कोरोना व्हायरस : पदार्थांच्या पॅकिंगमुळे विषाणू संसर्ग होण्याची शक्यता किती आहे?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गोठवलेल्या म्हणजे फ्रोझन कोलंबी आणि फ्रोझन चिकन विंग्जच्या पाकिटांवर कोरोना व्हायरसच्या खुणा सापडल्याचं वृत्त होतं. दक्षिण अमेरिकेतून हा सगळा माल आला होता.

फूड पॅकेजिंग म्हणजेच खाद्यपदार्थांच्या पॅकिंगद्वारे कोरोना व्हायरस पसरू शकतो का? याविषयीची चर्चा यामुळे पुन्हा सुरू झाली आहे.

असं होण्याची शक्यता किती आहे?

पॅकेजिंगसाठी वापरण्यात आलेल्या सामानाद्वारे कोव्हिड 19चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

कार्डबोर्ड आणि विविध प्रकारच्या प्लास्टिकसारख्या काही प्रकारच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींवर कोरोना व्हायरस काही दिवस नाही पण काही तास टिकू शकतो हे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झालंय.

शिवाय हा व्हायरस कमी तापमानात जास्त काळ टिकण्याची शक्यता असते आणि बहुतेकदा पाकीटबंद वा फ्रोझन खाद्यपदार्थ हे कमी तापमानाच्या कंटेनर्समधूनच एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवले जातात.

पण प्रयोगशाळेच्या बाहेर वास्तव जगातही हा प्रयोग केला, तर हेच निष्कर्ष आढळतील का याविषयी वैज्ञानिकांना शंका आहे.

बाहेरच्या जगामध्ये वातावरणातली परिस्थिती झपाटयाने बदलत असते म्हणूनच या परिस्थितीत विषाणू फार काळ टिकणं कठीण असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ लिस्टर मधल्या रेस्पिरेटरी सायन्सेस विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. ज्युलियन टँग म्हणतात.

प्रयोगशाळेतल्या या अभ्यासासाठी 1 कोटी व्हायरल पार्टिकल्स (कण वा अंश) सँपल (नमुना) म्हणून घेण्यात आले होते. पण शिंकेतून हवेद्वारे एखाद्या पृष्ठभागावर पडणाऱ्या तुषारात साधारणतः फक्त 100 व्हायरल पार्टिकल्स असण्याची शक्यता असते याकडे रटगर्स विद्यापीठाचे प्राध्यापक इमॅन्युएल गोल्डमनही लक्ष वेधतात.

लॅन्सेट या वैदयकीय जर्नलमध्ये जुलै महिन्यात त्यांनी त्यांच्या लेखात म्हटलं होतं, "माझ्यामते एखाद्या निर्जीव पृष्ठभागामुळे विषाणू संक्रमण होण्याची शक्यता ही अगदी कमी आहे. अगदीच एखादी संक्रमित व्यक्ती त्या पृष्ठभागावर शिंकली वा खोकली आणि त्यानंतर (एक किंवा दोन तासांत) त्या पृष्ठभागाला कोणी हात लावला, तर असं होऊ शकतं."

विषाणू संक्रमण कसं होऊ शकतं?

असं मानलं जातंय की समजा हे पॅकेजिंग करणाऱ्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी विषाणू असणाऱ्या एखाद्या पृष्ठभागाला हात लावला आणि नंतर तोच हात नाका-तोंडाला, डोळ्याला लावला तर संसर्गाचा धोका असू शकतो.

पण कोव्हिड 19च्या सध्या आढळत असललेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्ग याप्रकाराने झाल्याचं आता वैज्ञानिकांना वाटत नाहीये.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कन्ट्रोल (CDC) च्या वेबसाईटवर म्हटलंय, "विषाणू असलेल्या एखाद्या वस्तूला वा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीला कोव्हिड19 होण्याची शक्यता आहे."

एकामेकांच्या अगदी जवळ (म्हणजे 2 मीटर वा 6 फुटांपेक्षा कमी अंतरावर) असणाऱ्या व्यक्तींमध्ये, या विषाणूचा एका व्यक्तीमुळे दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त मानली जातेय.

विषाणूबाधित व्यक्ती खोकली, शिंकली किंवा बोलली तर तेव्हा उडणाऱ्या तुषारांद्वारे हे विषाणू संक्रमण होतं. जर हे तुषार जवळच्या माणसाच्या नाका-तोंडाजवळ गेले आणि त्याच्या श्वासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचले तर त्याला विषाणू संसर्ग होऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीला पदार्थाच्या पॅकिंगमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला हे सिद्ध करणं कठीण असल्याचं डॉ. टँग म्हणतात.

कारण यासाठी खाद्यपदार्थाच्या पॅकिंगमुळेच संसर्ग झाला हे सिद्ध करण्यासाठी ही व्यक्ती संक्रमण होऊ शकेल अशा कोणत्याही परिस्थितीत नव्हती, वा या व्यक्तीच्या संपर्कात कुणीही एसिप्टमॅटिक म्हणजे संसर्गाची लक्षणं न दिसणारी व्यक्ती नव्हती यासगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील.

आपण सुरक्षित कसं रहायचं?

'सध्याच्या घडीला अन्न किंवा अन्नपदार्थाचं वेष्टण यामुळे संक्रमण झालेलं कोव्हिड 19चं कोणतंही प्रकरण नाही,' असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. पण असा संसर्ग होऊ नये म्हणून काय करायला हवं यासाठीच्या सूचना WHOने दिल्या आहेत.

वस्तूंच्या पॅकेजिंगचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं नसलं तर या वस्तू हाताळल्यानंतर आणि खाण्यापूर्वी हात योग्यरीतीने धुणं गरजेचं असल्याचं यात म्हटलंय.

जर तुम्ही किराणा - सामान घ्यायला जात असाल तर शक्य असल्यास दुकानात शिरण्यापूर्वी हँड सॅनिटायजरचा वापर करा आणि नंतर हात व्यवस्थित धुवा. विकत घेतलेल्या वस्तू हाताळल्यानंतर किंवा घरी सामान लावल्यानंतरही हात धुवावेत.

जर होम डिलीव्हरी येत असेल तर ही डिलीव्हरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीने आवश्यक ती स्वच्छता बाळगल्यास अशा प्रकारे किराणा वा इतर सामानाची डिलीव्हरी घेण्यास हरकत नाही.

या प्रकारे अन्नपदार्थ वा किराण्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर हात धुणं गरजेचं आहे शिवाय यासाठीच्या प्लास्टिकच्या पिशव्या एकदाच वापरल्या जाव्यात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)