अमेरिका निवडणुकीचा निकाल कधीपर्यंत लागणार?

अमेरिका मतदान

फोटो स्रोत, Getty Images/Mario Tama

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रंप यांचाच मुक्काम राहणार की जानेवारी महिन्यात जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार यासाठीचा कल अमेरिकन मतदार आज देत आहेत.

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली होणारी ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आतापर्यंतची सर्वात अनोखी निवडणूक ठरतेय.

2016 च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाच्या दिवसाच्या आधीच मतदान करणाऱ्या म्हणजे - अर्ली व्होटिंग करणाऱ्या मतदारांची संख्या जास्त होती. कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या पाहात अनेक मतदारांनी यावेळी पोस्टाद्वारे मत पत्रिका पाठावयाचा पर्याय स्वीकारलेला आहे.

ज्या व्यक्तींची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे, असे लोकही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतात, असं CDCने म्हटलंय. अशा रुग्णांसाठीच्या काही सूचना अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन - CDC ने दिल्या आहेत.

अमेरिकेतल्या ह्यूस्टनमध्ये काही ठिकाणी 'ड्राईव्ह थ्रू' मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत, जिथे मतदारांना गाडीतून न उतरताही मतदान करता येतंय.

तर न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमधल्या अनेक मतदान केंद्रांवर 3 नोव्हेंबरच्या सकाळी अजिबात गर्दी नव्हती. पण न्यूयॉर्कमधून तब्बल 11 लाख लोकांनी 'अर्ली व्होटिंग' याआधीच केलेलं आहे.

अमेरिकेत मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू असताना भारतात मात्र रात्र असेल.

भारत आणि अमेरिकेच्या वेळेत जवळपास 12 तासांचं अंतर आहे. त्यामुळे अमेरिकेत जेव्हा 3 नोव्हेंबरला सकाळी मतदान सुरू झालं, तेव्हा भारतात मंगळवारची संध्याकाळ झालेली होती.

त्यामुळे अमेरिकेतलं मतदान संपेपर्यंत भारतात बुधवार उजाडलेला असेल.

अमेरिका मतमोजणी

फोटो स्रोत, Getty Images/ Andy Manis

केव्हा लागणार निकाल?

अमेरिकेत सहसा मतदानाच्या रात्रीच चित्र स्पष्ट झालेलं असतं. पण कोरोना संसर्गामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुसंख्य नागरिकांनी या आधीच मतदान केलं आहे. यामुळे निवडणूक मतमोजणीत उशीर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतल्या 50 राज्यांमध्ये 9 वेगवेगळे टाईम झोन्स आहेत. म्हणूनच विविध राज्यांत मतदानाची वेळ वेगळेगळी असते.

सर्वांत आधी पूर्वेकडील किनारपट्टीच्या शहरात मतदान होतं. या शहरात यंदा संध्याकाळी सात वाजता मतदान बंद होईल. तेव्हा भारतात बुधवार (4 सप्टेंबर) पहाटेचे साडेपाच वाजले असतील.

मतदान संपल्यानंतर विविध राज्यांतल्या मतमोजणीला सुरूवात होईल.

अनेकदा ही मतमोजणी मतदानाच्या दिवशी पूर्ण होत नाही. पण कोणी आघाडी घेतलेली आहे, हे समजण्याइतपत मतांची गणना करून झालेली असते.

पण मतमोजणी पूर्ण झालेली नसल्याने याला निकाल न म्हणता 'कल' म्हटलं जातं.

यावर्षीची निवडणूक वेगळी का?

यंदा कोव्हिड-19 च्या संसर्गामुळे बंहुसंख्य नागरिकांनी पोस्टल बॅलेट किंवा प्रत्यक्षात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

पोस्टल मतदारांची ओखळ पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने पोस्टल मतांच्या मतमोजणीत खूप वेळ लागण्याची शक्यता आहे.

फ्लोरिडा आणि ओहायो सारख्या काही राज्यात मतदारांची ओळख पटवण्याची प्रक्रिया काही आठवड्यांपूर्वी सुरू होते. त्यामुळे या राज्यात मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरूवात होते. आणि कोण जिंकण्याची शक्यता आहे याचा अंदाज येतो.

पण, पेन्सलव्हेनिया आणि व्हिस्कॉन्सिन सारख्या राज्यांमध्ये मतदानाच्या दिवसाच्या आधी ही ओळख प्रक्रिया करण्याची परवानगी नाही.

त्यामुळे या राज्यांचे निकाल फार महत्त्वाचे ठरतात. निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा या ठिकाणी मतमोजणीसाठी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सेपरेटर
सेपरेटर

निकालाबाबत वाद झाला तर काय होईल?

कोरोना संसर्गामुळे अमेरिकेत आधीपासूनच कायदेशीर डावपेचांना सुरुवात झालेली आहे.

स्टॅनफर्ड-एमआयटीच्या एका निवडणूक प्रकल्पानुसार, अमेरीकेतल्या 44 राज्यांमध्ये निवडणूक कायद्यांशी निगडीत 300 पेक्षा जास्त कायदेशीर प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

तर सुप्रीम कोर्टात जाऊनच या निवडणुकीचा निकाल मिळवता येईल, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच बोलून दाखवलंय.

2000 सालच्या निवडणुकीत डेमोक्रॅट उमेदवार अल गोअर फ्लोरिडामध्ये पराभूत झाले होते आणि निवडणूक फक्त 537 मतांनी हरले होते. तेव्हा एकूण मतं होती 60 लाख.

यानंतर मतमोजणीवरून वाद सुरू झाला. पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता.

शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टाने रिपब्लिकन उमेदवाराच्या बाजूने आपला निर्णय दिला आणि जॉर्ज डब्लू. बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)