कोरोनाची लस आल्यावर सगळं एका रात्रीत ठीक होईल का?

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोनाची लस आल्यावर सगळं एकदम नीट होऊन जाईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे विचार चुकीचे असू शकतात. काही प्रमुख शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.

लस आली की कोरोनाची सगळी साथ लगेच संपून जाईल अशा पद्धतीने सध्या लशीकडे पाहिलं जात आहे. पण लशीमुळे नक्की काय होईल याकडे अधिक तर्कशुद्ध आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे, असं रॉयल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी एका अहवालात म्हटलं आहे.

लस कधीही आली तरी ती लोकांपर्यंत जायला किमान एका वर्षाचा काळ जाऊ शकतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. अशा स्थितीत कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हळूहळू हटवले जाणं आवश्यक आहे.

जगभरात सध्या 200 ठिकाणी लशीचे प्रयोग सुरू आहेत. काही लशी क्लिनिकल ट्रायलपर्यंत पोहोचल्या आहेत.

इंपीरियल कॉलेज लंडनच्या नॅशनल हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. फियोना कुली यांच्या मते लशीबद्दल काहीही माहिती मिळाल्यावर कोरोनाची साथ संपून जाईल असा विश्वास वाटू लागतो. परंतु लशीच्या संशोधनामध्ये अनेकदा अपयश आलंय हे सुद्धा विसरता कामा नये.

ब्रिटन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांसह अनेक लोकांना या वर्षअखेरीपर्यंत लस तयार होईल अशी आशा आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होईल असंही त्यांना वाचतं. रॉयल सोसायटीने मात्र ही एक दीर्घ प्रतिक्रिया असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये केमिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक निलय शाह म्हणतात, "लस तयार झाली असं गृहीत धरलं तर त्याचा अर्थ महिन्याभरात सर्वांना लस टोचून पूर्ण होईल असा अजिबात नाही. त्यासाठी सहा महिने लागू शकतात, नऊ महिने लागू शकतात, कदाचित वर्षंही जाऊ शकतं."

मार्च पर्यंत अचानक सगळं काही सुरळीत होईल असा विचारच करता येणार नाही. या बाबतीत अनेक अडथळे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

अर्थात काही प्रायोगिक मार्गांचा वापरही केला जात आहे. आरएनए डोस मोठया प्रमाणात केले जात आहेत, याआधी असे कधीही केले गेले नव्हते.

या मार्गातील अडचणी कोणत्या?

लस तयार करण्यासाठी कच्च्या मालाची गरज आहे. लस तयार करण्यासाठी फक्त काचेच्या बाटल्याच नाही तर रेफ्रिजरेशनची सुविधा हेसुद्धा एक आव्हान आहे. काही लशी उणे 80 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवण्याची गरज असते.

प्रा. शाह यांच्या मतानुसार, "दरवर्षी सामान्य फ्लू दूर करण्यासाठी जशी पावलं उचलली जातात तशी कोरोनाला पळवण्यासाठी त्या प्रयत्नांच्या दहापट वेगानं काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षित स्टाफची आवश्यकता लागेल. यावर गांभीर्यानं विचार केला जात आहे का याचीच मला काळजी आहे."

काही लशींच्या प्राथमिक परीक्षणानंतर त्यांच्यामुळे रोगप्रतिकारकक्षमता वेगवान झाल्याचं दिसून आलं. पण त्या पूर्ण सुरक्षित असून कोव्हिडची लक्षणं कमी करतील असा काही त्याचा अभ्यास झालेला नाही.

अनेक प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळाली नाहीत

इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये इम्यूनोलॉजीचे प्रमुख प्राध्यापक चार्ल्स बांगम म्हणतात, "कोणती लस कधी तयार होईल हे आम्हाला खरंच माहिती नाही. ती किती प्रभावी असेल हे सुद्धा माहिती नाही आणि ती कधी उपलब्ध होईल हेसुद्धा माहिती नाही."

ते पुढे म्हणतात," जर हे शक्य झालं तर सर्वकाही लवकरात लवकर सुरळीत येण्याची शक्यता वाढीला लागेल "

तसेच लशीसंदर्भातही काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत

लशीचा एकच शॉट पुरेसा असेल की आणखी बूस्टर डोसची गरज लागेल? ही लस वर्ष-दोन वर्षांच्या अंतराने परत घेण्याची गरज आहे का?

वृद्ध व्यक्तींवरही ती तितक्याच प्रभावीपणे उपयोगी पडेल का?

याबाबत बोलताना बाथ विद्यापीठाचे डॉ. अँड्र्यू प्रेस्टन सांगतात, "लशीकडं एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे पाहिलं जात आहे. ती आल्यावर साथ तात्काळ जाईल असं चित्र रंगवलं जात आहे. परंतु त्याचा प्रभाव दिसायला वेळ लागेल."

त्यांचं म्हणणं आहे लसीकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी देशात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी 'व्हॅक्सिन पासपोर्ट' तयार करावा लागेल.

कोरोना लसीबाबतीत लोकांमध्ये तणावही वाढल्याचं ते सांगतात. एखाद्या व्यक्तीनं आपल्या जोडीदाराला लस द्यायला नकार दिला तर दुसऱ्यांना त्यामुळे अपाय होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला लस अनिवार्य केली जाईल का असेही प्रश्न मनात आहेत.

अशा अनेक प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)