You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शार्ली एब्दो यांनी पुन्हा पैगंबर मोहम्मद यांच्यावरील व्यंगचित्र का छापलं?
फ्रान्समधील व्यंगचित्र पत्रिका शार्ली एब्दो यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या आयुष्यावरील व्यंगचित्र पुन्हा छापलं आहे.
2015 मध्ये त्यांनी हे व्यंगचित्र पहिल्यांदा छापलं होतं. वादग्रस्त अशा या व्यंगचित्रामुळे शार्ली एब्दोच्या कार्यालयावर कट्टरतावाद्यांनी हल्लाही केला होता.
7 जानेवारी 2015 रोजी शार्ली एब्दोच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी मदत करणाऱ्या 14 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. या खटल्याची सुनावणी सुरू होण्याच्या वेळेस हे व्यंगचित्र पुनर्प्रकाशित करण्यात आलं आहे.
कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात मुख्य व्यंगचित्रकारासह बारा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्याच्या घटनेनंतर पॅरिसमध्ये झालेल्या आणखी एका हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचं सत्रच सुरू झालं होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
शार्ली एब्दोच्या ताज्या अंकात मुखपृष्ठावर पैगंबर मोहम्मद यांच्यासंदर्भातील 12 व्यंगचित्र छापण्यात आली आहेत. शार्ली एब्दोत ही व्यंगचित्रं प्रसिद्ध होण्यापूर्वी डेन्मार्कमधील वृत्तपत्राने ही व्यंगचित्रं छापली होती.
यापैकी एका व्यंगचित्रात पैगंबर यांच्या डोक्याला बाँब बांधल्याचं दाखवण्यात आलं आहे. फ्रेंच भाषेत मथळा देण्यात आला आहे. त्याचा अर्थ असा होतो- ते सगळं याच्यासाठीच केलं होतं.
शार्ली एब्दोचं काय म्हणणं?
संपादकीयमध्ये म्हटलं आहे, 2015 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आम्हाला सांगण्यात येत होतं की तुम्ही व्यंगचित्रं छापत राहा.
तसं करायला आम्ही नेहमीच नकार दिला. कारण हे नाही की, तसं करायला प्रतिबंध होता. कायद्याने आम्हाला अशा स्वरुपाचं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ही व्यंगचित्रं छापण्यासाठी चांगलं निमित्त असणं आवश्यक होतं. असं निमित्त जे उचित असेल आणि ज्यामुळे चर्चेला सुरुवात होईल.
2015 मध्ये झालेल्या हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही व्यंगचित्रं छापणं आम्हाला आवश्यक वाटलं.
सुनावणीत काय होणार आहे?
शार्लो एब्दोच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या लोकांसाठी शस्त्रं गोळा करणं आणि त्यांना मदत करणं याव्यतिरिक्त सुपरमार्केटमध्ये एका पोलिसावर हल्ला करण्यासाठी मदत केल्याचा 14 जणांवर आरोप आहेत.
तीन जणांच्या अनुपस्थितीत हा खटला सुरू आहे कारण हे तिघे उत्तर सीरिया किंवा इराक इथे पळून गेल्याचं मानलं जात आहे.
फ्रान्समधील प्रसारक आरएफआई यांच्या मते, 200 याचिकाकर्ते तसंच हल्ल्यातून वाचलेले लोक सुनावणीदरम्यान साक्ष देऊ शकतात.
या खटल्याची सुनावणी मार्च महिन्यात होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सुनावणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालेल असा अंदाज आहे.
2015 मध्ये काय घडलं होतं?
सात जानेवारीला सॅड आणि चेरिफ कोची नावाच्या भावांनी शार्ली एब्दोच्या कार्यालयात घुसून गोळीबाराला सुरुवात केली. संपादक स्टीफेन चार्बोनियर, चार व्यंगचित्रकार, दोन स्तंभलेखक, एक कॉपी एडिटर, एक केअरटेकर आणि एक पाहुणे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात संपादकांचे सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी या भावांचा शोध सुरू केला तेव्हा आणखी एक हल्ला घडला. या भावांच्या सहकाऱ्याने ज्यू सुपरमार्केटमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. ज्यू सुपरमार्केटमधील अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं. याच व्यक्तीने 9 जानेवारीला चार ज्यू लोकांची हत्या केली. पोलिसांच्या गोळीने या व्यक्तीचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हीडिओत हा माणूस असं म्हणाला की, इस्लामिक स्टेट संघटनेच्या वतीने हे काम करण्यात आलं.
शार्ली एब्दोवर हल्ला करणाऱ्या भावांचाही पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात मृत्यू झाला.
शार्ली एब्दोला लक्ष्य का करण्यात आलं?
सत्तेत असणाऱ्यांविरोधातील व्यंगचित्र छापण्याचं काम शार्ली एब्दो करतं. जहाल उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन, ज्यू तसंच इस्लामिक श्रद्धांसंदर्भात शार्ली एब्दो नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे.
पैगंबर मोहम्मद यांच्यासंदर्भातील व्यंगचित्र छापल्यानंतर शार्ली एब्दोला अनेक धमक्या मिळाल्या होत्या. 2011 मध्ये शार्ली एब्दोच्या कार्यालयावर पेट्रोल बाँबने हल्ला करण्यात आला होता.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून आमची व्यंगचित्र योग्य असल्याचा दावा शार्ली एब्दोच्या संपादकांनी केला होता. 2012 मध्ये एपी या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, आमची व्यंगचित्रं पाहून मुसलमानांना हसू आलं नाही तर आम्ही त्यांना दोष देणार नाही. आम्ही फ्रान्समधील कायदेशीर चौकटीत राहतो. कुराणमधील कायदे मला लागू होत नाहीत.
2015 मध्ये हल्ल्यानंतर शार्ली एब्दोच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. #jeSuisCharlie (मी चार्ली आहे) नावाचा हॅशटॅग आणि घोषणा जगभर प्रसिद्ध झाली होती.
पाकिस्तानने केला होता विरोध
पैगंबरांच्या व्यंगचित्रासंदर्भात पाकिस्तानने शार्ली एब्दोचा निषेध केला होता.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्वीटवर हँडलवरून प्रतिक्रिया देण्यात आली होती. फ्रान्समधील शार्ली एब्डो या व्यंगचित्र पत्रिकेने पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भातील व्यंगचित्र छापण्याच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. कोट्यवधी मुसलमानांच्या भावना दुखावणारी ही कृती केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली योग्य ठरवली जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या कृत्यामुळे जगभरातील शांतता, बंधूभाव आणि सामाजिक सौहार्द धोक्यात येऊ शकतं असंही पुढे म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)