You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीसीजी लस कोरोनापासून बचाव करू शकेल का?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
ब्रिटनमध्ये शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी हाती घेतली आहे. बीसीजी लसीच्या मदतीने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचवता येतील का, यासंबंधीचं हे संशोधन आहे.
भारतात प्रत्येक बालकाला ही लस दिली जाते. टीबीपासून संरक्षण होण्यासाठी ही लस देतात.
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरमध्ये या लसीची चाचणी सुरू आहे. यात जवळपास एक हजार स्वयंसेवक भाग घेणार आहे.
1921 साली ही लस तयार करण्यात आली होती. टीबी रोगावर उपचार म्हणून ही लस विकसित करण्यात आली होती. मात्र, इतरही संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठीही ही लस उपयोगी ठरू शकते, याचे काही पुरावे हाती येत आहेत.
एका खास प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला तयार करण्याच्या अनुषंगाने ही लस तयार करण्यात आली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मात्र, या लसीचा रोगप्रतिकारक यंत्रणेवर व्यापक परिणाम होतो आणि म्हणूनच ही लस इतरही काही संसर्गजन्य आजारापासून बचाव करू शकेल, अशी शक्यता वाटते. कोरोना संसर्गावरही ही लस परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.
बीसीजीचा अन्य संसर्गांवर परिणाम
गिनी बिसाऊ या अफ्रिका खंडातल्या देशात बीसीजी लसीमुळे नवजात मृत्यूदर 38 टक्क्यांनी कमी झाल्याचं क्लिनिकल ट्रायलमध्ये निष्पन्न झालं आहे. बीसीजी लसीमुळे न्युमोनिया आणि सेप्सिस आजारही कमी झाले. त्याचाच परिणाम म्हणून बालमृत्यूदर 38 टक्क्यांनी कमी झाला.
दक्षिण आफ्रिकेतच या लसीवर झालेल्या अभ्यासावरून आढळून आलं की, या लसीमुळे नाक, घसा आणि फुफ्फुसांना होणाऱ्या संसर्गात 73 टक्क्यांची घट झाली. दुसरीकडे नेदरलँडमध्ये बीसीजी लसीमुळे यलो फिव्हरचं प्रमाण घटल्याचं आढळून आलं.
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर स्कूलमध्ये प्राध्यापक असलेले जॉन कॅम्पबेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "जागतिक पातळीवर हे संशोधन महत्त्वाचं ठरू शकतं. ही लस म्हणजे कोव्हिडवरचा उपचार नसला तरी जोपर्यंत कोव्हिडसाठीची लस किंवा त्यावर उपचार शोधून काढले जात नाही तोपर्यंत या लशीची मदत होऊ शकते."
बीसीजीवर ब्रिटनमध्ये सुरू असलेली चाचणी एका जागतिक संशोधनाचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, स्पेन आणि ब्राझील यासारख्या देशांमध्येदेखील दहा हजार लोकांवर ही चाचणी सुरू आहे.
एक्सेटरचे डॉ. सॅम हिल्टन या चाचणीत सहभागी झाले आहेत. कारण त्यांना कोरोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता इतर कुणाच्या तुलनेत जास्त आहे.
'कोरोनाचा प्रभाव कमी करेल'
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोरोनाची लागण झाली असेल तर बीसीजी तुमची प्रकृती अधिक ढासळू देणार नाही, याची दाट शक्यता वाटते. त्यामुळे मी स्वतःसाठी एक बचावात्मक उपाय म्हणून याकडे बघतो आणि म्हणूनच या हिवाळ्यातही मी कामावर जाऊ शकेन, याची शक्यता वाढली आहे."
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडनॉम गेब्रियेसीस यांनी लँसेट जर्नलमध्ये एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, "बीसीजी लसीमध्ये अशी क्षमता आहे की, आजारावर लस विकसित होत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम कमी करणारा उपाय म्हणून याचा उपयोग होऊ शकतो."
मात्र, बीसीजी दीर्घकालीन उपाय नाही.
ब्रिटनमध्ये साल 2005 पासून बीसीजी लस नियमितपणे देण्यात आलेली नाही. तिथे टीबीचं प्रमाण खूप कमी असणं, हे त्यामागचं कारण आहे.
दुसरं म्हणजे या लसीमुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अँटिबॉडीज आणि व्हाईट ब्लड सेल्स (पांढऱ्या रक्तपेशी) तयार करत नाही आणि कोरोना विषाणूशी लढण्यासाठी या दोन्हीची गरज आहे.
कोरोनासाठी इतर लशींचा वापर
बीसीजी लसीवर संशोधन सुरू असलं तरी कोरोनावर परिमाणकारक लस विकसित करणे, यालाच प्राधान्य आहे. अशा दहा लशी सध्या क्लिनिकल रिसर्चच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यातली एक लस युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने तयार केली आहे.
ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्राध्यापक अँड्र्यू पोलार्ड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बहुतांश लसी अशा पद्धतीने विकसित केलेल्या असतात की, त्या एखाद्या विशेष आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंना नष्ट करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सज्ज करतात. मात्र, भविष्यातही लस परिणामकारक ठरावी, यासाठी उत्तम रोगप्रतिकारक यंत्रणा तयार करण्यासाठी त्या विशेष जंतूशिवाय इतर जंतूंचा सामना करण्याचीही क्षमता विकसित करणं गरजेचं असतं."
ते म्हणतात, "अडचण अशी आहे की मी आज कोरोनापासून बचावासाठी दुसऱ्या लशीचा वापर करू शकता की नाही, हे सांगू शकत नाही. कारण त्यासाठीचे काही पुरावे नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)