FinCEN फाईल्स: दाऊद इब्राहिम, लष्कर आणि जैश यांच्यासाठी कोण करत होतं पैशाची अफरातफर?

दाऊद इब्राहिम

फोटो स्रोत, OTHER

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

अनेक बड्या बँकांच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांमध्ये आर्थिक अफरातफर करणाऱ्या गुंतागुंतीच्या जाळ्याचा गौप्यस्फोट शोधपत्रकारांनी केला आहे.

आर्थिक अफरातफरीला आळा घालणाऱ्या 'फायनान्शिअल क्राइम्स एन्फोर्समेन्ट नेटवर्क' (फिनसेन) या अमेरिकी संस्थेच्या 'संशयास्पद व्यवहार अहवालां'द्वारे पाकिस्तान ते दुबई आणि अमेरिका इथपर्यंत होणाऱ्या अफरातफरींचं मोठं जाळं प्रकाशात आलं आहे.

'संशयास्पद व्यवहार अहवाल' अर्थात 'सस्पिशस अॅक्टिव्हिटी रिपोर्ट' या नावाचा संक्षेप 'एसएआर' असा होतो. 'इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' (आयसीआयजे) या शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने अशा हजारो दस्तावेजांचं विश्लेषण करून अशी अनेक गुपितं उघड केली आहेत. बीबीसीसुद्धा आयसीआयजेशी संलग्न आहे.

आर्थिक अफरातफरीचं हे जाळं अल्ताफ खनानी नावाचा एक पाकिस्तानी नागरिक चालवत होता. भारतातून फरार झालेला गुंड दाऊद इब्राहिमच्या पैशांची देखभाल करणारा मुख्य माणूस म्हणून खनानी ओळखला जातो.

न्यूयॉर्कमधील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दाखल केलेल्या या एसएआर अहवालांचा तपास 'इंडियन एक्सप्रेस' या भारतीय वर्तमानपत्राने केला असून हे वर्तमानपत्रही आयसीआयजेमध्ये सहभागी आहे.

फिनसेन फायलींमधून जे गोपनीय दस्तावेज समोर आले आहेत त्यावरून असं लक्षात येतं की, मोठ्या बँकांनी विविध गुन्हेगारांना जगभरामध्ये पैशांचे व्यवहार करण्यासाठी संमती दिलेली आहे.

खनानीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसोबतच तालिबान व अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांसाठीसुद्धा 14 ते 16 ट्रिलियन डॉलरची अफरातफर कित्येक दशकं केली आहे, असं या संदर्भातील 'संशयास्पद व्यवहार अहवाला'तून कळतं. खनानीच्या या धंद्याला अमेरिकी अधिकाऱ्यांनी 'मनी लॉन्डरिंग ऑर्गनायझेशन' (एमएलओ) असं संबोधलं आहे.

जगभर सुरू झालेल्या तपासप्रक्रियेनंतर 11 सप्टेंबर 2015 रोजी खनानीला पनामा विमानतळावर अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी मियामीतील तुरुंगात झाली. जुलै 2020 मध्ये त्याचा तुरुंगवास संपल्यानंतर हस्तांतरणासाठी त्याला अमेरिकी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलं. परंतु, यानंतर अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्याला पाकिस्तानात पाठवलं की संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवलं, हे स्पष्ट झालं नाही.

अमेरिकेच्या 'परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालया'ने (फॉरेन अॅसेट्स कंट्रोल ऑफिस: ओएफएसी) खनानीच्या अटकेनंतर त्याच्यावर निर्बंध घातले आणि दाऊद इब्राहिमशी असलेल्या त्याच्या संबंधांची कागदपत्रंही तयार करण्यात आली.

दाऊद इब्राहिम

फोटो स्रोत, Getty Images

ओएफएसीने 11 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे, "खनानीच्या एमएलओने दहशतवाद्यांसाठी, अंमली पदार्थांच्या तस्करांसाठी व गुन्हेगारी संघटनांसाठी जगभरात अब्जावधी डॉलरांची तजवीज केली, त्यासाठी अनेक वित्तीय संस्थांमधील आपल्या संबंधांचा उपयोग करून घेतला. खनानी एमएलओ व अल जुरानी एक्सेन्जचा म्होरक्या असलेल्या अल्ताफ खनानीने तालिबानसारख्या संघटनेसाठीही आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचप्रमाणे लष्कर-ए-तय्यबा, दाऊद इब्राहीम, अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशीही त्याचे संबंध होते."

खनानीची अटक हे या प्रकरणातील एक मोठं यश आहे, असं भारतीय गुप्तचर संस्थांना वाटत होतं. विशेषतः दाऊद इब्राहीमसोबतच लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांशीही खनानीचे संबंध असल्याचं ओएफएसीने म्हटलं असल्यामुळे ही अटक महत्त्वाची मानली जात होती.

खनानीवर निर्बंध घातल्याची घोषणा करणारी पहिली नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर बरोब्बर एक वर्षाने, 10 ऑक्टोबर 2016 रोजी खनानीशी व खनानी एमएलओशी संबंधित इतर काही लोकांच्या नावांची यादीही जाहीर केली, ही महत्त्वाची बाब आहे. या यादीमध्ये खनानीच्या कुटुंबातील अनेक लोक आणि काही 'संस्थां'च्या नावांचा समावेश होता- हे लोक व संस्था पाकिस्तानात असून खनानीला व त्याच्या जाळ्याला मदत करत होते.

या यादीमध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर दुबईस्थित मजाका जनरल ट्रेडिंग लिमिटेड कंपनीचं नाव आहे. या कंपनीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर चार वर्षांनी आता उघड झालेल्या फिननेस फायलींमधून खनानी एमएलओची 'मॉस्को मिरर नेटवर्क'मधील आर्थिक पोच अतिशय खोलवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एखादी व्यक्ती किंवा संस्था एका ठिकाणाहून रोखे विकत घेऊन कोणत्याही आर्थिक लाभाविना दुसऱ्या ठिकाणी विकते. अशा रितीने रकमेचा मूळ स्त्रोत व अंतिम ठिकाण यांची माहिती लपवली जाते, या अनौपचारिक व्यवहाराला 'मिरर ट्रेडिंग' असं म्हणतात.

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

54 'शेल कंपन्यां'ची (बनावट कंपन्यांची) नावं असलेला वीस पानांचा गुप्तचर अहवालही फिनसेन फायलींमध्ये समाविष्ट आहे. वास्तवामध्ये कोणताही व्यवसाय न करणाऱ्या, तर केवळ विनिमयाच्या कागदोपत्री व्यवहारांवरच उभ्या असलेल्या कंपन्यांना 'शेल कंपन्या' असं संबोधतात.

या 54 कंपन्या 2011 सालापासूनच रशिया व युरोपातील बाजारपेठांमध्ये वर्षाकाठी अब्जावधी डॉलरांची अफरातफर करत होत्या.

फिनसेन गुप्तचर अहवालानुसार 'मजाका जनरल ट्रेडिंग कंपनी'ला मार्च 2013 ते ऑक्टोबर 2016 या कालावधीमध्ये 'मॉस्को मिरर नेटवर्क'मधील संस्थांच्या माध्यमातून 4 कोटी 97 लाख 80 हजार डॉलर रक्कम मिळाली होती. त्याचप्रमाणे 'मजाका'ने सिंगापूरमधील 'आस्क ट्रेडिंग पीटीई' नावाच्या एका कंपनीसोबतही व्यवहार केला होता.

दहशतवाद्यांना बेकायदेशीर पैसा पुरवणाऱ्या 'खनानी मनी लॉन्डरिंग ऑर्गनायझेशन'ची मदत केल्याबद्दल 'मजाका'वर ओएफएसीने निर्बंध घातले.

'खनानी' व 'मजाका' यांच्या या कथेमध्ये काही भारतीय दुवेही जोडले जाताना दिसतात. उघडकीस आलेल्या दस्तावेजांनुसार, 'मजाका जनरल ट्रेडिंग' आणि 'आस्क ट्रेडिंग पीटीई' यांच्यातील विनिमयामध्ये न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन आणि सिंगापूरमधील ओव्हरसीज बँक यांच्यासोबतच बँक ऑफ बडोदाच्या दुबई शाखेचाही वापर झाला.

याव्यतिरिक्त, 'मजाका जनरल ट्रेडिंग'च्या खात्यांचा तपास केल्यानंतर नवी दिल्लीतील 'रंगोली इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचंही नाव समोर आलं. कपड्यांच्या घाऊक व्यवसायामधील या कंपनीची स्थापना 2009 मध्ये झाली होती.

फिनसेन फायलींमध्ये 'रंगोली इंटरनॅशनल'च्या नावापुढे जवळपास 70 व्यवहारांची नोंद आहे. पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स अशा अनेक भारतीय बँकांमार्फत हा व्यवहार संयुक्त अरब अमिरातीकडे वळवण्यात येत होता.

17 ठिकाणांवरून चाललेल्या या अफरातफरीचा आकडा एक कोटी सहा लाख 50 हजार डॉलरपर्यंत जातो. यातील एक महत्त्वाचा व्यवहार 18 जून 2014 रोजी झाला, त्या वेळी 'मजाका जनरल ट्रेडिंग'ला पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 1,36,354 डॉलर पाठवण्यात आले.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या (आरओसी) दस्तावेजांनुसार, मार्च 2014 च्या दरम्यान 'रंगोली इंटरनॅशनल'च्या नफ्यामध्ये मोठी घट झाली. त्या वेळी 339.19 कोटी महसुलावर कंपनीला 74.87 कोटी नुकसान सहन करावं लागलं. 2015नंतर कंपनीने आजतागायत समभागधारकांची वार्षिक बैठकही घेतलेली नाही किंवा आपला वार्षिक ताळेबंदही सादर केलेला नाही.

अनेक भारतीय बँकांनी 'रंगोली'च्या गैरव्यवहारांबद्दल इशाराही दिला आहे. 'रंगोली इंटरनॅशनल'कडून थकबाकी असलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी कंपनीच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची नोटीसही भारतीय यूनियन अँड कॉर्पोरेशन बँकेने बजावली होती.

फिनसेन

अलाहाबाद बँकेने तर 2015 सालीच या कंपनीला आपल्या 50 निष्क्रिय मालमत्तांच्या यादीत समाविष्ट केलं होतं.

इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आयसीआयजे) या संस्थेच्या वतीने संपर्क साधण्यात आल्यानंतर अल्ताफ खनानीच्या वकिलांनी ई-मेलद्वारे कळवलं की, "श्रीयुत खनानी यांनी त्यांची चूक कबूल केली आहे आणि त्याची मोठी तुरुंगवासाची शिक्षा त्यांनी भोगली आहे. दरम्यानच्या काळात ते आपल्या कुटुंबीयांपासून वेगळे राहिले आणि त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. आता त्यांच्याकडे काहीही पैसा उरलेला नाही, सगळी खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि ओएफएसीच्या निर्बंधांमुळे पुन्हा पैसे कमावण्याची त्यांची सगळी आशा लोप पावली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी एकही व्यापारी व्यवहार केलेला नाही. इथून पुढे ते कायदा पाळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जगू इच्छितात."

'रंगोली इंटरनॅशनल'चे प्रबंध व्यवस्थापक लव भारद्वाज यांनी आयसीआयजेला उत्तर देताना सांगितलं की, "2013 ते 2014 या काळातील ज्या 70 व्यवहारांबद्दल आपण विचारत आहात, त्याबद्दल आमच्याकडे कोणत्याही नोंदी केलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल काही सांगणं शक्य होणार नाही."

"आम्ही कपड्यांचा व्यापार करतो आणि माल विकल्यानंतर नुकसान भरपाईच्या रूपात आमच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा होणं, हा नित्यक्रमाचा भाग आहे. 18 जून 2014 रोजी पंजाब नॅशनल बँकेशी झालेल्या ज्या व्यवहाराबद्दल आपण बोलत आहात, त्याची काही नोंद आमच्याकडे केलेली नाही. 'मजाका जनरल ट्रेडिंग' व अल्ताफ खनानी यांच्याशी आमचे कोणतेही व्यापारी संबंध नाहीत आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही," भारद्वाज सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)