You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: फ्रान्समध्ये एका दिवसात आढळले 30 हजारांहून जास्त रुग्ण
फ्रान्समध्ये गुरुवारी (15 ऑक्टोबर) कोरोनाची लागण झालेले 30 हजार 621 नवे रुग्ण आढळून आले. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (14 ऑक्टोबर) कोरोनाचे 22 हजार 591 रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे फ्रान्स सरकारने राजधानी पॅरिससह नऊ शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. शनिवारपासून (17 ऑक्टोबर) रात्रीच्या कर्फ्यूचा नियम लागू असेल.
लोकांचा जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लावणं अत्यंत आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनंही म्हटलं आहे.
युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नव्या नियमावलींचं पालन करण्यात यावं असं आवाहन करण्यात येत आहे.
शनिवारी लंडनमध्ये इनडोअर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. लंडन आणि परिसरात कोव्हिड-19 संबंधित सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फ्रान्स, इटली, पोलंड आणि जर्मनी यांच्यासारख्या देशांमधील कोरोना चाचण्यांची संख्या गुरुवारी वाढण्यात आली. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.
गुरुवारी रशियात 286 लोकांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोना व्हायरस साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत रशियात एका दिवसांतील ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे.
युरोपात आता रोज एक हजार मृत्यूंची नोंद होत असल्यामुळे सरकारांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
फ्रान्समध्ये काय परिस्थिती?
बुधवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी कठोर निर्बंध आणि नियमावलीची घोषणा केली. शनिवारपासून पॅरिस आणि इतर आठ प्रमुख शहरांमध्ये रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
हे निर्बंध किमान चार आठवडे तरी लागू असतील. रुग्णांची संख्या दैनंदिन 3 हजारांपेक्षाही कमी ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं मॅक्रोन यांनी सांगितलं.
रात्री कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येतील. पण या काळात दिवसभरातील दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे होत राहील, असं फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी सांगितलं.
फ्रान्स पोलिसांनी गुरुवारी आरोग्य मंत्रालय तसंच प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी छापे मारले.
या अधिकाऱ्यांनी कोरोना काळात आपल्या कर्तव्यात कसूर तर केली नाही ना, याची माहिती मिळवण्यासाठी हे छापे मारण्यात आले.
या मुद्द्यावरून सरकारला वारंवार टीकेचा सामना करावा लागत आहे. सरकारी अधिकारी कोरोनाविरुद्ध लढताना गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप सरकारवर होत आहे.
युरोपात काय वातावरण?
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे प्रमुख हेन्स क्लग यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने पहिल्यांदा युरोपात प्रवेश केला होता. त्या तुलनेत आता येथील मृत्यूंची संख्या पाच पटींनी कमी झाल्याचं क्लग यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी बहुतांश रुग्ण तरूण वयोगटातील आहेत. ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचं मृत्यूचं प्रमाण कमी असल्यामुळे मृत्यूंची नोंद कमी झाल्याचं ते म्हणाले.
युरोपच्या सरकारांनी सध्याच्या स्थितीत निर्बंध शिथील केले, तर जानेवारी 2021 पर्यंत मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढू शकेल. एप्रिल महिन्यातील मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण चार ते पाच पट जास्त असेल. जर 95 टक्के लोकांनी मास्क वापरले आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं, तर फेब्रुवारीपर्यंत दोन लाख 81 हजार लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो, असं ते म्हणाले.
सरकारने निर्बंध लागू करताना मानसिक आरोग्य आणि घरगुती हिंसाचार या विषयांकडेही लक्ष द्यावं, शाळा उघडण्यासाठी सरकारने शक्य तितके प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही क्लग यांनी सांगितलं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संसर्गाचं प्रमाण वाढू लागलं होतं. गेल्या काही आठवड्यांपासून युरोपात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.
युरोपात झेक प्रजासत्ताकमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात देशातील रुग्णांची संख्या दुपटीने वाढून एक लाख 40 हजारांवर पोहोचली आहे.
युरोपात पुन्हा निर्बंध?
युरोपातील पोलंड या देशाने काही ठिकाणी रेड झोन घोषित केले. याठिकाणी शाळा आणि जिम बंद राहतील, असं त्यांनी सांगितलं आहे.
इटलीच्या दक्षिण भागातील शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.
झेक प्रजासत्ताकमध्ये शाळा आणि बार बंद करण्यात आले आहेत. तिथं रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
येथील प्रशासन फिल्ड हॉस्पिटल बनवण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी पुन्हा आपल्या देशात परतावं, असं आवाहन झेक प्रजासत्ताक या देशाने केलं आहे.
जर्मनीत जास्त धोका असलेल्या परिसरात बार आणि रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत. गुरुवारी याठिकाणी 6 हजार 638 नवे रुग्ण आढळून आले. कोरोना साथीदरम्यान जर्मनीत आढळून आलेली एका दिवसांतली ही सर्वाधिक संख्या आहे.
पोर्तुगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांच्या जमा होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा जास्त लोकांच्या सहभागाची परवानगी नाही.
स्पेनच्या कॅटालोनिया परिसरात रेस्टॉरंटमधून फक्त टेक-अवे म्हणजेच जेवण पार्सल नेण्याची परवानगी आहे. जिम आणि इतर सांस्कृतिक ठिकाणी क्षमतेपेक्षा निम्म्या प्रमाणातच लोकांनी उपस्थित असावं, असा नियम आहे. दुकानं आणि मोठ्या शॉपिंग सेंटर्समध्ये फक्त 30 टक्के लोक जाऊ शकतात.
नेदरलँड्समध्ये सर्व बार, रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये फक्त टेक-अवेची सेवा देण्याची परवानगी आहे. घरांमध्येही तीनपेक्षा जास्त पाहुणे येऊ शकत नाहीत.
मॉस्कोमध्ये दळणवळणावर मर्यादा आहेत. सोमवारपासून माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)