बॉलमध्ये नाबाद 42 रन्सच्या खेळीवर टीम इंडियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 मॅचमध्ये सहा विकेट्सनी विजय मिळवला.
या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला 14 रन्सची आवश्यकता होती. हार्दिकने दोन खणखणीत षटकारांच्या बळावर मॅच जिंकून दिली. हार्दिकने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 22 बॉलमध्ये नाबाद 42 रन्सची खेळी केली. श्रेयस अय्यरने 5 बॉलमध्ये 12 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मॅथ्यू वेडच्या वेगवान अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 194 रन्सची मजल मारली.
वेडने 32 बॉलमध्ये 10 चौकार आणि एका षटकारासह 58 रन्सची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर विराट कोहलीने त्याचा सोपा कॅच सोडला मात्र त्याच बॉलवर वेड आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यातील गोंधळामुळे वेड रनआऊट झाला.
वेड आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रनरेट मंदावला. स्टीव्हन स्मिथने 46 रन्सची खेळी केली. मॉइझेस हेन्रिक्सने 26 तर ग्लेन मॅक्सवेलने 22 रन्स केल्या. टी.नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 195 रन्सचं लक्ष्य ठेवलं.
लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला 56 रन्सची सलामी दिली. अँड्यू टायने राहुलला आऊट केलं. राहुलने 30 रन्सची खेळी केली. धवनने 36 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 52 रन्सची खेळी साकारली. संजू सॅमसनने 10 बॉलमध्ये 15 रन्सची आक्रमक खेळी केली. कर्णधार कोहलीने 24 बॉलमध्ये 2 षटकार आणि 2 षटकारांसह 40 रन्सची खेळी केली.
दरम्यान दुखापती, माघार यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली. ऑस्ट्रेलियाने डॅनियल सॅम्सला पदार्पणाची संधी दिली आहे. अनुभवी स्पिनर नॅथनल लियॉनला पंधरा सदस्यीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.
आरोन फिंच- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे रविवारी होत असलेल्या मॅचमध्ये तो खेळत नाहीये. फिंचने खेळण्याची शक्यता 70 टक्के असल्याचं कोच जस्टीन लँगर यांना सांगितलं. पूर्णपणे फिट नसल्याने फिंचला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिचेल स्टार्क- कौटुंबिक कारणास्तव मिचेल स्टार्कने उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. स्टार्कच्या कुटुंबात नातेवाईकांची तब्येत बिघडल्याने त्याने माघार घेतली आहे.
डेव्हिड वॉर्नर- वनडे सीरिजदरम्यान वॉर्नर दुखापतग्रस्त झाल्याने तो ट्वेन्टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. ट्वेन्टी-20 मालिकेनंतर होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर सीरिजसाठी फिट होण्याचं वॉर्नरचं उद्दिष्ट आहे.
पॅट कमिन्स- आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स खेळलेल्या पॅट कमिन्सला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी कमिन्स ऑस्ट्रेलियाचं हुकमी एक्का आहे.
जोश हेझलवूड- पाठीचं दुखणं बळावल्याने फास्ट बॉलर हेझलवूड रविवारच्या मॅचमध्ये खेळू शकणार नाही.
मार्कस स्टॉइनस- साईड स्ट्रेन दुखापत बळावल्याने स्टॉइनस वनडे मालिकेतील दोन मॅच खेळू शकला नाही. ट्वेन्टी-20 मालिकेतील पहिली मॅचही तो खेळू शकला नव्हता. पण रविवारची मॅच तो खेळत आहे.
अॅश्टन अगर- पोटऱ्यांच्या दुखापतीमुळे अगर ट्वेन्टी-20 सीरिजच्या बाहेर गेला आहे.
केन रिचर्डसन- काही दिवसांपूर्वीच लहान बाळाला जन्म देणाऱ्या पत्नीसह राहायचं असल्याने फास्ट बॉलर केन रिचर्डसनने या सीरिजमधून माघार घेतली होती.
कर्णधार फिंच नसल्याने मॅथ्यू वेडकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ट्वेन्टी-20 प्रकारात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणारा वेड अकरावा कर्णधार आहे.
याआधी रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडिन, कॅमेरुन व्हाईट, जॉर्ज बेली, आरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर यांनी ट्वेन्टी-20 प्रकारात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे.
वेड बिग बॅश स्पर्धेत, होबार्ट हरिकेन संघाचा कर्णधार आहे. नियमित विकेटकीपर अॅलेक्स कॅरेला वगळून मॅथ्यू वेडला पहिल्या ट्वेन्टी-20 मॅचमध्ये संधी देण्यात आली. दुसऱ्या मॅचमध्ये वेड विकेटकीपिंग आणि कर्णधारपद अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे.
ऑस्ट्रेलियाने वनडे सीरिज 2-1 अशी जिंकली होती. ट्वेन्टी-20 मालिकेनंतर बॉर्डर-गावस्कर सीरिज होणार आहे. यामध्ये पहिली टेस्ट डे-नाईट असणार आहे. उर्वरित तीन टेस्ट पारंपरिक पद्धतीने खेळवण्यात येतील.
रविवारपासून ऑस्ट्रेलिया ए आणि इंडिया यांच्यातील सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. अजिंक्य रहाणेने शानदार शतकी खेळी करत टेस्ट सीरिजसाठी तयार असल्याचे दाखवून दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)