युरोपमधल्या सर्वात निवांत शहराची तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
बल्गेरियातील दुसरं सर्वात मोठं शहर म्हणजे, 'प्लोवदिव'. या शहराला स्वत:च्या प्रतिष्ठेबाबत अभिमान आहे. याच कारण, हे शहर शहर आपलं वेगळेपण जपतं. बल्गेरियाची राजधानी 'सोफिया' तून बसने प्रवास करून आल्यानंतर या शहराचं वेगळेपण पटकन जाणवून येतं. या शहराचा जगण्याचा वेग इतरांपेक्षा वेगळा आहे.
या शहरातील स्थानिक लोक हळूहळू चालतात. त्यांच्याकडे खूप वेळ असल्याचं दिसून येतं. इतर शहरांच्या तुलनेत या शहरात ट्रॅफिक खूप कमी आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्कमधून फेरी मारताना ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन बुद्धीबळ खेळताना दिसून येतात. झाडांच्या सावलीत लोक गप्पा मारताना पहायला मिळतात. त्यामुळे 'प्लोवदिव' शहर पहाताक्षणी वेगळं आहे याची जाणीव होते.
लोक बार, कॅफेच्या बाहेर रस्त्यावर बसलेले आढळून येतात. भिंतीवर विविध प्रकारची चित्र काढलेल्या इमारतींच्या खाली युवा फिरताना, एकमेकांसोबत गप्पा मारताना आणि फोनवर बोलताना आढळून आले. शहरातील मध्यभागी असलेल्या मशिदीच्या जवळ असलेल्या कॅफेमध्ये अनेक लोक तासन् तास बसून तुर्किश कॉफीचा आस्वाद घेताना पहायला मिळतात.
या शहरातल्या मांजरीही इतर शहरांच्या तुलनेत निरुत्साही दिसतात. आळस देतात आणि पुन्हा झोपून जातात. या शहरात राहणाऱ्या स्थानिकांना विचारलं, हे शहर इतकं आरामात का आहे? तर लोक सांगतात, 'प्लोवदिव' मध्ये याला "अय्ल्याक" (Aylyak) असं म्हणतात.
19 साव्या शतकाच्या उत्तरार्धात बल्गेरिअन भाषेत हा शब्द आढळून येत असला तरी "अय्ल्याक" (Aylyak) हा शब्द या शहराबाहेर कोणीच उच्चारत नाही. हा शब्द मुळचा तुर्कस्थानचा असलेला शब्द "aylaklık" "अय्लाकिक" या शब्दापासून घेण्यात आला आहे. याचा अर्थ…रिकामपण असा होतो.

फोटो स्रोत, Getty Images
सोफिया लिट्रेचर आणि भाषांतर हाऊसच्या संचालक याना जिनोआ म्हणतात, खरंतर "अय्ल्याक" या शब्दाचा अर्थ प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीच्या सोबतीला कामासाठी दुसरा व्यक्ती असा होता. "अय्ल्याक" या शब्दासोबत जाणारा शब्द म्हणजे 'बिचिम'..याचा अर्थ हल्ला करणे किंवा झाडाच्या बुंध्याचे तुकडे करणं.
हल्ला करणे किंवा कापणे या शब्दावरून एक गोष्ट स्पष्ट होते की "अय्ल्याक" हा शब्द काहीतरी कामासंबंधी होता. तुम्हाला "अय्ल्याक" करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या कामातून काही वेळ तुमच्यासाठी काढायला हवा. तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काळजीतून मुक्त होणं.
2019 मध्ये 'प्लोवदिव' शहराला इटलीच्या मटेरा शहरासोबत युरोपची सांस्कृतिक राजधानीचा पुरस्कार विभागून मिळाला होता. बल्गेरिअन कलाकार, दिग्दर्शक पालमेन राडेव यांच्या फायर थिएटर माईम कंपनी "अय्ल्याक" बाबत अधिक जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जाऊन याची चर्चा केली होती. त्यांना "अय्ल्याक" म्हणजे काय? हा शब्द कसा आला..आणि लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनला हे जाणून घ्यायचं होतं.

फोटो स्रोत, Alamy
सोफियातील एका कॅफेत मला 2018 मध्ये 'प्लोवदिव' शहरात राहण्यासाठी आलेला जॉर्जिव भेटला. या शहरातील "अय्ल्याक" संस्कृतीला तो पूर्णत: नवा आणि अनोखळी होता. 'आमचा अभ्यास खूप कठीण होता' असं तो मला म्हणाला. ते म्हणतात याची काहीच किंमत नाही…हा निव्वळ आळशीपणा आहे"
पण, लोकांशी याबाबत चर्चा केल्यानंतर एक वेगळं चित्र उभारून आलं. लोकांच्या म्हणण्याप्रमामे, "अय्ल्याक" म्हणजे वेळ काढणं. मित्रांसोबत ब्रेकफास्ट करण्यासाठी बसायचं, आणि रात्र होईपर्यंत तिथेच बसून रहायचं. आसपासच्या वातावरणाचा आनंद घेणं म्हणजे "अय्ल्याक". पुढे जाऊन जॉर्जिव याला "झेन अय्ल्याक" असं म्हणतो. याचा अर्थ तुमच्या आत्म्यापासून वेगळं होणं. "अय्ल्याक" म्हणजे तुम्ही जीवनात अनेक अडचणींना तोंड देत असताना जीवनातील सर्व दुखांपासून सुरक्षित रहाणं"
सोफियामध्ये मी अनेक लोकांशी बोललो. हे लोक या शब्दाबाबत संशयवादी आहेत. त्यांच्यामते हे फक्त मार्केटिंगमुळे झालं आहे. मला हे पटत नव्हतं..त्यामुळे मी सोफियातून 'प्लोवदिव' शहरात जाण्यासाठी बसमध्ये बसलो. मी या शहरात अनेक दिवस राहिलो.
माझी भेट डॉ. सेवेतोस्वा मान्चेव्हा यांच्याशी झाली. डॉ. सेवेतोस्वा मानवशास्त्रज्ञ आहेत आणि ACEA Mediator चे संचालक आहेत. ही संस्था दोन समाजाला एकत्र आणण्याचं काम करते.
बल्गेरियाच्या दक्षिण-पश्चिम भागात राहणाऱ्या डॉ सेवेतोस्वा यांनी "अय्ल्याक" स्विकारलं आहे. त्या गेल्या 10 वर्षांपासून या शहरात रहातात, आणि त्यांना हे शहर सोडायचं नाही.
"या शहरात अय्ल्याक" मुळे रहाण्यासाठी खूप लोक येतात.' असं त्या म्हणतात. त्यांच्या सोबत असलेल्या एलिस्टा कापूशेव्हा मला सांगतात, त्यांचा जन्म 'प्लोवदिव' या शहरात झाला. पण, काही दिवसांपूर्वीच त्या बर्लिनमधून पुन्हा या शहरात परतल्या. त्यांना आपल्या घरी परतल्याचा आनंद आहे. कारण बर्लिनमध्ये "अय्ल्याक" नाहीये.
मान्चेव्हा यांच्या माहितीनुसार, या शहराच्या संस्कृतीमध्ये खूपवर्षांपासून "अय्ल्याक" मुरलेलं आहे. इतिहासाच्या अभ्यासक मेरी न्यूबर्जर सांगतात, हे शहर कसं 19 व्या शतकात व्यापाराचं केंद्र होतं. ऑटोमन साम्राज्याच्या इतर शहरांमध्ये हे शहर इस्तांबूलनंतर दुसरं शहर होतं. ज्यू, ग्रीक, रोम, अमेरिका, बल्गेरियन लोक या शहरातील कॅफेमध्ये एकत्र दिसत असत. या लोकांमध्ये एकत्र रहाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठीचा पर्याय म्हणजे "अय्ल्याक".
त्या म्हणतात, याचा अर्थ "आपल्या शहरात स्वत:साठी वेळ काढणं,". माझ्यासाठी "अय्ल्याक" म्हणजे चर्चेच साधन. "तुम्ही एकमेकांना आवडणं गरजेचं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चर्चा करण्याची इच्छाशक्ती असायला हवी. समजून घेण्याची इच्छा असायला हवी."
'प्लोदीव' च्या कॉफी हाऊसमधील इतिहास पाहिला तर कळतं, की या शहरात चित्रकार आणि व्यापारी एकत्र येत. एकमेकांसोबत वेळ घालवत, आणि हा वेळ खूप हळूहळू जात असे.
19 व्या शतकातील बल्गेरिअन गीतकार हरिस्टो दानोव यांनी लोक कसे दिवसभर कॅफेत वेळ घालवतात याबाबत लिहिलं होतं. "लोक रेस्टॉरंटमध्ये जातात, सिरागेट ओढण्यासाठी, मद्यपान करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठी." "आणि संध्याकाळ होण्याची वाट पहातात, जेणेकरून त्यांना ब्रॅन्डी घेता येईल."
1906 मध्ये ब्रिटिश नागरिक जॉन फॉस्टर फ्रेझर या शहराच्या वेगाने अचंबित झाले होते. ते लिहितात, "एक गार्डन आहे. त्यात खूप दिवे लावण्यात आले आहेत. त्यात झाडांखाली टेबल्स ठेवण्यात आली आहेत. टेबलांवर लोक बसले आहेत. कॉफी पित आहेत, बिअर पिणं सुरू आहे. वाईनच्या बाटल्या संपत आहेत. दुसऱ्या बाजूला एक हंगेरीचा वाद्यसमूह कार्यक्रम करतो आहे. तो रविवार होता. आणि लोक मजा करत होते"
मान्चेवा आणि कापूशेवासोबत यांच्यासोबत "अय्ल्याक" बाबत चर्चा करताना त्या, एकच गोष्टी सारखी सांगत होत्या. "अय्ल्याक" म्हणजे आपल्यासाठी जागा शोधणं. दिवसभर कितीही काम असो कॉफी पिण्यासाठी वेळ काढायला हवा. याचा अर्थ या शहराची ओळख करून घेणं. शहराच्या विविध भागात जाणं, लहान-लहान रस्ते शोधणं ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत वेळ घालवू शकता.
जॉर्जिव सांगतो, याचा अर्थ जीवनातील अडचणींवर मात करून मोकळं होण्यासाठी जागा शोधणं. मान्चेवा आणि कापूशेवा यांच्यासारख्यांना आता "अय्ल्याक"च्या माध्यमातून जीवन जगण्याचा मार्ग मिळालाय.
अनेक दिवस 'प्लोदीव' मध्ये राहिल्यानंतर या शब्दाबाबतचा माझा संशय दूर झाला. मी "अय्ल्याक" काय हे शिकलो. मी शहरात रस्त्यांवर फिरलो. सर्वकाही आरामात केलं. पण, हे करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मी काही कमी केलं नाही. सर्वकाही केलं फक्त मनावर दडपण न ठेवता चिंता न करता. या शहरातील माझ्या शेवटच्या काही दिवसात मला एक अनुभव आला. या शहराकडे जगाला देण्यासारखं काही आहे.
मी बल्गेरिअन लेखक फिलिप ग्यूरोव यांना ई-मेल केला. त्यांनी "अय्ल्याक" जीवन जगण्याचं एक तत्वज्ञान आणि आर्थिक समृद्धीला पर्याय या विषयावर आपला प्रबंध लिहिला आहे. "युवांना बर्नआउट म्हणजे काय याचा अनुभव आला आहे. त्यामुळे आपण आपला वेग जरा कमी करायला हवा. जास्तीत जास्त निसर्ग, आपण स्वत: यांच्याशी एकरूप होऊन जगलं पाहिजे."
'प्लोवदीव' शहरातील माझ्या शेवटच्या दिवशी मी शहरातील मुख्य भागात असलेल्या एका मशिदीजवळच्या कॅफेमध्ये बसून तुर्कीश कॉफी मागवली. माझ्याकडे माझं घड्याळ नव्हतं, मला फोन पहाण्याची गरज नव्हती. मला कोणलाही भेटायचं नव्हतं…मी क़ॉफीच्या आस्वाद घेत दुपार कशी होते हे फक्त पहात होतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























