अमेरिका निवडणूक 2020 निकाल : जो बायडन बहुमताच्या उंबरठ्यावर

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पेन्सिल्वेनियातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातली 95 टक्के मतमोजणी झाली असून, बायडन यांना ट्रंप यांच्यापेक्षा 5,587 जास्त मतं मिळाली आहेत.

पेन्सिल्वेनियात विजय मिळाला, तर बायडन यांना बहुमतासाठी आवश्यक 270 चा आकडा सहज पार करता येणार आहे. बीबीसी न्यूजचे न्यूयॉर्कमधले प्रतिनिधी निक ब्रायंट यांनी ट्वीट केलं आहे, की बायडन जॉर्जिया, नेव्हाडा आणि अरायझोनामध्येही आघाडीवर आहेत.

अमेरिकन पत्रकार आणि सोशल मीडियावरील काही जणांच्या मते जॉर्जिया आणि अरायझोना या राज्यांच्या नेत्यांवर टीका करणं ट्रंप यांच्या विरोधात गेलं असावं.

बायडन सध्या दोन्ही राज्यांमध्ये आघाडीवर आहेत.अरायझोनातले रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत सिनेटर जॉन मॅककेन यांच्याविषयी ट्रम्प यांनी केलेलं विधान वादग्रस्त ठरलं होतं. व्हिएतनाममधील युद्धात मॅककेन युद्धबंदी होते. त्यामुळे त्यांना अमेरिकेचा युद्ध नायक मानले जावे का, असा सवाल ट्रंप यांनी केला होता, जे अनेकांना पटलं नाही.दरम्यान, जॅार्जियात ज्या क्लेचन काऊंटीमध्ये ट्रंप यांची पिछेहाट होते आहेत, ती काऊंटी दिवंगत मानवी हक्क नेता आणि कॉंग्रेसमन जॉन लुईस यांची आहे.लुईस यांनी कृष्णवर्णियांना समान हक्क मिळावेत यासाठी अमेरिकेत सुरू झालेल्या चळवळीत सहभाग घेतला होता.

ट्रंप राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले त्यात रशियाचा हात असावा असे आरोप झाल्यावर लुईस यांनी ट्रंप यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं तेव्हा ट्रंप यांनी "लुईस फक्त बोलतात. त्यांनी आपल्या मतदारसंघाकडेच लक्ष द्यावं असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

'निवडणुकीत घोटाळ्याचा पुरावा नाही' - आंतरराष्ट्रीय निरीक्षक

डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आणि 'बेकायदेशीर मतं' मोजली जात असल्याचा आरोप केला होता. टपालानं आलेली मतं मतदानाच्या दिवसानंतरही मोजण्याची अमेरिकेत पद्धत आहे, पण त्यालाच ट्रंप यांनी आक्षेप घेतला आहे.

पण तसा कुठलाही पुरावा दिसून आलेला नाही, असं आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी बीबीसी रेडियो फाईव्हला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप ही संघटना जगभरात निवडणुकांचं निरीक्षण आणि अभ्यास करत असते. मुक्त आणि स्वतंत्रपणे निवडणुका होत आहेत की नाहीत यावर या संस्थेची नजर असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)