7600 टनांची इमारत एका ठिकाणहून उचलून दुसरीकडे कशी नेली असेल?

इमारत

फोटो स्रोत, CCTV

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चीनमधील शांघाय शहरातील इंजिनिअर्सनं चक्क 7600 टनांची इमारत एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकवण्याची करामत केली आहे.

1953 साली बांधण्यात आलेली ही इमारत एका प्राथमिक शाळेची होती. या पाच मजली इमारतीला तिच्या जागेवरुन उचलून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने थोडसं दूर हलवण्यात आलंय

स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या इमारतीजवळच एक नवीन प्रकल्पावर काम सुरू होत आहे. त्यासाठी जागा कमी पडत असल्यानं या बिल्डिंगला सरकवण्याचा निर्णय घेतला गेला.

इंजिनिअर्सकडे ही इमारत पाडण्याचाही पर्याय होता, मात्र त्यांनी ही ऐतिहासिक इमारत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्याचा निर्णय घेतला.

बिल्डिंगला मूळ जागेपासून 62 मीटर अंतरावर सरकविण्यात आलं.

चीनच्या सरकारी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार इंजिनिअर्सच्या एका टीमनं 198 रोबोटिक टाँगोच्या मदतीनं इमारत हलवली.

चिनी सरकारकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही न्यूज नेटवर्कनं म्हटलं आहे की, इमारत हलविण्याचं काम 18 दिवसात पूर्ण करण्यात आलंय. 15 ऑक्टोबरला बिल्डिंग शिफ्ट करण्याचं काम पूर्ण केलं गेलं.

इमारत

फोटो स्रोत, CCTV

वृत्तसंस्थानी म्हटलं आहे की, स्थानिक प्रशासनानं या ऐतिहासिक इमारतीचं जतन करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टिनं डागडुजीचं काम सुरू आहे.

इमारत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविण्याचे अनेक मार्ग आहेत, मात्र बहुतांश वेळा इंजिनिअर्स अशा इमारतींना मोठ्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं हलवतात, जे जास्त क्षमतेच्या क्रेननं खेचले जातात.

यावेळी चिनी इंजिनिअर्सनी रोबोटिक लेग्जचा वापर केला, ज्यांना खाली चाकं लावण्यात आली होती. चिनी इंजिनिअर्सनी पहिल्यांदाच या तंत्राचा वापर केलाय.

विशेष म्हणजे शांघायच्या इंजिनिअर्सकडे अशाप्रकारे इमारत हलविण्याचा अनुभव आहे.

2017 साली 135 वर्षांपूर्वी बांधलेल्या आणि जवळपास दोन हजार टन वजनाच्या ऐतिहासिक बौद्ध मंदिराला त्याच्या मूळ स्थानापासून जवळपास 30 मीटर अंतरापर्यंत सरकविण्यात आलं होतं. या मंदिराला हलविण्यासाठी पण 15 दिवस लागले होते.

या वर्षाच्या सुरूवातीलाही चीनमधील इंजिनिअर्सनी इमारत बांधणीच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनी चीनमधल्या वुहान शहरात दहा दिवसात हजार खाटांचं हॉस्पिटल बांधलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)