अलेक्सी नावालनी: रशियातील रहस्यमयी विषप्रयोगाची कहाणी

फोटो स्रोत, ANADOLU AGENCY
रशियातील पुतिन सरकारच्या धोरणांचे समीक्षक, टीकाकार यामध्ये माजी गुप्तहेर, पत्रकार, राजकीय नेते सामील आहेत अशा लोकांना लक्ष करून त्यांना गेल्या दोन दशकांमध्ये विष देण्यात आलं आहे असा आरोप होतो.
रशियाच्या सिक्रेट सर्व्हिसच्या दोन एजंट्सना ब्रिटनमध्ये लक्ष्य करण्यात आलं.
अलेक्झांडर लित्वीनेंको यांच्यावर रेडिओअक्टिव्ह पोलोनियम 210ने 2016 मध्ये हल्ला करण्यात आला होता. सर्जेई स्क्रीपाल यांना नर्व्ह एजंट नोविचोकने 2018 मध्ये मारण्यात आलं.
दोन्ही घटनांमध्ये सहभाग असल्याचा रशियाने इन्कार केला आहे.
अलेक्सी नावालनी, ज्यांच्यावर याआधीही हल्ला झाला आहे हे विषारी हल्ल्याचे नवीन शिकार आहेत. मात्र त्यांच्या प्रकरणात नक्की काय घडलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
विष देण्यात आल्याच्या रशियातील रहस्यमय घटना अनेकदा रहस्यमयच राहतात.
रॉयल युनायटेड सर्व्हिसेसशी संलग्न रशियासंदर्भातील विषयांचे जाणकार प्राध्यापक मार्क गेलियोटी सांगतात, "विषाचे दोन गुणधर्म असतात. सूक्ष्मता आणि नाटकीपणा. विष इतकं सूक्ष्म असतं की तुम्ही इन्कार करू शकता आणि विष देण्यात आलं हे सिद्ध करणं अवघड आहे. विषाचा परिणाम व्हायला वेळ लागतो, वेगवेगळ्या स्वरुपाचा त्रास होतो. विष देणारा डोळे मिचकावून विष दिलंच नाही असा इन्कार करू शकतो, जेणेकरून बाकीच्यांना इशारा मिळेल."
उड्डाणापूर्वी विष
एलेक्सी नावालनी रशियातले प्रसिद्ध असे भ्रष्टाचारविरोधी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मोठ्या हवाई प्रवासापूर्वी एखाद्याला विष देण्यात आलं तर तो माणूस प्रदीर्घ काळासाठी प्रवासातच अडकून राहतो. विष देणाऱ्याला फरार होण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो.
44 वर्षीय नावालनी यांची सायबेरियाच्या टोम्स्कहून निघालेल्या विमानात असताना तब्येत ढासळली. विमानाने मार्ग बदलून ते ओम्स्क इथे उतरवण्यात आलं.
रशियातील शोधपत्रकार आणि पुतिन यांचे समीक्षक एना पोलितकोव्सकाया यांची 2006 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
2004 मध्ये एका हवाई प्रवासादरम्यान त्यांना विष देण्यात आल्याचा दावा केला जातो. त्यांचीही प्रकृती अशीच ढासळली आणि त्या बेशुद्ध पडल्या.

फोटो स्रोत, EPA
याचपद्धतीने संथपणे शरीरात भिनणाऱ्या पोलोनियम-210ने लित्वीनोंको यांचा यातनामय मृत्यू झाला. दुर्लभ अशा या विषाचं परीक्षण करायलाही काही आठवडे गेले होते. यातून अल्फा पार्टिकल रेडिएशन बाहेर पडतं. गीगर काऊंटरच्या माध्यमातून याचं परीक्षण करता आलं नव्हतं.
ब्रिटनमध्ये झालेल्या परीक्षणात ज्या संशयित गुप्तहेरांचं नाव समोर आलं होतं त्यांच्याकडे संशयित म्हणून नजरेत न येता देश सोडण्यासाठी पुरेसा अवधी होता. ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, लित्वीनेंको यांचा मृत्यू रशियाच्या दोन गुप्तहेरांमुळेच ओढवला.
नावालनी यांना रशियात अनेकांचं शत्रूत्व ओढवून घेतलं होतं. केवळ पुतिन समर्थक पक्षातली माणसं नाहीत. पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची त्यांनी चोर आणि बेईमान लोकांचा पक्ष अशी हेटाळणी केली होती.
पुतिन 2000 मध्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी गुप्तहेर संघटना केजीबीत काम करत होते.
याप्रकरणात रशियाच्या सरकारचं धोरणं निसटताना दिसत आहे. याचाच अर्थ ऑपरेशनची योजना नीट पद्धतीने तयार करण्यात आली नव्हती असं जेलियोटी यांना वाटतं. असे संकेत आहेत की यामागे रशियातील कोणीतरी ताकदवान व्यक्ती असण्याची शक्यता आहे. रशियाचं सरकार याप्रकरणामागे असेल असं ठोसपणे सांगता येत नाही.
नावालनी सध्या जर्मनीची राजधानी बर्लिन इथे असून कोमात आहेत.
विष काय करतं?
रुग्णालयाच्या मते त्यांना कोणतं विष देण्यात आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यासाठी चाचण्या घेतल्या जात आहेत.
स्वतंत्र प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या टेस्टनुसार त्यांच्या शरीरात कोलीनस्ट्रीज एंजाइम आढळलं आहे.
सैन्यात नर्व्ह एजंट सरीन, वीएक्स, आणखी विषारी अशा नोवीचोक एजंटचा प्रभाव असू शकतो.
हे विष मेंदूच्या मांसपेशीच्या रासायनिक संकेत प्रणालीत अडथळा निर्माण करतं. ज्यामुळे श्वास अडकतो, हृद्याचे ठोके वाढू लागतात.
नावालनी यांना हे विष टोम्स्क विमानतळावर ब्लॅक टीच्या कपातून देण्यात आलं असावं असा आरोप त्यांच्या प्रवक्त्याने केला आहे. विमान प्रवास करायच्या काही मिनिटं आधी त्यांनी ब्लॅक टीचं सेवन केलं होतं.
विमानात बसण्यापूर्वी दुसरं काहीही खाल्लं प्यायलं नव्हतं.

फोटो स्रोत, EPA
लित्वीनेंको यांनीही विष मिसळण्यात आलेला चहा प्यायला होता. हे प्रकरण त्यासारखंच वाटतं आहे.
अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध पुतिनविरोधी चळवळवादी व्लादिमीर कारा मुर्जा यांनीही आपल्यावर विष प्रयोग झाल्याचा दावा केला. 2015 आणि 2017 मध्ये विष दिल्यानंतर जी लक्षणं जाणवतात तसं वाटल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा दावाही एक रहस्य बनून राहिला आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, विष हे रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचं आवडतं अस्त्र होत चाललं आहे. विषाच्या यातना सहन करणं अतिशय कठीण असतं, विषप्रयोग झाल्यानंतर मी कोमात गेलो. बाहेर आलो तेव्हा मला चालायलाही नव्याने शिकावं लागलं.
20 ऑगस्टला नावालनी ज्या विमानात होते ते विमान ओम्स्कमध्ये उतरलं तेव्हा ते कोमाच्या स्थितीतच होते. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
विषप्रयोगाचे पुरावे आधीच नष्ट करण्यात आले?
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोफ यांच्यानुसार नावालनी यांच्यावर विषप्रयोग झाला आहे की नाही याबाबत जर्मनीतील रुग्णालयाचं परीक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे त्याची अधिकृत चौकशी करणं घाईचं ठरेल.
नावालनी यांना बर्लिनला आणण्याची परवानगी मिळाल्यानंतर पेस्कोफ यांनी त्यांच्या आयुआरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नावालनी यांना बर्लिनला नेण्यापूर्वीच विषप्रयोगाच्या खुणा-पुरावे मिटवून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

फोटो स्रोत, Reuters
ओम्स्क इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की नावालनी यांचा रक्तातील साखरेची पातळी कमी झाली होती. नर्व्ह एजंटचे संकेत न ओळखण्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे.
अमेरिकेत कार्यरत भूलतज्ज्ञ डॉ. कोंस्टेंटिन बालानोफ यांनी बीबीसी रशियाला सांगितलं की त्या रसायन समूहाचं विष असेल.
हे प्रकरण दडपून टाकण्याचाही प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बिनाओळखीचे पोलीस झटपट घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना तिथे येण्यापासून रोखलं होतं.
नावालनी यांच्या मूत्र नमुन्यात विषाचे अंश सापडले नसल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं.
नावालनी यांना ओम्स्क इथल्या रुग्णालयात नर्व्ह एजंटच्या एंटीडोट एट्रोपाइनची मात्रा देण्यात आल्याचंही स्पष्ट होतं आहे.
सेंट पीटर्सबर्ग इथे इंटेन्सिव्ह केयर युनिटचे विशेषज्ञ मिखाइल फ्रेमडरमैन यांच्या मते विष देण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये एट्रोपाइनला बराच वेळ नसांद्वारे देण्यात यावं.
नावालनी यांच्यासंदर्भातील वैद्यकीय माहिती जारी करण्यात आलेली नाही. फ्रेमडरमैन यांच्या मते ओम्स्क इथं असं झालं नसू शकतं.
रसायनांचा परिणाम
ब्रिटनचे अग्रगण्य विष विशेषज्ञ प्राध्यापक एलिस्टेयर हे यांच्या मते ओर्गेनोफोस्फेट्सच्या मोठ्या सूचीत नर्व्ह एजंट सगळ्यात विषारी असतात.
नर्व्ह एजंटची ओळख पटवणं अवघड होऊन जातं.

फोटो स्रोत, Reuters
थोड्या प्रमाणात विष असणाऱ्या ओर्गेनोफोस्फेट्सचा वापर कीटकनाशकं आणि मेडिकल थेरपीत केला जातो. एखाद्याचा जीव घेण्यासाठी मामुली डोसची आवश्यकता असते. ड्रिंक्समधून सहजतेने दिलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.
मारेकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर याचे अनेक फायदे आहेत. रक्त चाचणीतून हे कळत नाही की एजंट काय होता? त्याचा शोध घेण्यासाठी जटिल चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी महागडी उपकरणं लागतात. अनेक रुग्णालयांमध्ये तसंच प्रयोगशाळेत ही सुविधा नसते.
ब्रिटनमध्ये ही व्यवस्था अतिसुरक्षित जैव आणि रसायन संशोधन केंद्रापुरती मर्यादित आहे. जगभरात 190 देशांनी जागतिक रासायनिक अस्त्रं निर्बंध करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये रशिया आणि ब्रिटनचा समावेश आहे. याद्वारे रासायनिक हत्यारांचा वापर आणि त्यांच्या शोधावर बंदी असते. अगदी छोट्या प्रमाणावर अॅंटिडोट आणि सुरक्षात्मक कारणांकरता उत्पादनाला परवानगी असते.

फोटो स्रोत, PA Media
शीतयुद्धानंतर रशियाने रासायनिक अस्त्रांचं भांडार नष्ट केलं होतं. प्राध्यापकांच्या मते त्यात 40 हजार टन रसायनं होती.
शीतयुद्ध काळात काही हत्यांच्या प्रकरणात एक्झोटिक केमिकल्सचा वापरही करण्यात आला होता.
बल्गेरियाच्या डाव्या विचारसरणीचे पत्रकार जॉर्जी मार्कोफ यांची लंडन इथं 1978 साली छत्रीने रसायन शिंपडून हत्या करण्यात आली होती.
त्यावेळी बल्गेरिया सोवियत युनियनचा भाग होतं. त्यांची हत्या रीसिनने करण्यात आली असं मानलं गेलं. मार्कोफ यांच्या मृतदेहातून एक छर्रा मिळाला होता. त्यांना छर्ऱ्यातून विष देण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























