कोरोनाः नवी लाट थांबवण्यासाठी न्यूयॉर्ककडे 'शेवटची संधी'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नवीन निर्बंध लादले आहेत. महापौर बिल ब्लासिओ यांनी कोरोना व्हायरसची नवी लाट थांबवण्यासाठी 'शेवटची संधी' असल्याचं म्हटलं आहे.

नव्या नियमांप्रमाणे बार, रेस्टॉरन्ट आणि जीम रात्री 10 पर्यंत बंद व्हायला हवेत आणि एकावेळी फक्त 10 किंवा कमी लोक एकत्र एका ग्रुपमध्ये येऊ शकतात.

अमेरिककेत कोव्हिड-19 च्या केसेस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी, 10 नोव्हेंबरला 61,964 पेशंट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. या देशात सरासरी 900 लोक या रोगाने मृत्युमुखी पडत आहेत.

अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटीहून अधिक कोरोना व्हायरसच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत आणि जवळपास 2 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत गेल्या काही दिवसात दररोज 1 लाख केसेस सापडत आहेत त्यामुळे तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट अजून भयानक असेल.

दवाखाने ओसंडून वाहाण्याची शक्यता

अमेरिकेचे येणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड-19 सल्लागार समितीत असणाऱ्या एका सदस्याने सांगितलं की चार ते सहा आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला तर कोव्हिडचा प्रसार थांबवायला मदत होईल.

डॉ मायकल ऑस्टरहोल्म यांनी म्हटलंय की टाळेबंदीमुळे उद्योगांचं जे नुकसान होईल ते भरून काढायला सरकार पुरेशी कर्ज घेऊ शकतं.

न्यूयॉर्कमध्ये काय घडतंय?

"आम्हाला देशात आणि जागतिक पातळीवर कोव्हिडच्या केसेस वाढताना दिसताहेत. न्यूयॉर्कला मोठ्या संख्येने केसेस सापडल्या होत्या," राज्याचे गव्हर्नर अॅड्र्यू कुअमो यांनी बुधवारी, 11 नोव्हेंबरला म्हटलं.

शुक्रवार, 13 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होतील. कुअमो यांनी म्हटलं की "कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये लक्षात आलं की रात्री उशिरापर्यंत चालणारे समारंभ आणि पार्ट्या यांच्यामुळे राज्यात विषाणूचा फैलाव होत आहे."

जर संसर्गाचा दर असाच वाढत राहिला तर न्यूयॉर्कच्या सरकारी शाळा बंद करून मुलांना ऑनलाईन शिक्षण द्यावं लागले असंही महापौर ब्लासिओ म्हणाले.

"संसर्गाची दुसरी लाट टाळण्यासाठी ही आपली शेवटची संधी असेल. आपण ती लाट थांबवू शकतो पण आपल्याला तातडीने उपाययोजना कराव्या लागतील." ब्लासिओ यांनी ट्वीट केलं.

न्यूयॉर्कच्या हेल्थ आणि मेंटल हायजिन विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला तेव्हा मार्च, एप्रिल आणि मे मिळून न्यूयॉर्क शहरात जवळपास 18,000 व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

देशातलं चित्र काय?

अमेरिकेतल्या इतर राज्यांचा कोरोनाचा आलेख चढताच आहे. 10 नोव्हेंबरला अमेरिकेतलं टेक्सस हे राज्य 10 लाख केसेसचा टप्पा पार करणारं पहिलं राज्य बनलं. इलिनॉईस, व्हिस्कॉन्सिन, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा अशा इतर राज्यांमध्येही आकडे वाढतंच आहेत. CBS न्यूजनुसार 15 राज्यांमधल्या हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सची संख्या दुप्पट झाली आहे.

आयडहो आणि मिझूरीमधल्या हॉस्पिटल्समध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे अनेक राज्यांचे प्रमुख आता पुन्हा निर्बंध लादत आहेत. नेवाडा राज्यात नागरिकांना 2 आठवडे घरीच राहाण्याची विनंती केलीये तर मिनिसोटामध्ये बार, रेस्टॉरन्ट रात्री 10 पर्यंत बंद व्हायला हवेत असा नियम लादला आहे.

मंगळवारी मायकल ऑस्टरहोल्म यांनी CBS न्यूजशी बोलताना या परिस्थितीला 'येणाऱ्या वादळाची चाहूल' असं म्हटलं. ते म्हणाले, "आपले दवाखाने तुडुंब भरणार आहेत आणि पेशंटला जागाही मिळणार नाही यात काही शंका नाही."

कोरोना संकटातले सगळ्यात कठीण दिवस म्हणजे आताचा काळ ते पुढच्या उन्हाळा हे असतील हेही त्यांनी नमूद केलं. "लवकरच आपल्या देशात दिवसाला 2 लाख केसेस सापडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही" असं ते म्हणाले.

त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ अँथनी फाऊची यांनी म्हटलं की, "फायझरच्या लसीसाठी तातडीने मान्यता प्रक्रिया राबवता येऊ शकेल."

या लशीच्या मानवी चाचण्यांमध्ये ही 90 टक्के परिणामकारक असल्याचं समोर आलंय. डॉ फाऊची म्हणाले, "मी यातल्या निष्कर्षांचा अभ्यास करणार आहे, पण माझा फायझरवर विश्वास आहे. माझा अन्न आणि नागरी प्रशासनावर विश्वास आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)