You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक: ट्रंप यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यावर भारतीयांच्या प्रतिक्रिया
भारत, चीन आणि रशियाची हवा अत्यंत खराब असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या डिबेटमध्ये केलं होतं. यावरून भारतात एकीकडे संताप व्यक्त होतोय. तर अनेकांनी ही आत्मचिंतनाची वेळ असल्याचंही म्हटलं आहे.
अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांच्या वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं म्हटलं आहे. खरंतर जगातल्या सर्वाधिक प्रदूषित हवा असणाऱ्या शहरांमध्ये राजधानी दिल्लीचा क्रमांक बराच वरचा आहे.
गेल्या काही दिवसांत अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. हवेतल्या धुलीकणांचं म्हणजेच PM2.5 कणांचं प्रमाणही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा 12 पट वाढलं आहे.
दिल्लीतली हवा प्रदूषित
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची शेवटची डिबेट शुक्रवारी पार पडली.
या चर्चेत वातावरण बदलाविषयक पॅरीस करारातून आपण बाहेर का पडलो, यावर स्पष्टीकरण देताना ट्रंप म्हणाले, "चीनकडे बघा. तिथली हवा किती प्रदूषित आहे. रशियाकडे बघा, भारताकडे बघा. तिथे हवा अत्यंत खराब आहे. मी पॅरीस करारामधून बाहेर पडलो कारण आपल्या अब्जावधी डॉलर्सचा प्रश्न आहे आणि या करारात आपल्याला निष्पक्ष वागणूक मिळत नव्हती."
वातावरण बदलाचा वेग 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी प्रयत्न करावे, यासाठी पॅरिस करार करण्यात आला होता.
मात्र, स्पष्टीकरण देताना त्यांनी जो भारताचा उल्लेख केला, त्यावरून भारतात अनेकांच्या भुवया उंचावल्या. उत्तर भारतात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवा जास्त प्रदूषित होत असते. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात.
या दिवसांमध्ये शेतकरी आपलं शेत स्वच्छ करण्यासाठी तण जाळतात, गाड्यांमधून होणारं प्रदूषण, कारखान्यांमधून होणारं प्रदूषण, या महिन्यांमध्ये येणाऱ्या सणवारात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडणे तसंच या दिवसांमध्ये हवेचा वेग मंदावलेला असतो. या सर्व कारणांमुळे हवेचं प्रदूषण वाढतं.
डॉक्टर याला "विषारी वायूंचं भयंकर कॉकटेल" म्हणतात. असं असलं तरी यावर नियंत्रण मिळवण्यासाठीही काही प्रयत्न सुरू आहेत."
शुक्रवारी ट्रंप यांनी 'खराब हवा' म्हटल्यानंतर ट्वीटरवर 'filthy' आणि 'Howdy!Modi' ट्रेंड करत होते.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या ह्युस्टन शहरात 'Howdy Modi' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तब्बल 50 हजार जण उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे अमेरिकेत कुठल्याही परदेशी नेत्यांचं झालेलं सर्वोत्तम स्वागत असल्याचं म्हटलं गेलं होतं. स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी या कार्यक्रमाची "ऐतिहासिक घटना" असा उल्लेख केला होता.
ट्रंप यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी "ट्रंप यांचं वक्तव्य म्हणजे या दोन देशांच्या नेत्यांमध्ये असलेल्या 'मैत्रीचं फळ' आहे का की हाऊडी मोदी कार्यक्रमाचा हा परिणाम आहे," अशी विचारणा केली.
अनेकांनी फेब्रुवारी महिन्यात ट्रंप यांचं भारतात जे जंगी स्वागत करण्यात आलं, त्याचीही आठवण काढली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या 'जवळच्या मित्राच्या' स्वागतासाठी संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा जंगी कार्यक्रम क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला होता. तो मित्र असं का म्हणाला, असा सवालही अनेकांनी विचारला.
एकीकडे ट्रंप यांच्या वक्तव्यावर टीका होत असताना अनेकांनी दिल्लीतल्या प्रदूषणाचा तक्ता ट्वीट करत हवेची गुणवत्ता किती ढासळली आहे, याचेही दाखले दिले गेले . लेखिका किरण मनरल लिहितात, "दरवर्षी हवा विषारी पातळी गाठते."
त्या पुढे लिहितात, "हा आपला अपमान समजून अस्वस्थ वाटून घेण्याऐवजी याकडे एक आव्हान म्हणून बघितलं पाहिजे आणि आपली हवा स्वच्छ करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे. असं झालं तर कुणीही असं काही बोलण्याचं धाडस करणार नाही."
गेल्या काही आठवड्यात हवेच्या प्रदूषणात झालेली वाढ कोरोना विषाणू फैलावाच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. वाढत्या प्रदूषणाने कोरोना विषाणूच्या फैलावाचा धोकाही वाढतो आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढते, असं अनेक अभ्यासांमधून आढळून आलं आहे.
इतकंच नाही तर विषारी वायूमुळे कोरोनाविरोधातल्या आपल्या लढ्यातही अडथळे निर्माण होतील, असा इशारा भारतातल्याही डॉक्टर्स आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)