डोनाल्ड ट्रंप यांनी केलं निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मतदानात फेरफार झाल्याच्या मुद्यावरून ट्रंप यांना आक्षेप घेणाऱ्या एका उच्चपदस्थ निवडणूक अधिकाऱ्याची ट्रंप यांनी निलंबित केलं आहे.

सायबर सेक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी (सिसा)चे प्रमुख क्रिस क्रेब्स यांना मतदानासंदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित करण्यात येत असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पराभव झाल्याचं ट्रंप यांनी अद्याप मान्य केलेलं नाही. मतदानात मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक अधिकारी मात्र ही सगळ्यात सुरक्षित निवडणूक असल्याचं सांगत आहेत.

सायबर सेक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे सहाय्यक संचालक ब्रायन वेयर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. व्हाईट हाऊसकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान निलंबित केलं असलं तरी वक्तव्याप्रकरणी खंत वाटत नाही असं क्रेब्स यांनी म्हटलं आहे.

मी निवडणूक जिंकलो अशा आशयाचं ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निकालांवरून चर्चेला सुरुवात झाली आहे.

मात्र ट्रंप यांच्या ट्वीटखाली अधिकृत सूत्रं निवडणुकीचा निकाल वेगळा सांगतात अशी सूचनाही येते आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पहिल्यांदाच जो बायडन यांनी निवडणूक जिंकल्याचं मान्य केल्यासारखं वाटलं मात्र त्यांनी पुन्हा ट्वीट करून जुना हेका सोडला नव्हता.

डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी मात्र एक ट्वीट करून म्हटलं की, ते (बायडन) निवडणूक जिंकले आहेत.

आपले प्रतिस्पर्धी जो बायडन निवडणूक जिंकल्याचं ट्रंप यांनी अखेरीस मान्य केलं असं मात्र नाहीये. मतमोजणीत घोटाळा झाल्याच्या आरोपापासून ते मागे हटताना दिसत नाहीयेत.

"त्यांनी निवडणूक जिंकली आहे. कारण मतमोजणीत घोटाळा झाला आहे," असं त्यांनी म्हटलं.

3 नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 मतांपेक्षा कमी मतं मिळूनही डोनाल्ड ट्रंप यांनी अधिकृतरित्या आपला पराभव मान्य केला नाहीये.

त्यांनी काही प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक निकालाला आव्हान देण्याची कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे, मात्र अजूनही ते आपल्या दाव्यांची पुष्टी करणारे सबळ पुरावे सादर करू शकले नाहीयेत. त्यामुळेच त्यांना कायदेशीर लढाईत यश मिळालं नाहीये.

रविवारी त्यांनी एक ट्वीट करून म्हटलं, "मतदानात घोटाळा. आपण जिंकू!"

ट्रंप यांनी ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण

त्यानंतर त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं, "ते फक्त फेक न्यूज मीडियाच्या दृष्टिनं जिंकले आहेत. मी हा निकाल स्वीकारणार नाही. आपल्याला अजून पुढं जायचं आहे. निवडणुकीत घोटाळा झाला आहे.

शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अमेरिकन निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका कमिटीनं म्हटलं होतं की, या वर्षीची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासातली सर्वांत सुरक्षित निवडणूक होती.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यातून डोनाल्ड ट्रंप यांचा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळला गेला.

शुक्रवारी व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या केली मॅकनेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या इंटरव्ह्यूत म्हटलं होतं, की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आपण पदावर राहू आणि आपल्याला दुसरी संधी मिळेल असा विश्वास आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)