कोरोना व्हायरस मृत्यू आणि हवेच्या प्रदूषणाचा नेमका काय संबंध आहे?

मास्कचा वापर

फोटो स्रोत, ANI

    • Author, नवीन सिंह खडका
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

प्रदूषणामुळे कोव्हिड 19 च्या मृत्यूंचं प्रमाण वाढू शकतं असा इशारा ICMR ने दिलाय. हिवाळ्यात भारतात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत जाते त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करणं अधिक आव्हानात्मक होणार आहे.

ICMR चे संचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले, "प्रदूषण मृत्यूच्या कारणांपैकी एक महत्वाचं कारण आहे हे सर्वश्रुत आहे. कुपोषण, तंबाखूसेवन, उच्च रक्तदाब आणि प्रदूषण ही मृत्यूची महत्त्वाची कारणं आहेत. युरोप आणि अमेरिकेत झालेल्या काही संशोधनांमध्ये प्रदूषित भागांचा अभ्यास करण्यात आला. प्रदूषणामुळे कोव्हिड 19 चे मृत्यू वाढतात हे त्यातून दिसून आलंय."

डॉ. भार्गव पुढे म्हणाले, 'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसंच हवेच्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी स्वस्त आणि सोपा उपाय म्हणजे मास्कचा वापर. मास्कचा तातडीने आणि व्यापक स्तरावर अवलंब करणं हा आपल्यापुढचा उपाय आहे.'

अलिकडेच हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की PM 2.5 या प्रदुषकाच्या प्रमाणात दर क्युबिक मीटरमागे 1 मायक्रोग्रॅमची जरी वाढ झाली तरी कोव्हिड-19 च्या मृत्यूदरात 8% वाढ होऊ शकते. केंब्रिज विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातही कोव्हिडचा संसर्ग आणि दीर्घकाळ प्रदुषित हवेत राहणं याचाही थेट संबंध असल्याचं दिसून आलं होतं.

गेले काही आठवडे मुंबईतील हवेची गुणवत्ता 180 ते 400 मध्ये खाली-वर होताना दिसत आहे. दिल्लीतील पीएम 2.5 प्रदूषकाची पातळी 180-300 च्या घरात होती. ही WHO ने सांगितलेल्या सुरक्षित पातळीच्या अनेक पट जास्त आहे.

भारतातल्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीच्या खूप वर जातो. फेब्रुवारी 2020मध्ये जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 21 शहरं होती.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EDUARDO MUNOZ ALVAREZ

'कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात म्हटलं गेलंय की जगभरातील कोव्हिड-19 मृत्यूंपैकी 15% मृत्यू हे दीर्घकाळ प्रदुषित हवेत राहिल्यामुळे होतात. पूर्व आशियात हा आकडा आणखीन वाढतो कारण 27% मृत्यू प्रदूषणाशी संबंधित आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेत हा आकडा 19% आणि 17% आहे.

भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा नंबर कायमच वरती असतो. दिल्लीभोवतालच्या राज्यांमध्ये हिवाळ्यात शेत भाजणी होत असते. याला 'पराली'चा हंगाम म्हटलं जातं. वाहनं आणि रहदारीमुळे होणाऱ्या प्रदूषणात याचीही भर पडत असते. अलिकडेच दिल्ली, हरयाणा आणि पंजाब सरकारच्या प्रतिनिधींची यासंदर्भात बैठक पार पडली होती.

डॉ. भार्गव यांनी युरोप आणि अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणांचा आणि अभ्यासांचा उल्लेख केला. हार्वर्ड विद्यापीठाने अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात अमेरिकेतील 3000 काउंटींचा अभ्यास केला गेला होता.

दुषित हवेमुळे कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होण्याची जोखीम वाढत असल्याचा निष्कर्ष दोन संशोधनांमध्ये काढण्यात आला आहे. प्रदूषणाचं प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये असं आढळून आलं आहे की, प्रदूषणाशी संबंधित आजार असलेल्यांमध्ये कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं दिसून आली.

"लोकसंख्येची घनता आणि हवेत PM2 कणांचं प्रमाण जास्त असणाऱ्या भागांमध्ये कोव्हिड-19 आजाराचं प्रमाणही जास्त असल्याचं" हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालात म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, MARCO BERTORELLO

PM2.5 कणांमुळे फुफ्फुसाचा संसर्ग आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असल्याचं यापूर्वी आढळून आलं आहे.

याविषयी बोलताना लडविग मॅक्सिमिलन युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिचच्या प्राध्यापिका अॅनेट पिटर म्हणतात, "हवेतल्या PM2 कणांमुळे कोव्हिड-19 संसर्गाची तीव्रता वाढू शकते, या आमच्या हायपोथिसिसला बळ देणारं हे संशोधन आहे."

संशोधन करणारे प्रा. फ्रान्सेस्का डॉमिनिकी म्हणतात, "या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात प्रदूषणासंबंधीचे नियम शिथील करण्याचा संबंधितांचा विचार सुरू आहे. मात्र, आमच्या या अभ्यासानंतर हवा अधिक प्रदुषित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी आशा आम्हाला वाटते."

हवेचं प्रदूषण आणि कोव्हिड-19 यासंबंधी इटलीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ सिएन्नामध्ये आणि डेन्मार्कमधल्या अॅरहस युनिव्हर्सिटीमध्येही एक संशोधन करण्यात आलं आहे. इटलीच्या उत्तरेकडच्या भागात प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि कोव्हिड-19 मुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही याच भागात सर्वाधिक आहे. या दोघांमध्येही संबंध असल्याचं या विद्यापीठांनी केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे.

इटलीच्या उत्तरेकडच्या लोम्बार्डी आणि ईमिलिया रोमॅग्ना या दोन प्रांतांमध्ये कोव्हिड-19 चा मृत्यूदर सर्वांत जास्त आहे. तब्बल 12%. तर उर्वरित इटलीमध्ये कोव्हिड-19 चा मृत्यूदर आहे 4.5%.

सायन्स डिरेक्ट जर्नलमध्ये छापून आलेल्या या संशोधनात म्हटलं आहे, "इटलीच्या उत्तरेकडच्या भागातली हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित आहे. कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हादेखील एक अतिरिक्त घटक असू शकतो."

अर्थातच लोकसंख्या, वय, आरोग्य यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपाय या बाबीदेखील महत्त्वाच्या आहेत.

कोरोना
लाईन

जगातली 90% लोकसंख्या अशा ठिकाणी राहते जिथे हवेच्या प्रदूषणाची पातळी त्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या पातळीपेक्षा जास्त आहे. विशेषतः गरीब देशांमध्ये.

2019 च्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्त असणारी सर्वाधिक शहरं भारतात आहेत.

दिल्लीतल्या प्राईमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधले फुफ्फुसाच्या आजारासंबंधीचे तज्ज्ञ डॉ. एस. के. छाब्रा सांगतात,"कोरोना विषाणुचा फैलाव झाला तर वायू प्रदूषणामुळे आधीच कुठलातरी आजार जडलेल्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होईल."

पब्लिक हेल्थ फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष प्रा. श्रीनाथ रेड्डी म्हणतात, "हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनमार्ग आणि फुफ्फुसाच्या पेशी डॅमेज झालेल्या असतील तर कोरोना विषाणुच्या हल्ल्याचा सामना करण्याची क्षमताही खालावेल."

प्रदूषण

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

मात्र, इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांच्य मते, "यासंबंधी पुरेसे पुरावे नाहीत आणि आम्ही त्यादृष्टीने कुठलंच संशोधनही केलेलं नाही."

2002 साली याच कोरोना कुटुंबातीलच एका विषाणुमुळे सार्स (सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आजाराची साथ आली होती. जगभरातल्या 26 देशात 8000 लोकांना सार्सची लागण झाली होती तर 800 जणांचा मृत्यू झाला होता.

2003 साली लॉस एंजेलिसमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात असं आढळलं की हवेचं प्रदूषण जास्त असणाऱ्या भागांमधल्या लोकांमध्ये या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते.

प्रदूषण

फोटो स्रोत, MARIO TAMA

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)