You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक 2020: कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रंप, भारतीय वंशाचे मतदार कुणाला पसंती देणार?
- Author, ब्रजेश उपाध्याय
- Role, बीबीसी न्यूजसाठी, वॉशिंग्टन
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एवढे महत्त्वाचे का आहेत?
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रेटीक पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
इथला भारतीय समाज डेमोक्रेटीक पक्षाचा परंपरागत मतदार मानला जातो. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बरीच बदलली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना त्याचा कितपत फायदा मिळतो, याबाबत उत्सुकता आहे.
शनिवारच्या एका सकाळ-सकाळी फ्लोरिडातील उद्योजक डॅनी गायकवाड यांना एक फोन आला. ट्रंप यांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यापासून त्यांचं व्हॉट्सअॅपवर सतत मॅसेज येत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातात हात घालून फिरतानाचा एक व्हीडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी ह्यूस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमातील हा व्हीडिओ आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओला लाखो जणांनी पाहिलं आहे. सध्या अमेरिकेतील 2 हजारपेक्षा जास्त ग्रुप्सवर हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
गायकवाड हे फ्लोरिडामधील मोठे हॉटेल व्यावसायिक आणि रिअर इस्टेट डेव्हलपर आहेत. त्यांच्या मते, भारतीय मतदारांमधील हा उत्साह अभूतपूर्व असाच आहे.
"अमेरिकन-भारतीय नागरिकांसाठी देशावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी ट्रंप ही एक सुवर्ण-संधी आहे, 3 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकालात हेच चित्र मतपेटीतून दिसून येईल," असं गायकवाड यांना वाटतं.
पण डेमोक्रेटिक पक्षाला ट्रंप आणि मोदी यांच्या व्हीडिओची चिंता नाही.
उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस याच आपल्या हुकमी एक्का असल्याचं डेमोक्रेटिक पक्ष मानतो. त्यांच्यामुळे भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करणं, सोपं असल्याचं त्यांना वाटतं.
कमला हॅरीस यांचे वडील कृष्णवर्णीय आहेत. त्या स्वतःला कृष्णवर्णीयच मानतात. पण आपल्या प्रचारादरम्यान त्या आपल्या आईबाबत बोलताना दिसतात. त्यांची आई एक शास्त्रज्ञ आहे. ती आपल्या तरूण वयातच भारतातून अमेरिकेत स्थायिक झाली होती.
आतापर्यंत अमेरिकेतील भारतीयांमध्ये कमला हॅरीस यांची ओळख कृष्णवर्णीय अशीच होती. पण गेल्या काही दिवसांपासून कमला या आपल्या आईबाबत बोलताना दिसतात. आपली पाळंमुळं भारतातील असल्याचा उल्लेख त्या भाषणादरम्यान करतात.
अमेरिकेतील मॅसेच्यूसेट्समध्ये राहणारे रमेश कपूर एक उद्योजक आहेत. कमला हॅरीस यांना भारतीय वंशाच्या असण्याचा फायदा त्यांना निधी गोळा करताना होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.
गेल्या आठवड्यात डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार यांनी एक ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता. यावेळी त्यांनी एका दिवसात 15 लाख अमेरिकन डॉलर निधी जमा करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं होतं. पण त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच 33 लाख अमेरिकन डॉलर इतका निधी त्यांना मिळाला.
एका दिवसात जमा झालेली ही सर्वाधिक आणि विक्रमी रक्कम आहे. कमला हॅरीस यांच्यामुळेच हे शक्य झालं, असं कपूर यांना वाटतं.
कपूर यांनीच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मायकल डुकाकीज यांच्यासाठी 1988 मध्ये निधी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हापासूनच ते डेमोक्रॅटिक पक्षासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात.
अमेरिकेतील भारतीय मतदारांचा नेमका आकडा उपलब्ध नाही. पण ही संख्या जवळपास 16 ते 20 लाख इतकी असेल, असा राजकीय पक्षांचा अंदाज आहे.
2016 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला आघाडी मिळालेल्या राज्यांमध्ये भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे अटीतटीची लढाई झालेल्या मिशिगन आणि पेनिसेल्विनिया राज्यांमध्येही भारतीय मतदार लक्षणीय प्रमाणात आहेत.
त्यामुळेच भारतीय मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करताना दिसत आहेत.
डॅनी गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाला मिळणारी भारतीयांची मतं कमीत कमी 10 टक्क्यांनी वाढवण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. आता आपली ताकद दाखवून देऊ, अशी त्यांची भूमिका आहे.
रिपब्लिकन पक्षाने गेली अनेक वर्षे भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचं प्रयत्न केलं. पण 2016 मध्ये त्यांना यामध्ये काही प्रमाणात यश मिळालं.
ट्रंप यांच्या रॅडिकल इस्लामिक टेरर (कट्टर मुस्लीम दहशतवाद) विरोधी भूमिकेमुळे हिंदू मतं खेचून आणण्यात त्यांना यश आलं.
नरेंद्र मोदींच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेला ट्रंप यांचा पाठिंबा आहे, असा विश्वास अमेरिकेतील हिंदू समाजाला आहे.
कपूर यांच्या मते, "डेमोक्रेटिक पक्ष नेहमीच मानवी हक्कांबाबत लढा देतो. जो बायडेन आणि कमला हॅरीस यांनी भारताच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अमेरिकेतील भारतीयांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली होती."
"पण भारताच्या दृष्टीने ट्रंप हेच चांगले असतील आणि बायडेन वाईट असतील, असं म्हणणं चुकीचं आहे," असं कपूर यांना वाटतं.
"ज्या प्रकारे जेरुसलेम अमेरिकन ज्यू लोकांसाठी महत्त्वाचं आहे, त्याच प्रकारे अमेरिकन-भारतीयांसाठी काश्मीर महत्त्वाचं आहे, हे डेमोक्रेटिक पक्षाला माहीत आहे," असं कपूर सांगतात.
नरेंद्र मोदी यांच्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची ट्रंप यांना मदत झाल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि पत्नी मेलानिया ट्रंप कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शिकागोतील हिंदूंनी त्यांच्यासाठी यज्ञ आयोजित केलं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे ट्रंप यांना मतपेटीत लाभ होऊ शकतो.
2020 च्या एशियन अमेरिकन वोटर सर्व्हेनुसार, 65 टक्के मतदार बायडेन यांच्या तर तर 28 टक्के मतदार ट्रंप यांच्या बाजूने झुकलेले आहेत.
या लोकांचा प्रत्यक्ष मतदानातील टक्का वाढवणं, हे आव्हान डेमोक्रॅटिक पक्षासमोर आहे.
AAPI व्हिक्टरी फंड ही एशियन-अमेरिकन नागरिकांची एक संघटना आहे. त्याचे संस्थापक शेखर नरसिंहन यांना मते, सध्या प्रत्येक प्रमुख भारतीय भाषांमध्ये फोन बँकिंगसाठी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली आहे.
शेखर यांच्या मते, ग्रीन कार्डधारक भारतीय वंशाचे नागरिक तसंच नव्याने नागरिकत्व मिळवलेल्या नागरिकांची मतदानातील भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरेल."
"त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात," असं त्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)