अमेरिका निवडणूक निकाल : विजयपथावर असल्याचा बायडन यांचा दावा, तर ट्रंप यांनी सुरू केली कायदेशीर लढाई

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

व्हाईट हाऊसच्या शर्यतीमध्ये आपणच विजयपथावर असल्याचा दावा स्पर्धेतले दोन्ही उमेदवार - डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन करतायत.

मतमोजणी संपेल तेव्हा आपणच जिंकू असा विश्वास जो बायडन यांनी त्यांच्या समर्थकांसमोर बोलताना व्यक्त केला.

सोबतच दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईसाठीही तयारी सुरू केलीय.

विस्कॉन्सिन, पेन्सलव्हेनिया आणि मिशीगन या महत्त्वाच्या राज्यांमधल्या मतमोजणीला आव्हान देण्याची तयारी ट्रंप मोर्चाने सुरू केलीय.

जो बायडन मिशिगनमधून जिंकतील असा बीबीसीचा अंदाज आहे. तर विस्कॉन्सिनमधून ते जिंकतील असा अंदाज अमेरिकन माध्यमांनी वर्तवलाय.

पेन्सलव्हेनियामधून अद्याप कोणताही निकाल आलेला नाही.

बायडन जर या तीनही राज्यांतून जिंकले, तर ते विजयाच्या अगदी जवळ जातील.

अमेरिकेच्या अनेक स्विंग राज्यांमधली मत मोजणी अजूनही सुरू आहे.

फ्लोरिडा, ओहायो, टेक्सास आणि आयोवामधून ट्रंप यांचा विजय होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आलेली आहे.

पण जो बायडन यांनी मिशिगनवर वर्चस्व मिळवलेलं आहे. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी इथून विजय मिळवलेला होता.

ॲरिझोना, पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये अजूनही अटीतटीची लढत सुरू आहे.

आतापर्यंत बायडन यांच्याकडे 243 इलेक्टोरल कॉलेज मतं, तर ट्रंप यांच्याकडे 214 इलेक्टोरल कॉलेज मतं जाण्याचा अंदाज आहे. राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी 270 मतांची गरज आहे.

अद्याप 7 राज्यांमधले कल येणं बाकी असल्याने, निकाल लागायला अजून वेळ आहे. या सात राज्यांकडे किती इलेक्टोरल व्होट्स आहेत, यावर एक नजर टाकूयात

  • पेन्सलव्हेनिया - 20
  • जॉर्जिया 16
  • नॉर्थ कॅरोलिना 15
  • ॲरिझोना 11
  • विस्कॉन्सिन 10
  • नेवाडा 6
  • अलास्का 3

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)