You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव, किंमत तब्बल...
महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव करण्यात आला आहे. बोली लावणाऱ्याने हे घड्याळ तब्बल 12 हजार पाऊंड्सना खरेदी केले. म्हणजेच, भारतीय रुपयात याची किंमत जवळपास 12 लाखांपर्यंत गेली.
हे घड्याळ मनगटावर घालण्याचं नव्हतं, तर खिशात ठेवण्याचं होतं. ते काही ठिकाणी तुटलंही होतं. मात्र, तरीही प्रचंड किंमत मोजून खरेदी केलं आहे.
इंग्लंडमधील ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्समध्ये शुक्रवारी (20 नोव्हेंबर) या घड्याळाची लिलाव प्रक्रिया पार पडली. हे घड्याळ अमेरिकेतल्या एका खासगी संग्रहकाने खरेदी केल्याची माहिती लिलाव करणारे अँड्र्यू स्टो यांनी दिली.
महात्मा गांधींच्या या घड्याळाला चांदीचा मुलामा आहे. स्विस कंपनीचं हे घड्याळ आहे. स्वत: महात्मा गांधीजी यांनी 1944 साली हे घड्याळ एका व्यक्तीला दिले होते. या घड्याळाची मालकी त्या व्यक्तीच्या नातवाकडे होती.
यंदा ऑगस्ट महिन्यातच गांधींच्या चष्म्याचाही लिलाव ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्सनं केला होता. त्यावेळी चष्मा तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला.
घड्याळाला मिळालेली खरेदी किंमत पाहून अँड्र्यू स्टो यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
या घड्याळाचा इतिहास काय आहे?
हे घड्याळ महात्मा गांधींचे अनुयायी असलेले कारपेंटर मोहनलाल शर्मा यांच्याकडे होते.
1936 साली गांधी नागरी हक्कांसाठी लढणारे नेते आणि कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी दौरे करत होते. त्यावेळी गांधींनीच हे घड्याळ 1944 साली त्यांना दिले होते. मग त्यांनी 1975 साली त्यांच्या नातवाकडे सुपूर्द केले.
हे घड्याळ म्हणजे अहिंसेच्या इतिहासाचा तुकडा आहे आणि तो तुटलेला असला तरी ते त्याच्या आकर्षणात भर घालणारंच आहे, असं अँड्र्यू स्टो म्हणतात.
ऑगस्टमध्ये चष्म्याचा लिलाव
महात्मा गांधी यांचा सोनेरी काड्या असलेल्या चष्म्याचा ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये लिलाव झाला. या ऐतिहासिक चष्म्याला 2 कोटी 55 लाख रुपये इतकी किंमत मिळाली होती.
इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरातील 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स' या लिलाव कंपनीने हा लिलाव आयोजित केला होता. अमेरिकेच्या संग्रहकाने हा चष्मा खरेदी केला होता.
"या चष्म्याला 14 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळू शकेल आणि कंपनीच्या इतिहासात हा सर्वात मोठा लिलाव असेल," असं 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स' या कंपनीचे अधिकारी अँड्य्रू स्टो यांनी लिलावापूर्वी म्हटलं होतं.
या चष्म्याचे मालक ब्रिस्टलच्या मॅनगॉट्सफील्ड भागात राहत. त्यांनी एका अत्यंत साध्या पाकिटात (लिफाफा) हा चष्मा कंपनीला लिलावासाठी पाठवला होता. कंपनीला तो 3 ऑगस्टला मिळाला. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महात्मा गांधींनी हा चष्मा 1910 ते 1930 दरम्यान त्यांच्या काकांना दिल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत कार्यरत होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)