You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकणारे स्वस्त स्टेरॉईड्स
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोव्हिड-19 आजारावर जगभरात वेगवेगळे प्रयोग आणि संशोधनं सुरू आहेत. अशाच एका संशोधनातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सहज आणि स्वस्त किंमतीत उपलब्ध असलेले स्टेडॉईड्स कोव्हिड-19च्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात.
अतिदक्षता विभागात दाखल गंभीररित्या आजारी कोव्हिड रुग्णावर आधीपासून वेगवेगळे स्टेरॉईड्स देऊन उपचार सुरू आहेत. त्यावर या संशोधनाने शिक्कामोर्तब केलं आहे.
JAMA या अमेरिकन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधनाचे निष्कर्ष असं सांगतात की, स्टेरॉईड्समुळे 100 पैकी 8 रुग्णांचे प्राण बचावू शकतात.
संशोधकांच्या मते हे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. मात्र, स्टेरॉईड्स कोरोना विषाणूवरचा उपचार नसल्याचंही ते भर देऊन सांगतात.
जून महिन्यातच युकेमधल्या पहिल्या ट्रायलमध्ये आढळून आलं होतं की, डेक्सामेथॉसॉन नावाच्या स्टेरॉईडमुळे गंभीर कोरोनारुग्णांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
या नव्या संशोधनात जगभरातल्या त्या सर्व क्लिनिकल ट्रायल्सचा एकत्रित अभ्यास करण्यात आला, ज्यात गंभीर कोरोनारुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड्सचा वापर करण्यात आला.
यात डेक्सामेथॉसॉन स्टेरॉईड उपयुक्त ठरत असल्यावर शिक्कामोर्तब झालं, तसंच हायड्रोकोर्टिसॉन नावाच्या स्टेरॉईडचेदेखील रुग्णावर सकारात्मक परिणाम दिसले.
या नव्या संशोधनाविषयी बोलताना लंडनमधल्या इम्पेरियल कॉलेजमधले प्राध्यापक अँथोनी गॉर्डन म्हणाले, "वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की, यावर कुठलाच उपचार नाही. त्यामुळे कधीकधी निराशा दाटून यायची."
"तो काळ खूप काळजीत टाकणारा होता. मात्र, सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच या आजाराचा सामना कसा करायचा, याबाबत उच्च गुणवत्तेच्या क्लिनिकल ट्रायल्समधून आपल्याला स्पष्ट आणि विश्वासार्ह पुरावे सापडले आहेत."
1703 गंभीर रुग्णांवर झालेल्या प्रयोगातून समोर आलेले निष्कर्ष-
- स्टँडर्ड ट्रिटमेंट म्हणजे प्रमाणित उपचार दिलेले 40% रुग्ण दगावले
- तर जेव्हा गंभीर रुग्णांना स्टेरॉईड्स देण्यात आले त्यावेळी केवळ 32% रुग्ण दगावले
हा अभ्यास केवळ गंभीररित्या आजारी आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर करण्यात आला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर रुग्णांना केवळ सौम्य लक्षणं आढळून येतात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल न होताच घरीच उपचार घेऊनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे होतात.
स्टेरॉईड्स शरीराच्या आतील सूज आणि रोगप्रतिकारक यंत्रणेला शांत करतात. याच कारणामुळे आर्थरायटिस आणि दम्याच्या रुग्णांवर तसंच गंभीर इन्फेक्शन झालेल्या रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा वापर करतात.
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्राथमिक टप्प्यात खोकला, ताप, अचानक गंध आणि चव जाणे, अशी लक्षणं दिसतात. मात्र, त्यावर स्टेरॉईड्सचा फारसा उपयोग होत नाही.
मात्र, जसजसा आजार बळावत जातो शऱीराची रोगप्रतिकारक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह होते. रोगप्रतिकारक यंत्रणा खूप जास्त काम करू लागली की, त्याचा फुफ्फुस आणि इतर अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतो.
आजाराच्या या टप्प्यावर स्टेरॉईड्स उपयुक्त ठरत असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक मार्टिन लँड्रे म्हणतात, "ज्या क्षणी कोव्हिड-19 च्या रुग्णाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडते तेव्हाच त्याला स्टेरॉईड्सची गरज आहे."
"संशोधनाचे हे निष्कर्ष तात्काळ उपयोगात आणण्यासारखे आहेत. स्टेरॉईड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. स्वस्त असतात आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यावर संशोधनही झालेलं आहे."
यावर्षीच्या सुरुवातीला आलेल्या परिणामांनंतर जगभरातले डॉक्टर्स डेक्सामेथॅसॉन वापरत आहेत. मात्र, स्टेरॉईड्सचे पर्याय उपलब्ध असतील तर जगभरात त्याचा वापर वाढेल, अशी आशा आहे.
स्टेरॉईड्स टॅबलेट स्वरुपातही घेता येतात किंवा आयव्ही ड्रीपच्या माध्यमातूनही शरीराला स्टेरॉईड्सचा पुरवठा करता येतो.
आतापर्यंत जे संशोधन करण्यात आलं आहे त्यात स्टेरॉईड्स कमी प्रमाणात वापरण्यात आलं आहे. जास्त प्रमाणात वापरल्यास त्याचा अधिक फायदा होतो, असे कुठलेही पुरावे अजूनतरी आढळलेले नाहीत.
नव्या संशोधनानंतर जागतिक आरोग्य संघटना डॉक्टरांसाठी काही नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करू शकते.
यूकेतील NHSचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर सायमन स्टिव्हन्स यांनी म्हटलं आहे, "डेक्सामेथॅसॉनप्रमाणेच NHS आता हे निश्चित करण्यासाठी तात्काळ कृती करेल की ज्या रुग्णांना हायड्रोकार्टिसोनचा लाभ होऊ शकतो त्यांना ते देण्यात यावं. या संशोधनामुळे कोव्हिड-19 विरोधात जगभरात सुरू असलेल्या युद्धाच्या शस्त्रागारात आणखी एका अस्त्राचा समावेश झाला आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)