चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर, चेंगडूमधील वाणिज्य दुतावास केलं बंद

दूतावास

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चीननं अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल कारवाई केलीय. चेंगडूमधील अमेरिकेचं वाणिज्य दूतावास बंद करण्याची घोषणा चीननं केलीय.

"ह्युस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधात अशी कारवाई करणं आवश्यक आणि कायदेशीर प्रक्रिया आहे," असं चिनी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

"चीन आणि अमेरिकेत सध्या अशी स्थिती आहे, जी चीनला नको आहे. मात्र, अमेरिका या सर्व स्थितीला पूर्णपणे जबाबदार आहे," असंही चिनी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

बीबीसी प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, चेंगडूमध्ये 1985 साली वाणिज्य दूतावास उभारलं गेलं होतं. इथे 200 हून अधिक लोक काम करतात आणि तिबेटच्या जवळ असल्यानं हे ठिकाण रणनितीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण होतं.

चीन अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेत व्हिसाच्या फसवणुकीप्रकरणी चीनच्या तीन नागरिकांना अटक करण्यात आलंय आणि चौथ्या नागरिकालाही अटक करण्याची तयारी सुरू आहे.

चौथी व्यक्ती महिला सॅन फ्रॉन्सिस्कोस्थित चिनी वाणिज्य दूतावासातील कर्मचारी आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकांनी कथितरित्या चिनी लष्कराचे सदस्य असण्याबाबत खोटं सांगितलं होतं.

चीन आणि अमेरिकेमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. ट्रंप प्रशासनाची व्यापारापासून कोरोनापर्यंत अनेक मुद्द्यांवर चीनसोबत शाब्दिक बाचाबाची झालीय. शिवाय, अमेरिकेनं हाँगकाँगमधील वादग्रस्त सुरक्षा कायद्याबाबत कडक शब्दांत आक्षेप नोंदवला होता.

अमेरिकेनं चिनी दूतावास का बंद केलं?

ट्रंप प्रशासनानं ह्युस्टन दुतावास शुक्रवारपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. या दुतावासातून अमेरिकेच्या बौद्धिक संपदेची (Intellectual Property) हेरगिरी केली जाते आणि चोरीही केली जाते, असा आरोप आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटलं की, "अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि नागरिकांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेसाठी ह्युस्टनमधलं चिनी वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

चीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ह्युस्टनस्थित चिनी वाणिज्य दूतावास

या दूतावासाच्या आडून चीन अमेरिकाविरोधी कारवाया करत असल्याचा आरोपही मॉर्गन ऑर्टागस यांनी केलाय.

चीननेही यानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचं म्हटलं होतं. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, अमेरिकन सरकारनं त्यांचा चुकीचा निर्णय तातडीनं रद्द करावा, असा आमचा आग्रह आहे.

त्याआधीच अमेरिकन माध्यमांमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की, चिनी दुतावासात मोठ्या संख्येनं दस्तऐवज जाळले जात आहेत.

दुतावासात कागदपत्रं जाळल्याचा आरोप

ह्युस्टनच्या चिनी दुतावासात काही अज्ञात लोक कागदांनी भरलेल्या डब्यांना आग लावत असल्याचं चित्रिकरण समोर आलं होतं. ज्यावेळी आग वाढत गेली, त्यावेळी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न झाला.

ह्युस्टन पोलिसांच्या ट्वीटनुसार, या घटनेनंतर त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली होती. मात्र, दुतावासाच्या आता कुणालाही जाऊ दिलं गेलं नाही.

चीन अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

दुतावासाच्या आतून धूर निघत असल्याच्या बातमीला ह्युस्टन पोलिसांनीही दुजोरा दिला होता. मात्र, चिनी परराष्ट्र मंत्रालयानं यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. किंबहुना, सर्वकाही सामान्य आहे आणि आधीसारखंच सर्व सुरळीत आहे, असं चीननं म्हटलं.

या घटनेनंतरच ट्रंप प्रशासनाची चिनी वाणिज्य दुतावासासंदर्भात प्रतिक्रिया आली होती.

त्याहीआधी मंगळवारी अमेरिकेच्या एका विभागानं आरोप केला होता की, "चीनकडून काही हॅकर्सना प्रोत्साहन दिलं जातंय. जेणेकरून कोव्हिड-19 ची लस तयार करणाऱ्या प्रयोगशाळांवर निशाणा साधला जाऊ शकेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)