You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्ससाठी महिलेनी पुरुषावर बळजबरी केली तर त्याला बलात्कार म्हणायचं का?
- Author, केट सिल्वर
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जर एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या संमतीविना तिच्यावर बळजबरी करत असेल, तर त्याला बलात्कार म्हटलं जातं. पण, जर एखाद्या महिलेनं एखाद्या पुरुषाच्या संमतीशिवाय त्याच्यावर बळजबरी केली, तर त्याला बलात्कार म्हणता येईल का?
इंग्लंड आणि वेल्स इथल्या कायद्यात याला बलात्कार म्हणता येत नाही. पण, याविषयी अभ्यास करणाऱ्या एका लेखिकेचं म्हणणं आहे की, अशाप्रकारालाही बलात्कार म्हणायला हवं.
लँकेस्टर यूनिवर्सिटी लॉ स्कूलमधील डॉक्टर सियोभान वियरे यांनी ब्रिटनमध्ये 2016-17मध्ये बळजबरीच्या सेक्सविषयी पहिल्यांदा संशोधन केलं होतं. यात त्यांनी 200हून अधिक पुरुषांचा ऑनलाईन सर्व्हे करून माहिती मिळवली.
मे 2018 ते जुलै 2019 दरम्यान त्यांनी 30 पुरुषांची मुलाखत घेतली. याविषयीचा अभ्यास अहवाल आता समोर आला आहे.
कोणत्या परिस्थितीत सेक्ससाठी बळजबरी करण्यात आली, त्याचे परिणाम काय झाले आणि त्यावरची कायदेशीर कारवाई याविषयी यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासाठी मुलाखत देणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत. पण, आपण त्यापैकी एकाला जॉन असं म्हणू.
माझ्या पार्टनरनं स्वत:ला इजा करून घ्यायला सुरुवात केली, तेव्हा काहीतरी चुकीचं घडतंय, असं वाटल्याचं जॉन यांनी सांगितलं.
एका भीतीदायक घटनेनंतर ते त्यांच्या पार्टनरला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले. याविषयीच्या मानसिक कारणांवर या जोडीने तिथे तासनतास चर्चा केली.
जवळपास 6 महिन्यांनंतर त्यांच्या पार्टनरनं स्वत:ला नुकसान पोहोचवण्याऐवजी जॉन यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली.
जबरदस्ती
जॉन सांगतात, "मी हॉलमध्ये बसलो होतो. ती किचनमधून बाहेर आली आणि माझ्या नाकावर जोरात बुक्का मारला आणि तिथून हसतहसत पळत निघून गेली. त्यानंतर मात्र रोजच भांडण सुरू झालं."
त्यानंतर तिनं डॉक्टरांची मदत घ्यायचा प्रयत्न केला आणि मार्गदर्शन घेतलं. पुढे तिला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला.
जॉन सांगतात, "ती ऑफिसमधून घरी आली की, सेक्स कर म्हणायची. कालांतरानं ती हिंसक व्हायला लागली. पुढे परिस्थिती इतकी बिघडली की, ती घरी येईल या विचारानंच मला भीती वाटायची. "
एकदा जॉन यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचा उजवा हात हातकडीमध्ये बांधलेला होता. हे काम त्यांच्या पार्टनरनं केलं होतं.
त्यानंतर मग तिनं बेडजवळच्या लाऊड स्पीकरनं जॉन यांच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा हात नायलॉनच्या दोरीनं बांधला आणि सेक्ससाठी त्यांच्यावर दबाव आणला.
भीतीमुळे जॉन आपल्या पार्टनरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत होते. त्यामुळे मग तिनं पुन्हा त्यांना मारायला सुरुवात केली आणि एक तासभर बांधून ठेवलं. त्यानंतर ती याविषयी काही एक बोलण्यास तयार नव्हती.
काही काळाने तिला दिवस गेले आणि हे भांडण थांबलं. पण मूल झाल्याच्या काही दिवसांनंतर पुन्हा एका रात्री जॉन यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचा हात बेडीने पलंगाला बांधलेला होता.
लोकांमधील समज
त्यानंतर माझ्या पार्टनरनं मला जबरदस्तीनं व्हायग्रा खाऊ घातला आणि माझं तोंड बंद केलं.
ते सांगतात, "मी काहीच करू शकत नव्हतो. त्यानंतर मी अंघोळीला गेलो आणि बराच वेळ अंगावर पाणी घेतलं. मी खोलीत परतल्यानंतर तिनं मला विचारलेलं पहिलं वाक्य होतं - "रात्री जेवायला काय आहे? "
जॉन यांनी या प्रकाराविषयी लोकांना सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा कुणाचाच त्यावर विश्वास बसला नाही.
ते सांगतात, "तू घर का सोडलं नाहीस, असं मला अनेकांनी विचारलं. पण, मी हे घर माझ्या पैशानं माझ्या मुलांसाठी खरेदी केलं होतं. त्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या यात गुंतलो होतो. पण, लोकांचा माझ्यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते म्हणतात, तू तिला उलटून का मारलं नाहीस? कदाचित यामुळे मी लवकर सुटलो असतो."
डॉ. वियरे यांनी आणखी काही पुरुषांच्या मुलाखती घेतल्या. बहुतेकांचे अनुभव जॉन यांच्यासारखेच होते. त्यामुळे अशाप्रकारचा गुन्हा बहुतेक करून महिला पार्टनर अथवा एक्स-पार्टनरबाबत घडतो आणि बहुतेकदा तो घरगुती हिंसाचारादरम्यान होतो, असा एक निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.
दुसऱ्या एका पुरुषानं म्हटलं, "आम्हाला याविषयी बोलायचं म्हटलं की भीती वाटते आणि लाजही वाटते. आम्ही ज्यावेळी याविषयी बोलतो तेव्हा आम्हाला विश्वास वाटत नाही, कारण आम्ही पुरुष आहोत. "
संशोधनाचे निष्कर्ष
अशापद्धतीचे अनुभवांची तक्रार नोंदवताना पुरुषांना लाज वाटते. ते लैंगिक हिंसेचा उल्लेख न करता घरगुती हिंसेविषयी तक्रार दाखल करण्याची शक्यता असते.
यामुळे संबंधित व्यक्तीच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात, तसंच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ शकतात. तसंच लैंगिक क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
काही पुरुषांनी अनेक वेळा लैंगिक शोषण सहन केल्याचं सांगितलं, काहीजण लहानपणीच लैंगिक शोषणाचे बळी ठरले, तर काही जण वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक शोषण सहन करावं लागलं.
या पुरुषांमध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्थेविषयी नकारात्मक भावना आहेत.
पुरुषांसोबत जबरदस्तीनं सेक्स करणं अशक्य आहे, कारण पुरुष महिलांपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम असतात, हा गैरसमज असल्याचं वियरे यांच्या संशोधनातून आढळलं आहे.
तसंच पुरुष महिलांसोबतच्या सगळ्या प्रकारच्या लैंगिक संधींना सकारात्मक प्रतिसाद देतात, हा देखील गैरसमज असल्याचं पुढे आलं आहे.
तिसरा गैरसमज म्हणजे, पुरुषांमध्ये लैंगिक भावना उत्तेजित झाल्या म्हणजे त्यांना नक्कीच सेक्स हवा आहे. पण वियरे यांच्या मते, उत्तेजित होणं ही खरं तर एक शारीरिक प्रक्रिया असते.
त्या सांगतात, "पुरुष घाबरलेले असले किंवा रागात असले, तरी ते उत्तेजित होऊ शकतात. काही संशोधनं असंही सांगतात की, महिलांसोबत बलात्कार होताना त्या सेक्शुअली प्रतिसाद देण्याची शक्यता असते, कारण त्यांचं शरीर शारीरिक प्रतिक्रिया देत असतं. पुरुष आणि महिला पीडितांसाठी हा एक मुद्दा आहे ज्यावर अजूनपर्यंत पुरेशी चर्चा झालेली नाही."
2017साली वियरे यांनी केलेल्या या पाहणीत सहभागी होणाऱ्या अनेकांनी नशेच्या धुंदीत असताना केलेल्या सेक्सच्या अनुभवाविषयी सांगितलं. नशेत असल्याने स्वतःसोबत घडणाऱ्या गोष्टी थांबवायला आपण असमर्थ होतो, असं अनेकांनी सांगितलं.
कायदेशीर मान्यता
एका व्यक्तीनं असं सांगितलं की, एका महिलेसोबत रात्रभर पार्टी करून झाल्यानंतर घरी जाताना त्याला डेट रेपचं औषध देण्यात आलं आणि सेक्स करण्यासाठी बळजबरी करण्यात आली.
एका व्यक्तीनं असं सांगितलं की, तो विद्यार्थी असताना समर कॅम्पदरम्यान त्याच्यावर सेक्ससाठी बळजबरी करण्यात आली.
वियरे यांच्या मते, "अभ्यासात सहभागी झालेल्या बहुतांश जणांनी बळजबरीचा सेक्स म्हणजे बलात्कार असल्याचं म्हटलं. तर इंग्लंड आणि वेल्समधील कायद्यानुसार या बलात्कार समजलं जाणार नाही, यामुळे काही जण नाराज होते. "
एका व्यक्तीनं सांगितलं, "याविषयी बोलताना समजा तुमची सोबतीण नशेत होती आणि तिनं स्वत:ला तुमच्यावर लादलं किंवा तुमचा बलात्कार केला, असं सांगितलं तर हे एक प्रकारचं स्वप्न वा फँटसी वाटत नाही का? "
वियरे लिहितात की, अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये बलात्काराची सहतमीशिवायचा सेक्स अशी व्याख्या करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातल्या व्हिक्टोरिया राज्यातही याविषयीची कायदे आहेत.
बलात्कारासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, अशी शिफारस या संशोधनानंतर करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)