धर्मांतराचा प्रयत्न की मराठी ख्रिस्ती परंपरा? कायदा लागू होण्याआधीच पुण्यात 'गुन्हा' दाखल?

धर्मांतराचा प्रयत्न की मराठी ख्रिस्ती परंपरा? कायदा लागू होण्याआधीच पुण्यात 'गुन्हा' दाखल?

फोटो स्रोत, KARAN RASKAR, BBC

    • Author, प्राची प्रतिभा शिरीष
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 13 मिनिटे

कायदा लागू होण्याआधीच त्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो का? पुण्यातील ख्रिस्ती धर्मगुरू पंकज देवनूर यांच्या व्याख्यानावरून दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धर्मांतराच्या आरोपांबरोबरच मराठी ख्रिस्ती परंपरा, चर्चमधील कीर्तन आणि नव्या धर्मस्वातंत्र्य कायद्याची गरज यावरही आता वाद सुरू झाला आहे.

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल; नियम तयार होण्याआधीच कारवाई कशी?

फोटो स्रोत, Getty Images

'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026' नुसार पहिला गुन्हा पुणे शहरात दाखल झाला. मात्र हा कायदा अंमलात येण्यापूर्वीत गुन्हा कसा नोंद केला हा प्रश्न आता पुणे पोलिसांनाच विचारला जात आहे.

ब्रिटिश नागरिक पंकज देवनुर यांनी पुण्यातील पंचहौद मिशनच्या 'पवित्र नाम देवालय' इथं 7 ऑगस्टला व्याख्यान दिलं होतं. यात त्यांनी धर्मांतराला प्रवृत्त केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रार केली होती.

मात्र ज्या शब्दांना आक्षेप घेतला गेला ते शब्दही ख्रिश्चन परंपरेत अनेक वर्षांपासून वापरात आहेत, असं म्हणत यात आक्षेपार्ह काही नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

तर मुळातच फसवणूक करून धर्मांतर झालं तर त्यासाठी कायदेशीर कारवाईची तरतूद असताना, नव्यानं हा कायदा काय हेतूनं आणला आहे? असा सवाल आता तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील गुरुवार पेठेतील 'पवित्र नाम देवालय' या चर्चच्या परिसरात व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 7 ऑगस्टला मुळचे ब्रिटीश नागरिक असणाऱ्या बिशप पंकज देवनूर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवनूर हे आमंत्रणावरून इथं आले होते.

या व्याख्यानाच्या वेळी स्टेजच्या मागे 'मंदिर' असा उल्लेख केला होता. तसंच व्याख्यानादरम्यान 'पोवाडा अभंग, भारूड' तसंच 'माऊली' अशा गोष्टींचा वापर केल्याने हिंदूंची दिशाभूल केली जात आहे, तसंच हिंदूंचे धर्मांतर करण्याचा त्यांचा हेतू आहे असे आरोप करत पुण्यातील कार्यकर्त्यांनी खडक पोलीस स्थानकात तक्रार दिली.

तक्रारदार अमित भोसले यांनी तक्रारीत म्हणलं आहे. " मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मी चेहऱ्याने ज्यांना ओळखतो असे चार, पाच हिंदू लोक उपस्थित होते. स्टेजच्या मागील बाजूस मंदिराचा उल्लेख केलेला व त्यातच पंचहौद येथील चर्चेच्या इमारतीचा फोटो असलेला बॅनर लावलेला होता. या बॅनरवर या मंदिराचे शेवटले वैभव पाहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधिश परमेश्वर म्हणतो. माया स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे दिसले. हे पाहुन माझ्या मंदिराचा उल्लेख ख्रिश्चन धर्मियांच्या चर्च मध्ये पाहून मला वाईट वाटले. तसेच त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी हिंदु धर्मातील पोवडा, अभंग भारूड, टाळ वीणा, सतार, मृदुंग तबला, गोंधळ या माध्यमांचा वापर करुन संत माऊली, किर्तन अशा शब्दांचा वापर करून हिंदु लोकांना प्रभु येशूच्या भक्तीचा मार्ग सांगत असताना तो हजर लोकांची दिशाभूल करत आहे. "

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पुण्यात दोन गुन्हे दाखल; नियम तयार होण्याआधीच कारवाई कशी?

तक्रारीत पुढे म्हणलं आहे की, "वारकरी संप्रदायाचे कीर्तन करत असलेले व त्यांचे बॅनरबाजीमुळे इतर धर्मीय नागरिक आकर्षित होऊन आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारावा असा आयोजकांचा प्रयत्न असल्याची माझी खात्री पटली."

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना तक्रारदार विक्रम घुंगुरवाला म्हणाले, "आमचा ख्रिश्चन असण्याला विरोध नाही. इस्लाम किंवा इतर कोणत्या धर्माचाही नाही. मात्र ते ज्या क्लृप्त्या वापरतात त्याला आमचा विरोध आहे. त्या दिवशी त्या चर्च मध्ये तेच घडलं. संत-महात्मा असल्याच्या वेषात तो बिशप थांबला होता. आणि मराठी संस्कृती, मराठी माती, हिंदू संस्कृती अशा पद्धचीचे त्यांचे शब्द वापरते. टाळ, मृदुंग या गोष्टी घेतल्या. अशा पद्धतीचा बनाव करून हिंदू लोक समोर बसलेले आहेत त्यांना प्रवचनाच्या माध्यमातून ख्रिस्ताच्या वाटेवरती घेऊन जाण्याचा जो बनाव आहे याला आमचा विरोध आहे."

पंचहौद मिशन

फोटो स्रोत, KARAN RASKAR/PUNE

फोटो कॅप्शन, पंचहौद चर्च
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तर तक्रारदारांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तन ही हिंदू भक्तीपरंपरेतील एक महत्त्वाची उपासना-पद्धती असल्याचे स्पष्ट केले.

"श्रवणं कीर्तनं विष्णोः" — श्रीमद्भागवत (7.5.23-24), नारद भक्तिसूत्रातील "भगवद्गुणश्रवणकीर्तनात्" तसेच भगवद्गीतेतील "सततं कीर्तयन्तो मां…" (9.14) या संदर्भांतून कीर्तनाचा भक्ती-उपासनेशी असलेला संबंध स्पष्ट होतो. ज्ञानेश्वर, नामदेव, भानुदास, एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संतांची परंपरा, तसेच नारदीय आणि वारकरी संप्रदाय, पूर्वरंग-उत्तररंग, आख्यान, निरूपण, अभंग आणि विठ्ठलभक्ती या घटकांमुळे कीर्तनाला स्वतंत्र हिंदू धार्मिक ओळख प्राप्त झाल्याचे आफळे यांनी सांगितले.

व्हीडिओच्या 19व्या ते 25व्या मिनिटादरम्यान "वंदन चरणी, घालीन लोटांगण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे" या परिचित भक्तिरचनेचा येशूला उद्देशून वापर करण्यात आला. त्यामध्ये "रूप तुझे", "प्रेम तुझे" यांसारख्या ओळींची पुनरावृत्ती, तसेच "ख्रिस्तस्वरूपी माऊली", "ख्रिस्त महाराज की जय" आणि "नाम येशूचा" असे प्रयोग करण्यात आल्याचे आफळे यांनी नमूद केले.

हिंदू उपासना-पद्धतीची रचना आणि ओळख कायम ठेवत केवळ उपास्य तत्त्व बदलणं, हे धार्मिक ओळखीचे नियोजित रूपांतर असल्याचे आफळे म्हणाले.

कायदा लागू होण्यापूर्वीच गुन्हा?

या तक्रारीवरून पोलिसांनी इमिग्रेशन आणि परदेशी कायदा 2025 आणि सह महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026च्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पण मुळात राज्य सरकारने जारी केलेल्या राजपत्रात या अधिनियमातील तरतुदी 28 ऑगस्ट पासून अंमलात येतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असताना आधीच गुन्हा नोंद कसा झाला असा सवाल आता देवनूर यांचे वकील अँड. विजय ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बीबीसी मराठीशी बोलताना विजय ठोंबरे म्हणाले, "नुकताच खडक पोलीस स्टेशन येथे ब्रिटिश नागरिक पंकज देवनूर यांच्या विरुद्ध धर्मांतर केल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला होता. तो दाखल केल्यानंतर आम्ही देवनूर यांच्या तर्फे सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन देखील घेतला होता. मात्र पोलिसांच्या घाईमुळे हा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आजच राज्यपाल महोदयांचा जीआर आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम हा 28 ऑगस्ट 2026 पासून कायदा म्हणून महाराष्ट्रात ग्राह्य धरण्यात यावा असा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट नंतर हा कायदा अंमलात येणार असताना पोलिसांनी घाई करून केवळ काही लोकांना खूष करण्यासाठी, काही संघटनांना खूष करण्यासाठी जो कायदा अस्तित्वात नाही त्याची कलमं लावून गुन्हा दाखल केला."

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पुण्यात दोन गुन्हे दाखल; नियम तयार होण्याआधीच कारवाई कशी?

चर्च आणि मराठी संस्कृती

मुळात चर्चला 'मंदिर' किंवा 'देऊळ' असं संबोधणं असेल किंवा 'कीर्तना'सारख्या माध्यमाचा वापर करणं, ख्रिश्चन संस्कृतीत या गोष्टी पूर्वापार असून त्या मराठी संस्कृतीतूनच रुजल्याचा दावा अभ्यासक करतात.

रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी मराठी ख्रिस्ती मंडळींसाठी अनेक अभंग, ओव्या रचल्या. त्यांच्या अनेक अभंगांना चाल लावली गेली आणि भजनांमध्ये त्यांचा समावेश झाला.

त्यांचं 'ख्रिस्तायन' हे महाकाव्यही प्रसिद्ध आहे. ख्रिस्तायनाच्या 11 व्या अध्यायानंतरचे सर्व लेखन लक्ष्मीबाई टिळकांनी केले आणि ख्रिस्तायन पूर्ण झाले.

रे. ना. वा टिळक

फोटो स्रोत, ONKAR KARAMBELKAR/BBC

फोटो कॅप्शन, रे. ना. वा टिळक

रेव्हरंड टिळकांबरोबर लक्ष्मीबाई टिळकांनीही कीर्तनाला सुरुवात केली. 1915 साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ राहुरी, अहमदनगर, महाबळेश्वर, वाई अशा गावांमध्ये गेला.

1842 पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे नियतकालिक सुरू केले होते. ना. वा. टिळकांनी 1900-1919 या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं.

रे. टिळकांनी लिहिलेली उपासनं गीतं आजही मराठी ख्रिस्ती मंडळी विविध चर्चेसमध्ये म्हणतात अशी माहिती डॉ. रंजन केळकर बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.

रे. ना. वा टिळक

फोटो स्रोत, FACEBOOK/MUKTA ASHOK TILAK

फोटो कॅप्शन, रे. ना. वा टिळक

डॉ. केळकर भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक होते, त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक होते तसेच त्यांचे आजोबा हरी गोविंद केळकर यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी रूग्णालय चालवले होते.

टिळकांच्या कवितांबद्दल बोलताना डॉ. केळकर म्हणाले होते, "मराठी ख्रिस्त मंडळींमध्ये 'उपासना संगीत' नावाचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये विविध मराठी कवींनी लिहिलेली भजनं आणि गाणी आहेत. त्यात सुमारे 600 गाणी असावीत, त्यातील निम्मी गीतं एकट्या टिळकांचीच आहेत. टिळकांची गीतं गेय आणि रसाळ आहेत. एकेकाळी चर्चमध्ये हार्मोनियम, चिपळ्या घेऊन भजनं होत असत. माझे वडील टिळकांचे ख्रिस्तायन आणि अभंगांजली शिकवायचे. टिळकांच्या गीतांचा वारसा लुप्त होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

फक्त रेव्हरंड टिळकच नाही तर रेव्हरंड कृष्णाजी रत्नाजी सांगळे हे 19 व्या शतकातील एक ख्रिस्ती धर्मगुरू, कवी आणि मराठी साहित्यिक होते. त्यांनी ख्रिस्ती भजन, गीते आणि काव्यरचनांच्या माध्यमातून मराठी सारस्वतात मोलाचे योगदान दिले आहे असं पत्रकार आणि लेखक कामिल पारखे नोंदवतात.

या तक्रारीत उल्लेख केलेल्या शब्दांच्या बाबात बोलताना पारखे म्हणाले, " ख्रिस्ती धर्म हा भारताला नवा नाहीये. येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट थॉमस हे इथं आले भारतामध्ये त्याला 2000 वर्षांची परंपरा आहे. 18, 19 व्या शकतात तो महाराष्ट्रात आला.

ख्रिस्ती माणसं आहेत ती परदेशातून पडलेली नाहीत, आभाळातून पडलेली नाहीत. ती या मातीतली, धर्मातली लोक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा बघा केरळ मध्ये मल्याळम असते, महाराष्ट्रात मराठी बोलतो. आम्ही इथलेच आहोत. आमच्या धर्म जरी ख्रिस्ती असला तरी आमची संस्कृती इथली आहे. त्यामुळे आम्ही प्रार्थना उपासना करतो ती मराठी भाषेमध्ये असते. आम्ही रेव्हरंड नारायण वामन टिळक, सांगळे आहेत त्यांनी गीतं रचली, गायनं रचली, कीर्तनं उपासनं लिहिली ती सगळी मराठी या माणसासाठी होती. हे काही नवीन नाही आपलं. आणि तुम्ही कुठंही गेला तरी मराठी माणसं चर्च हा शब्द वापरत नाही आम्ही. आम्ही देऊळ म्हणतो."

पंचहौद मिशनचा वाद

पुण्याच्या गुरुवार पेठेतल्या ज्या 'पवित्र नाम देवालय' या ठिकाणी आयोजित कऱण्यात आलेल्या व्याख्यानावरून हा वाद झाला त्याचाही इतिहास मोठा रंजक आहे. ऐतिहासिक बांधणीची इमारत, मोठा टॉवर आणि त्यावरची घंटा ही या चर्चची ओळख. या वादानंतर या चर्चेच्या बाहेर, 'आमचा कोणत्याही प्रकारे धर्मांतर करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही', असा बोर्ड लावण्यात आला आहे.

आजही पुण्याचं हे चर्च महाराष्ट्रातील एक जुनं आणि महत्त्वाचं चर्च म्हणून ओळखलं जातं. लोकमान्य टिळक आणि तत्कालीन पुण्यामधील लोकांच्या आयुष्यात आलेले चहाचे प्रकरण याच चर्चेमध्ये घडलं आणि 'पंचहौद मिशन प्रकरण' नावाने ते अजरामर झालं.

पंचहौद मिशनचा वाद

फोटो स्रोत, KARAN RASKAR

फोटो कॅप्शन, पंचहौद चर्च

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी एकदा मात्र त्यांनी पुण्यातल्या सुशिक्षित, सुधारकांना उघडे पाडण्यासाठी पंचहौद मिशनमधील चहाची योजना आखली. आज चहा आणि इतर पदार्थांना भारतात सहज मान्यता मिळाली असली तरी त्या काळात चहा-बिस्किटाला मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे ते चहा पिणं धाडसाचं होतं.

गोपाळराव जोशी यांनी पंचहौदमधल्या रे. रिव्हिंग्टन यांच्या मदतीने पुण्यातील काही लोकांना व्याख्यानाला उपस्थित राहाण्याचं आमंत्रण दिलं. त्यामध्ये दहा ते बारा महिलासुद्धा होत्या. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती माधवराव रानडे, वि. का. राजवाडे, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने, सदाशिवराव परांजपे, विष्णू मोरेश्वर भिडे, चिंतामण नारायण भट, सीतारामपंत देवधर यांच्यासारखे अनेक लोक उपस्थित होते.

पंचहौदमध्ये व्याख्यान झाल्यानंतर या सर्वांसमोर चहा आणि बिस्किटं आणून ठेवण्यात आली. हे पदार्थ असे समोर मांडल्यावर साहजिकच उपस्थितांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ते खावेत तरी संकट आणि ते समोर मांडू नका हे सांगण्यातली भीड यामध्ये सर्वांची कोंडी झाली. काही लोकांनी चहा पिऊन फस्त केला तर काही लोकांनी चहा पिण्याचा देखावा केला. काही लोकांनी केवळ घोटभर चहा घशात ढकलून आदरातिथ्याचा सन्मान केला.

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पुण्यात दोन गुन्हे दाखल; नियम तयार होण्याआधीच कारवाई कशी?

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यातल्या लोकांनी मात्र हे प्रकरण चांगलेच तापवत ठेवले. चहा-बिस्कीट प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून प्रायश्चित्त ठरवण्यासाठी शं‍कराचार्यांकडे दाद मागण्यात आली. व्यंकटशास्त्री निपाणीकर आणि बिंदुमाधवशास्त्री सर्व-धर्माधिकारी यांचं एक कमिशन नेमलं गेलं. या कमिशनचं कामही बरेच महिने रेंगाळत गेलं.

याखटल्यात वादी पक्षातर्फे बाळासाहेब नातू, लक्ष्मणराव ओक, गोविंदराव गद्रे, सरदार ढमढेरे, विष्णूपंत रानडे यांच्यासारख लोक होते तर प्रतिवादींमध्ये पुणे वैभवमध्ये नावे प्रसिद्ध झाली असे लोक होते.

कित्येक लोकांनी आम्ही या कमिशनला जुमानतच नाही अशी भूमिका घेतली. हे कोर्ट काही नेहमीसारखं नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड आगपाखड आणि टीका चालू राहिली, ती वर्तमानपत्रांतून प्रसिद्धही होत राहिली.

या प्रकरणात वेळ चालल्यावर प्रतिवादींनी वेगवेगळी प्रायश्चित्तं घ्यावीत अशीही चर्चा सुरू झाली. मात्र लोकमान्य टिळकांनी 'ज्या गोष्टीला (म्हणजे चहा पिण्याला) धर्मग्रंथात प्रायश्चित्त नाही त्यासाठी प्रायश्चित्तच का घ्यावे?' अशी भूमिका घेतली. ज्या धर्मशास्त्राचा आधार घेऊन वादी लढत होते त्याचाच आधार टिळकांनी घेतला होता. नंतर हे कमिशन बाजूला ठेवून थेट शं‍कराचार्यांकडेच वादीपक्षाने विनंती केली.

लोकमान्य टिळक

फोटो स्रोत, pib

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक

निपाणीकर आणि धर्म-सर्वाधिकारी यांच्या कमिशनने अखेर 46 जणांवर टाकलेल्या फिर्यादीचा निकाल जाहीर केला. यामध्ये 9 जणांवरील फिर्याद विविध कारणांनी मागे घेतली होती. मिशनमध्ये जाऊन चहा न घेतलेल्या 8 जणांना यथाशक्ती दान देण्याचं प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.

8 जणांनी प्रायश्चित्तासाठी अर्जच दिला होता. त्यामध्ये न्या. रानडे, चिंतामण भट यांचा समावेश होता. तर 16 जणांनी कमिशनला दादच दिली नव्हती. ते गैरहजरच राहिले, त्यांनी चहा घेतला की नाही हे सिद्धच झालं नव्हतं, परंतु त्यांनाही प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.

वासुदेवराव जोशी, सदाशिवराव परांजपे, रामभाऊ साने, लोकमान्य टिळक यांनी चहा घेतला होता. टिळकांनी आपण काशीला गेलो असताना प्रायश्चित्त घेतल्याचा पुरावा दिला तर उरलेल्या तिघांना इतर प्रायश्चित्तं सुनावण्यात आली. पुढे हे प्रकरण शं‍कराचार्यांकडेच गेले.

प्रायश्चित्तानंतर हे प्रकरण संपेल असं वाटलं असलं तरी प्रत्यक्षात ते जास्तच चिघळलं. ज्या लोकांनी या कमिशनला दाद दिली नाही त्यांच्यावर थेट ग्रामण्य म्हणजे बहिष्कार लादण्यात आला. त्यांच्याकडे कोण येईनासे-जाईनासे झाले. ते ज्यांच्याकडे जातील किंवा त्यांच्याकडे जे जातील, अन्न घेतील त्यांनाही त्याची झळ बसू लागली.

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत पुण्यात दोन गुन्हे दाखल; नियम तयार होण्याआधीच कारवाई कशी?

फोटो स्रोत, Getty Images

न्या. रानडे, भट यांनी प्रायश्चित्त घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. सुधारकांनी अशी भूमिका घ्यायला नको होती असंही म्हटलं जात होतं. हेकट धर्माभिमानींची खोड मोडण्यासाठी आपण प्रायश्चित्त घेतले असं रानडे यांनी स्पष्ट केलं तर चिंतामण भट यांनी आईच्या आग्रहाचं कारण दिलं. यामुळे पुण्यात शुक्ल म्हणजे धर्माभिमानी आणि कृष्ण म्हणजे बाटलेले लोक असे दोन गटच पडले.

हळूहळू हे वाढत गेले. कृष्णपक्षाशी संबंधात येणाऱ्या लोकांना त्याच्या संसर्गदोष झाला म्हणून रोष सहन करावा लागत असे. कित्येक घरातील जेवणावळी बंद पडल्या, लग्नकार्यात कृष्णपक्षातील लोकांशी संबंध तर येत नाही ना हे पाहिलं जाऊ लागलं. हा दोष टाळण्यासाठी लोक आपल्या मुलींना माहेरी पाठवेनासे झाले. लग्नसमारंभात भटजी मिळणेही दुरापास्त झाले.

कृष्णपक्षातल्या लोकांवर लादलेल्या बहिष्काराची झळ सण-समारंभात जास्त जाणवली. खुद्द टिळकांच्या घरातील दोन कार्यांमध्ये ही अडचण आली. त्यांचा मोठा मुलगा विश्वनाथचा व्रतबंध सोहळा आणि मोठ्या मुलीचे लग्न याच काळात झाले.

रमाबाई रानडे यांनी 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात 'पंचहौद मिशनमधील चहा प्रकरण आणि ग्रामण्य' या प्रकरणात याचा उल्लेख केला आहे. बहिष्काराची झळ त्या कुटुंबांतील महिलांना कशी बसली आणि प्रायश्चित्तानंतर घरात झालेली चलबिचल यावरही त्यांनी लिहिलं आहे.

पंचहौद चर्चमध्येच आता हे इतक्या वर्षांनी प्रकरण घडल्यामुळे या सगळ्या इतिहासानं एक वर्तुळ पूर्ण केलं असं म्हणता येईल.

पुण्यातल्या पहिल्या चर्चला पेशव्यांनी दिली होती जागा

पेशवे आणि पोर्तुगीजांचा 18 व्या शतकामध्ये मोठा संबंध आलेला दिसून येतो. सैनिकी, व्यापारी आणि इतर राजकीय संबंध दोघांत असल्याचे दिसते. एकमेकांचे वकील परस्परांकडे जाणं, पत्रव्यवहार तसेच एकमेकांसदर्भातील घडामोडींवर दोघांचीही बारीक नजर असल्याचं दिसतं.

पेशवाईतील महत्त्वाचा आणि मोठा काळ नाना फडणवीसांद्वारे कारभार चालवला गेला. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांच्याशी असलेल्या संबंधांत त्यांचा मोठा वाटा होता.

डॉम मिंगेल दी नोरोन्हा हे पोर्तुगीज अधिकारी पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते. गोवा आणि पोर्तुगीज प्रांतातील सैनिक या सैन्यात होते असं सांगितलं जातं.

सिटी चर्च

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC

फोटो कॅप्शन, सिटी चर्च, पुणे

या ख्रिस्ती सैनिकांच्या धार्मिक गरजांसाठी फादर विन्सेंट जोआकिम मेनेझिस यांची नेमणूक करण्यात आली होती.

नोरोन्हा यांनी आपल्या ख्रिस्तीबांधवांना धार्मिक कार्यासाठी आणि प्रार्थनेसाठी चर्चची गरज असल्याची मागणी केली. त्यानुसार तेव्हा कारभार सांभाळणाऱ्या सवाई माधवरावांनी नाना पेठेतील एक भूखंड सिटी चर्चसाठी दिला.

हे चर्च नाना पेठेत आहे. ही पेठ नाना फडणवीसांनी विकसित केली होती. तिचं मूळ नाव हनुमंत पेठ असं होतं.

ख्रिस्त'पुराण'

या तक्रारीमध्ये ज्या मराठी शब्दांचा उल्लेख केला आहे. ते शब्द गेले अनेक वर्षं, दशकं किंवा शतकं मराठी ख्रिस्ती वापरत आले आहेत. ख्रिस्ताचं जीवन मराठीत आणणाऱ्या फादर स्टीफन्स यांनी आपल्या ग्रंथाचं नाव ख्रिस्त'पुराण' असंच ठेवलं होतं.

ख्रिस्तपुराणाचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे फादर स्टीफन्स यांनी स्थानिक भाषेचा आणि सांस्कृतिक मुल्यांचा अभ्यास करुन वापरलेल्या शब्दांची योजना. आपण ज्यांना उपदेश करायचा आहे किंवा ख्रिस्ताच्या गोष्टी सांगून आपलंसं करायचं आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांची भाषा-हवामान वेगळं आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून बायबल थेट आहे तसं सांगण्यापेक्षा त्यांनी त्या पुराणाचं भारतीयीकरण केलं. गोव्याच्या कोकणातल्या लोकांना समजेल असे शब्द वापरायला सुरुवात केली.

ख्रिस्त'पुराण'

फोटो स्रोत, Getty Images, KHRIST JYOTI PUBLICATION

ख्रिस्तपुराणात त्यांनी काही नव्या संज्ञाही तयार केल्या आहेत. बाप्तिस्माला ज्ञानस्नान, सॅक्रिफाईसला पूजा, टेम्पलला देऊळ, मेडिटेशनला ज्ञानपूजा, ऑल्टरला देव्हारा अशा शब्दांची त्यांनी योजना केली आहे. बायबलमधील मेंढपाळांच्या उल्लेखाच्यावेळेस त्यांनी गोपालु (गाय पाळणारे) असा उल्लेख केला आहे. इथं त्यांनी कोकणात मेंढपाळ आढळत नाहीत याची दखल घेतलेली दिसते. त्याबरोबरच वैकुंठ, भक्ती, मुक्ती, मोक्ष, कर्म असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहे. नैवेद्य, स्मृती, पूजा, ग्रंथ, शास्त्र, अर्पण, समर्पण हे शब्दही ख्रिस्तपुराणात विपुल आढळतात.

फादर स्टीफन्स यांनी वापरलेल्या शब्दांबाबत बोलताना लेखिका अनुपमा उजगरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "गोव्यातल्या लोकांना 'ख्रिस्तपुराण' समजावं म्हणून स्वर्गाला वैकुंठ आणि ख्रिस्ताला वैकुंठपती, वैकुंठराया असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहेत. तसेच अनेक नव्या शब्दांची भरही त्यांनी घातली आहे. स्थानिक अध्यात्म परंपरेशी सुसंगत साहित्य तयार करण्याचा प्रयत्न विशेष वाटतो."

ख्रिस्तपुराण

फोटो स्रोत, Khristujyoti publication

त्यांच्या या शब्दयोजनेचं थोर समीक्षक डॉ. शं. गो तुळपुळे यांनी कौतुक केलं होतं. "हिंदू मनाला पटेल असा पौर्वात्य वेश आणि ते काव्यरुपाने ख्रिस्तचरित्राला देण्याची कामगिरी पार पाडलेली आहे. भाषा, वृत्त, कल्पना, कवी संकेत इत्यादी, सर्व काव्यांगे त्यांनी अस्सल मराठी ठेवली आहेत. आतील मूर्ती तेवढी येशू ख्रिस्ताची, बाकी मंदिराचा सारा थाट हिंदू पद्धतीचा अशी या पुराणाची रचना आहे", असं तुळपुळे यांनी स्टीफन्स यांच्या लेखनाचं वर्णन केलं होतं.

ख्रिस्तपुराणावर आपल्या मराठी संत वाड्मयाचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. ज्ञानदेवांनी जशी सर्वात आधी देवाकडे आराधना केली आहे. तशीच आराधना स्टीफन्स यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात पहिल्याच ओवीत केली आहे.

पहिल्या ओवीत ते म्हणतात,"ओ नमो वीस्वभरीता, देवबापा सर्व समर्थापरमेश्वरा सत्यवंता, स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा तुं रीधीसीधीचा दातारु, क्रुपानीधी करुणाकरुतुं सर्व सुखाचासागरु, आदी अंतु नातुडे"

सर्व विश्वव्यापी सर्व समर्थ देवबाप्पाला नमस्कार, स्वर्ग आणि पृथ्वीची रचना करणाऱ्या सत्यवंत परमेश्वराला नमस्कार. तू सर्व काही देणारा आहेस. तू कृपानिधी करुणाकर आहेस. तू सर्व सुखाचा सागर आहेस, तू अनादी अनंत आहेस असं ते यातून म्हणतात. या अध्यायाची सुरुवात ते श्री सर्वेश्वर प्रसन्न. श्री देवमाता प्रसन्न. श्री गुरु प्रसन्न असं लिहून करतात.

ज्ञानेश्वरांनी जशी 'तरी न्यून ते पुरते, अधिक ते सरते. करुन घ्यावे हे तुमचे, ग्रंथी इये' असं विनम्रपणे लिहिलं होतं तसंच फादर स्टीफन्स यांनी दुसऱ्या पुराणाच्या शेवटी 'या दोही पुराणां भितरी, कांहि चुकि देखाल जरि. तरि क्षेमां करोन मांझेवरि, न किजे कोपु' म्हणजे या दोन्ही पुराणांमध्ये काही चुका दिसल्या तर मला क्षमा करुन माझ्यावर रागावू नका अशी विनंती केली आहे.

भगवद्गीतेत जसं आत्मा अमर आहे हे सांगण्यासाठी 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः' असं वर्णन आहे तसंच फादर स्टीफन्स यांनी येशूचं शरीर अमर आहे हे सांगण्यासाठी तशाच शब्दांची योजना केली आहे.

"ना आंग्नीचेन जाळीचे, ना उदकाचेन न भीजजेना वायुचेन शोखीजे, ऐसी कुडि उतमीमारल्यावरि फार, दुखि न पावे शरिरतान भु श्रमु निद्रा, न लागे सर्वथां" अशा शब्दांमध्ये त्यांनी येशूचं शरीर आगीमध्ये जाळलं जाऊ शकत नाही, ते पाण्यात भिजू शकत नाही. त्याला तहान, भूक, श्रम, निद्रा यांची काहीच गरज नाही असं ते करतात.

कायद्याची गरज काय

दरम्यान मुळात कायद्यात तरतूदी असताना अशा वेगळ्या कायद्याची गरज काय होती असाही सवाल आता विचारला जात आहे.

याविषयी बोलताना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिल्याचा मुद्दा मांडला. तसंच यापूर्वी अनेक राज्यांमध्ये हा कायदा झाला आहे. त्या राज्यांमधले लोक या कायद्याविरोधात कोर्टात गेले आहेत. मात्र या प्रकरणांचे निकाल लागण्याआधीच महाराष्ट्र शासनाने हा कायदा का आणला असा सवाल उपस्थित केला.

गेल्या 8 वर्षांमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये अशाप्रकारे धर्मांतरविरोधी कायदे संमत करण्यात आल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या 8 वर्षांमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये अशाप्रकारे धर्मांतरविरोधी कायदे संमत करण्यात आल्याचं दिसून येतं.

प्रा तांबोळी म्हणाले, "महाराष्ट्रापूर्वी 12 राज्यांमध्ये हा कायदा लागू झाला. त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. त्याचा निवाडा अजून झाला नाही. तरीपण महाराष्ट्र शासनाला घाई झाली आणि त्यांनी हा कायदा अस्तित्वात आणला. हा कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी हिंदू जनजागरण समिती असेल, जनजागरण मोर्चे असतील... असं एक वातावरण तयार केलं 'लव्ह जिहाद'च्या नावाने आणि प्रत्येक आंतरधर्मीय विवाह म्हणजे लव्ह जिहादच आहे असं एक प्रोपगंडा, अपप्रचार केला. आणि या सगळ्या मध्ये लक्षात घेतलं पाहीजे की आत्ताचं जे सरकार आहे त्याची गरज म्हणून हा कायदा अस्तित्वात आला."

"धर्मस्वातंत्र्य दिलेलं असताना असंही स्पष्ट केलेलं आहे की धर्मांतर करत असताना कुठे फसवणूक असेल किंवा कुठली आकर्षण देण्यात येत असतील, दबाव असतील तर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येऊ शकते. शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे धर्मस्वातंत्र्याचं जे कलम आहे त्यात अशा फसव्या पद्धतीने करणं हा गुन्हाच आहे. असं असतानाही हा कायदा आणला गेला आहे त्याचे मोटिव्ह्ज म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काही प्रमाणात अशा पद्धतीने फसवून धर्मांतरं होत असतील तर ते चुकीचं आहे पण असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होणं गरजेचं आहे."

पोलिसांनी मात्र यात गुन्हा दाखल झाला त्याचं पुढे काय हे सरकार ठरवेल अशी भूमिका घेतली आहे. मात्र त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. ती मिळाल्यास इथे अपडेट केली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)