You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...जेव्हा त्याला रानडुकरामागे नग्न धावावं लागलं
बर्लिनमधल्या एका न्युडिस्ट (नग्नपंथीय) माणसाला निसर्गात फिरणं जास्तच महागात पडलं. एका रानडुकराने या माणसाची प्लॅस्टिक बॅग पळवली ज्यात त्याचा लॅपटॉप होता.
न्युडिस्ट म्हणजे ती माणसं ज्यांना 'नैसर्गिक' अवस्थेत राहायला आवडतं. पाश्चात्य देशांमध्ये या नग्नपंथीय लोकांचे अनेक गट असतात.
अशीच एक नागडी व्यक्ती जर्मनीत एका बागेत फिरत असताना ही घटना घडली. रानडुकराने या व्यक्तीचा लॅपटॉप पळवल्यानंतर या व्यक्तींनेही त्या रानडुकराचा आणि तिच्या दोन पिल्लांचा पाठलाग केला.
"ही घटना खूपच मजेशीर होती. गंमत म्हणजे त्या नग्न माणसानेही यावर हसून प्रतिक्रिया दिली. ही घटना म्हणजे निसर्गाने निसर्गाला नैसर्गिकरित्या दिलेले उत्तर होतं जणू," असं बर्लिनमधल्या अभिनेत्री आणि लाईफकोच अडेल लँड्योअर यांनी फेसबुकवर लिहिलं.
त्यांनी घटनेचे फोटोही शेअर केले. "त्या माणसाने आपल्या लॅपटॉपसाठी जणूकाही सर्वच पणाला लावलं. मी त्यांचे फोटो त्यांना दाखवले आणि त्यांना हसू फुटलं. त्यांनीच मला हे फोटो सार्वजनिक करण्याची परवानगी दिली," अडेल यांनी पुढे लिहिलं.
जर्मनीत नग्नवस्थेत राहाण्याची तसंच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक लोक उन्हाळ्यात 'नैसर्गिक" अवस्थेत बागांमध्ये फिरताना, उन खात पडलेले दिसून येतात. याला 'फ्री बॉडी कल्चर' असंही म्हणतात.
या घटनेआधी बर्लिनमधल्या एका बागेत एका कोल्ह्याने अनेक लोकांचे बुट पळवले होते. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर जंगली प्राणी धीटपणे शहरात येण्याच्या अनेक घटना समोर आल्या. बर्लिनमधल्या अनेक उपनगरांमध्ये रानडुकरांनी ठाण मांडल्याचं दिसतंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)