अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेवर आत्मघातकी हल्ला, 18 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Reuters
अफगाणिस्तानातील एका शैक्षणिक संस्थेबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झालाय.
उच्च शिक्षण देणाऱ्या एका खासगी संस्थेबाहेर हा स्फोट झाला आहे. शियाबहूल परिसरातील दश्त-ए-बार्ची या इमारतीत साधारणपणे शेकडो लोकांचा वावर असतो.
जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इस्लामिक स्टेट या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. सोशल मीडियावर यासंदर्भात त्यांनी पोस्ट लिहिली आहे. पण कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
यापूर्वी तालिबानने या हल्ल्यात सहभागी असल्याचा इन्कार केला होता.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी सांगितले, "एका आत्मघातती हल्लेखोराने इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांना त्याच्याबाबत संशय येताच त्याने स्फोट घडवून आणला."

फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक नागरिक अली रेझा यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, मृतांपैकी बहुतांश विद्यार्थी हे इमारतीत प्रवेश करण्यासाठी बाहेर थांबले होते. तो म्हणाला, " स्फोट झाला त्यावेळी मी घटनास्थळापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर उभा होतो."
गेल्या काही आठवड्यांत अफगाणिस्तानात हिंसाचार वाढला आहे. बहुतेक हल्ले तालिबानने केले आहेत. कतारची राजधानी दोहामध्ये सरकार आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे. या चर्चेवर या घटनेचा परिणाम होऊ शकतो.
अफगाणिस्तानातील अतिरेकी संघटना शिया समुदायाला लक्ष्य करत आहेत. शनिवारचा हल्ला हा शैक्षणिक संस्थेवर झालेला पहिला हल्ला नाही. ऑगस्ट 2018 मध्ये एका हल्ल्यात 48लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुतांश विद्यार्थी होते. इस्लामिक स्टेट या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
या वर्षी मे महिन्यात एका प्रसुती केंद्रावर झालेल्या हल्ल्यात 24 महिला आणि मुले ठार झाली. या आठवड्यात एका धार्मिक शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 11 मुले आणि त्यांना शिकवणारा एक धार्मिक गुरू ठार झाला. मात्र, या हल्ल्यात तालिबानी अतिरेक्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे अफगाण सरकारने सांगितले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























