You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : हात धुण्याची आपली सवय सुटत चालली आहे का?
- Author, स्टीफन डाऊलिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोना व्हायरसचा संसर्ग देशात सुरू होऊन पाच-सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
या काळात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणं यासारख्या यांच्यासारखे उपाय वापरले गेले. साथीदरम्यान या सगळ्या गोष्टींची भूमिका महत्त्वाची असली तरी लोकांना हळूहळू यांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे.
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून सुरुवात झाली. या व्हायरसपासून संरक्षण कसं करावं, याची माहिती देण्यास आरोग्य संघटनांनी सुरु केलं. सुरुवातीच्या काळात लोकांनी साबण लावून कोमट पाण्याने हात धुवावेत, असा सल्ला सातत्याने देण्यात येत होता.
जागतिक आरोग्य संघटनेने तर हात धुण्याची योग्य पद्धतसुद्धा फोटो-व्हीडिओच्या माध्यमातून सांगितली होती.
सहा महिन्यानंतरसुद्धा कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा आलेख वाढताना दिसत असला तरीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमा होत असल्याचं चित्र आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
दरम्यान, रुग्णालयांना दररोज भेट देणाऱ्या लोकांपैकी फक्त 1 टक्के व्यक्तीच आपले हात योग्य प्रकारे धुत असल्याची माहिती इथिओपिया देशातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.
म्हणजे, हात धुतले नाहीत तर चालतं का? याचं उत्तर 'नाही' असंच आहे.
तज्ज्ञांच्या मते, उलट हात धुण्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध योग्य प्रकारे केला जाऊ शकतो.
थॉमस गिलबर्ट हे बोस्टनच्या नॉर्थ-ईस्टर्न युनिव्हर्सिटीत जैव-रसायन शास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
त्यांच्या मते, "कोणत्याही विषाणूच्या भोवती प्रथिनं आणि तेलकट पदार्थांचं एक प्रकारचं आवरण असतं. हे आवरण फक्त आणि फक्त साबण आणि कोमट पाण्याच्या योग्य वापरानेच तोडता येऊ शकतं."
"साबणामुळे विषाणूचा RNA कोड भेदला जातो. आवरण तुटल्यानंतर विषाणू पूर्णपणे निष्क्रिय होतो. अशा स्थितीत तो मानवासाठी धोकादायक ठरू शकत नाही. विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 20 सेकंद आपले हात साबणाने धुवायचे आहेत. हा कालावधी विषाणू नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. पण फक्त तुम्ही हात धुण्यासाठी योग्य पद्धत वापरणं आवश्यक आहे," असं गिलबर्ट सांगतात.
युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ केंटचे प्राध्यापक मार्टिन मिचेलिस यांच्या मते, फक्त पाण्याचा वापर करून व्हायरस नष्ट होत नाही.
आपला मुद्दा स्पष्ट करून देण्यासाठी त्यांनी एक साधं-सोपं उदाहरणही दिलं. ते सांगतात, "तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्या हातांना तेल लागतो. हा तेलकटपणा घालवण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नसतं. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकानंतर आपले हात साबणाने धुता. कोरोना व्हायरसभोवतीसुद्धा अशाच प्रकारची तेलकट प्रथिनं आहेत. त्यांना नष्ट करण्यासाठी साबणाने हात धुणंच गरजेचं आहे.
सॅनिटायझरचा वापर वाढला
गेल्या काही दिवसांमध्ये सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हात धुण्याची सवय बाजूला पडत असल्याचं दिसून येतं.
लोक घराबाहेर पडताना आजकाल सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या सोबत बाळगतात. वेळोवेळी हातांना सॅनिटायझर लावून निर्जंतुकीकरण केलं जातं.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही एक चांगली सवय आहे, पण फक्त एवढंच पुरेसं नसल्याचं गिलबर्ट यांना वाटतं.
तुम्ही गाडी चालवताना, कारमध्ये किंवा पाणी उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी यांचा वापर करणं ही चांगली कल्पना आहे. पण पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हात पाण्यानेच धुतले पाहिजेत.
तुम्ही दिवसभर तुमच्या घरात असला, तरी हात धुणं केव्हाही तुमच्यासाठी चांगलंच. किंबहुना आपण स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर किंवा जेवण्याआधी हात पाण्याने स्वच्छ धुतो. अशावेळी योग्य पद्धत वापरून आपले हात स्वच्छ केले पाहिजेत.
हात स्वच्छ धुण्याची सवयच आपल्याला कोरोना संसर्गापासून वाचवू शकते. या सवयीमुळे तुम्ही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात तरी तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
युनिव्हर्सिटी ऑफ युत्रेच्तमध्ये पीएचडी करत असलेल्या थी मुई फाम यांचं हात धुण्याबाबत एक संशोधन सुरू आहे.
'समजा, तुम्ही एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलात किंवा कोरोना पसरलेल्या पृष्ठभागावर हात ठेवला, अशा स्थितीत काही वेळानं हात धुण्याऐवजी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ हात धुतल्यामुळे संसर्गाची शक्यता अत्यंत कमी होते,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे.
"काही लोकांनी घरात अँटी व्हायरल हँडवॉश वापरायला सुरू केलं आहे. असे हँडवॉश साबणापेक्षाही प्रभावी ठरतील, असं त्यांना वाटतं. तसंच काही हँडवॉश अँटी-बॅक्टेरियल असतात. या हँडवॉशच व्हायरसवर कोणताच प्रभाव पडत नाही. त्यामुळे साबणच हात धुण्यासाठी सर्वात उपयोगी आहे, असं मिचेलीस यांना वाटतं.
'पाणी पिण्यायोग्यच असण्याची गरज असं नाही'
आता विषाणूपासून बचाव करायचा असेल, तर पिण्यायोग्य शुद्ध पाण्यानेच आपलं संरक्षण होऊ शकतं, असा काही लोकांचा समज आहे.
पण गिलबर्ट आणि मिचेलीस या दोघांच्याही मते, "हात धुण्यासाठी पिण्यायोग्यच पाणी असावं, हे आवश्यक नाही. आपल्याला उपलब्ध असलेलं पाणी आणि साबण यांच्या मदतीने आपण कोरोनाचा प्रतिबंध करू शकतो."
तुमच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध असेल, तरच हात धुण्याचा पर्याय तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता. पण जगातील अविकसित देशांमध्ये पाण्याची खूप कमतरता आहे. या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासात तर जगातील पाचपैकी फक्त दोन शाळांमध्येच हात धुण्यासाठी चांगली सुविधा असल्याची माहिती समोर आली.
2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत कोरोनाचा प्रसार दिसून आला असला तरी इतर फ्लूचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून येतं. फ्लूमुळे मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणसुद्धा आता कमी झालं आहे.
उदाहरणार्थ- दक्षिण आफ्रिकेची नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिजेस (NICD) ही संस्था दरवर्षी मार्च ते ऑगस्ट महिन्यादरम्यान फ्लूची 700 च्या वर प्रकरणं हाताळते. पण यावर्षी त्यांच्याकडे फक्त एका प्रकरणाची नोंद झाली.
बहुधा, दवाखाने बंद असल्यामुळे अनेकांची नोंद झाली नाही. परंतु फ्लूचे रुग्ण कमी प्रमाणात नोंदवले जाण्यामागचं प्रमुख कारण हात धुणं हेसुद्धा असू शकतं.
"हात धुणं हा कोरोनावरचा प्रभावी उपाय आहेच पण इतर संसर्गजन्य रोगांवसुद्धा ही सवय अतिशय परिणामकारक आहे. आगामी काळातही हात धुण्याची सवय आपण कायम ठेवली पाहिजे. हा आपल्यासाठी एक चांगला बदल ठरू शकतो," असं मिचेलीस सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)