You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : खोकल्यापेक्षाही वास घेण्याच्या क्षमतेवरून संसर्ग झालाय की नाही हे कळेल
- Author, रेचल स्क्रेअर
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
कोरोना व्हायरसची लागण झाली किंवा नाही, हे कसं कळेल? खोकला येणं हे कोरोनाचं लक्षण आहे, हे आतापर्यंत आपल्याला सांगण्यात आलं आहे.
पण खोकल्यापेक्षाही वास घेण्याची क्षमता गमावल्यास कोरोनाची लागण झाल्याचं चटकन कळू शकतं, असं संशोधनातून समोर आलं आहे.
लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये (UCL) चव आणि गंध घेण्याची क्षमता गमावलेल्या 590 जणांवर हा अभ्यास करण्यात आला. यापैकी 80 टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडी आढळून आल्या, तर अँटीबॉडी असलेल्यांपैकी 40 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती.
हे संशोधन फक्त सौम्य लक्षणं असणाऱ्या लोकांवरच करण्यात आलं होतं.
कोरोनाचा प्रसार फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू झाला. पण चव आणि गंध जाणं ही कोरोनाची प्रमुख लक्षण असल्याची माहिती एप्रिल-मे महिन्यात समोर आली होती.
सध्याच्या नियमावलीनुसार चव किंवा गंध घेण्याची क्षमता गमावलेल्या लोकांनी स्वतःच अलगीकरणात जावं. त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी सूचना आहे.
UCL साठी संशोधन करणाऱ्या टीमच्या प्रमुख रेचल बॅटरहॅम यांच्या मते, खोकला आणि ताप सध्या कोरोनाचं प्रमुख लक्षण म्हणून ओळखलं जातं.
त्यामुळे रेचल यांनी 23 एप्रिल ते 14 मेदरम्यान चव आणि गंध गमावणाऱ्या काही लोकांची यादी बनवली.
या सर्व लोकांची अँटीबॉडी चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये पाचपैकी चारजण पॉझिटिव्ह आढळून आले.
"त्यांच्या चव आणि गंध घेण्याच्या क्षमतेच्या चाचणीसाठी दैनंदिन कामादरम्यान काही गोष्टी तपासण्यात आल्या. परफ्यूम, ब्लिच, टूथपेस्ट किंवा कॉफी यांची चव किंवा गंध त्यांना कळते किंवा नाही, याचं निरीक्षण करण्यात आलं," असं प्रा. बॅटरहॅम सांगतात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
चव आणि गंध क्षमता गेलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता जास्त असल्याचं यामध्ये दिसून आलं. पण गंध न कळणाऱ्या लोकांचं नाक चोंदलेलं नव्हतं किंवा त्यांना सर्दीही नव्हती, हे विशेष.
कोरोना व्हायरस शरीरात गेल्यानंतर चव आणि गंध कळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ग्रंथींवर हल्ला करतो, त्यामुळेच असं घडतं, हे संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळेच सर्दी किंवा फ्लूपेक्षा ही लक्षणं वेगळी आहेत.
लंडनमधील किंग्ज कॉलेजचे संशोधक कोव्हिड लक्षणांसंदर्भात एक अॅप चालवतात. या अॅपमधील आकडेवारीत 60 टक्के रुग्णांनी चव किंवा गंध गमावल्याची माहिती समोर आली.
पण त्यांच्यात आढळलेली लक्षणं सौम्य होती. त्यांना क्वचितच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती बॅटरहॅम यांनी दिली.
यामुळे भाजी करपल्याचा, गॅस लिकेजचा किंवा धुराचा वास त्यांना कळू शकत नाही, याचा त्यांना धोका होऊ शकतो. याचा लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर गंभीर परिणामसुद्धा होऊ शकतो.
अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या घरात यामुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची भीती आहे, तसंच गंध कळत नसल्याने कचऱ्याची दुर्गंध, धुराचा वास किंवा इतर गोष्टींच्या वासाची जाणीव होत नाही. पण सातत्याने ही दुर्गंध नाकात जात असल्यामुळे गंध घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत कोरोनाच्या संसर्गातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा तुम्हाला ही क्षमता प्राप्त होऊ शकणार नाही.
"कोरोनाची इतर कोणतीही लक्षणं न दिसता फक्त चव आणि गंध क्षमता गमावलेले अनेकजण आहेत, त्यांना अशा प्रकारचा धोका उद्भवू शकतो," असं बॅटरहॅम सांगतात.
बॅटरहॅम यांचं हे संशोधन घेण्यात आलं तेव्हा चव आणि गंध जाणं यांचा लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला नव्हता, हे विशेष.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)