You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः बर्थडे पार्टीमुळे कसा झाला 10 जणांना कोव्हिड-19
- Author, विंसियस लेमोस
- Role, बीबीसी प्रतिनिधी, ब्राझिल
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
ब्राझिलमध्ये बर्थडे पार्टी देणं एका कुटुंबासाठी फारच महागात पडलं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तिघांचा मृत्यू झाला तर 10 जणांना कोरोनाची लागण झाली.
असं काही होईल, याची कुणी कल्पनादेखील केलेली नव्हती. मात्र, या बर्थडे पार्टीच्या दोन आठवड्याच्या आतच अनेकजण आजारी पडले. त्या पार्टीत सहभागी झालेल्या बहुतेक जणांकडे आता कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून बघितलं जात आहे.
ब्राझिलमधल्या साओ पाउलो शहरात एका कुटुंबाने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या 28 जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातले होते.
या तिघांपैकी एकाचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.
तीन आठवड्यांमध्ये वाढली संख्या
13 मार्च रोजी साओ पाउलो शहरातल्या इटापेर्सिया डे सेरा भागात ही पार्टी झाली होती. ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तोवर देशात 98 लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. मात्र, कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.
ब्राझिलमधले 60% कोरोनाग्रस्त साओ पाउलो शहरातलेच आहेत. या शहराची लोकसंख्या तब्बल 2 कोटी आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
या घटनेच्या जवळपास तीन आठवड्यांनंतर 8 एप्रिलपर्यंत ब्राझिलमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 16 हजारांच्याही वर गेली होती. तर 800 हून जास्त जणांचा या आजाराने मृत्यू झाला होता.
वेरा लुसिया परेरा यांना ब्राझिलमध्ये कोरोना विषाणुची साथ आल्याची माहिती होती. आपला 59 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला समारंभ रद्द करण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला होता. मात्र, तरीही त्यांनी कार्यक्रम रद्द केला नाही.
वेरा लुसिया परेरा यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्हाला शंका होती. तरीही पार्टी करायची, असं आम्ही ठरवलं. तोवर देशात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण खूप जास्त नव्हतं."
तोवर ब्राझिलमध्ये लॉकडाऊनसुद्धा लागू करण्यात आलेलं नव्हता.
पार्टीला 28 जणांची उपस्थिती
वेरा लुसिया परेरा यांनी घराच्या अंगणातच बर्थडे पार्टी दिली होती. यात कुटुंबातलेच 28 जण सहभागी झाले होते. यात वेरा लुसिया यांचे पती पाउलो विएरा यांची बहीण आणि भाऊदेखील सहभागी झाले होते.
पाउलो, त्यांचे भाऊ क्लोविस आणि बहीण मारिया यांनी पार्टीत खूप मजा केली. मात्र, आपल्या तिघांचाही कोव्हिड-19 ने मृत्यू होईल, याची कल्पनाही त्यांना नव्हती.
पार्टीत वेरा लुसिया यांच्या बहिणीदेखील होत्या. या जोडप्याच्या भावंडांची मुलंही होती.
पार्टी झाल्यानंतर काही दिवसातच निम्म्याहून जास्त पाहुण्यांना सर्दी-खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडचणी, असा त्रास जाणवू लागला होता. ही सगळी कोव्हिड-19 ची लक्षणं आहेत. अनेक जणांना सौम्य लक्षणं होती. त्यामुळे त्यांना फार वैद्यकीय मदतीची गरज पडली नाही.
भयंकर विषाणू
वेरा लुसिया यांचे पती पाउलो, त्यांचे भाऊ आणि बहीण यांचा लक्षणं दिसू लागल्यानंतर आठवडाभरातच मृत्यू झाला. मारिया यांचा मृत्यू कोव्हिड-19 आजाराने झाल्याचं प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
मारिया यांची मुलगी राफेला यांनी बीबीसीला सांगितलं, "आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की माझ्या आईचा मृत्यू कोरोनाचा संसर्ग झाल्याने झाला. यावरूनच हा विषाणू किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो. माझ्या आईवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तिला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. मात्र, तरीही डॉक्टर तिला वाचवू शकले नाही."
मारियाला मधुमेह होता आणि कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने ढासळत गेली. पाउलो आणि क्लोविस यांचा पोस्टमॉर्टम अहवाल अजून आलेला नाही. वेरा लुसिया म्हणतात, "त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना 99% खात्री आहे की त्यांचा मृत्यूही कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे झाला असावा."
मुलगा बचावला
वेरा लुसिया आणि त्यांच्या मुलातही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं. मात्र, सध्या दोघांची प्रकृती बरी आहे. वेरा सांगतात, "माझी प्रकृती आता बरी आहे. थोडा खोकला आहे. मात्र, हा काळ खूप कठीण आहे. आम्ही सगळेच भीतीच्या छायेत वावरत आहोत."
सुरुवातीला कुणाला विश्वासच बसत नव्हता की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोव्हिड-19 आजारातून बरे झालेल्या कुटुंबातल्या एका सदस्याने सांगितलं, "तोवर ब्राझिलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे आपल्याला लागण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं."
ते म्हणाले, "पार्टीच्या वेळी सगळ्यांची प्रकृती ठणठणीत होती. त्यामुळे सर्वात आधी संसर्ग कुणाला झाला, हे कळायला मार्ग नाही. आणि हे कळालं तरीसुद्धा आता आम्ही काय करणार आहोत?"
मारिया यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ 62 वर्षांचे क्लोविस यांची प्रकृती ढासळू लागली. क्लोविस यांचा मुलगा ऑर्थर यांनी बीबीसीला सांगितलं, "पार्टीच्या तीन दिवसानंतरच वडिलांचा खोकला खूप वाढला होता. त्यांचं डोकं दुखत होतं आणि त्यांना तापही होता. त्यांना चव आणि गंधही कळत नव्हते."
अतिदक्षता विभाग
क्लोविस यांना कुठलाही आजार नव्हता. मात्र, तरीही त्यांना अस्वस्थ वाटत होतं. ऑर्थर 23 मार्च रोजी वडिलांना घेऊन हॉस्पिटलला गेले होते. मात्र, तिथून त्यांना घरी पाठवण्यात आलं. ऑर्थर सांगतात, "डॉक्टरांना हेसुद्धा वाटलं नाही की हे कोरोनाचं प्रकरण असू शकेल."
क्लोविस आजारी पडल्यानंतर वेरा लुसिया यांचे पती पाउलो यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पाउलो त्यांच्या भावंडांपैकी सर्वात सुदृढ असल्याचं मानलं जायचं. ते व्यायामही नियमित करायचे.
पाउलो हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांची प्रकृती तुलनेने बरी होती. मात्र, श्वास घेताना त्यांना त्रास जाणवत होता. वेरा लुसिया सांगतात, "मात्र, दोन दिवसानंतरच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं."
क्लोविस आणि पाउलो दोघंही कायमच एकमेकांसोबत असायचे आणि मृत्यूच्यावेळीही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आयसीयूमध्येही दोघांचे बेड जवळजवळ होते. दोघांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.
अंत्यविधीवर बंधनं
1 एप्रिलला मारिया यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला क्लोविस यांचा मृत्यू झाला. तर 3 एप्रिलला पाउलो यांची प्राणज्योत मालवली.
ब्राझिलमध्ये कोव्हिड-19 आजारावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी संस्थेच्या सल्ल्यानुसार मारिया आणि पाउलो यांना सिलबंद कॉफिन्समध्ये दफन करण्यात आलं.
क्लोविस यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवरही वेगवेगळ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी काही मिनिटातच अंत्यविधी आटोपण्यात आले. सरकारी आदेशांनुसार अंत्यविधीला 10 पेक्षा जास्त जण उपस्थित नव्हते.
क्वारंटाईनमधलं आयुष्य
13 मार्चच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेले जे लोक कोरोनातून बचावले ते अजूनही आयसोलेशनमध्ये आहेत. ज्यांची प्रकृती ढासळली होती आणि आता बरी आहे त्यांनीही पुढचे काही दिवस वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांनी घरातच थांबावं, असं आवाहन ते करत आहेत. मारिया यांची मुलगी राफेला म्हणते, "ही काही साधी सर्दी नाही. ही साथ आहे. हा एक अत्यंत भयंकर आणि क्रूर विषाणू आहे."
ब्राझिलचे अध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी सोशल डिस्टंन्सिंग उपयोगाचे नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी कोव्हिड-19 आजाराच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत हा 'साधा फ्लू' असल्याचं म्हटलं होतं.
लुसिया राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी दिलेल्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करतात. त्या म्हणतात, "बोलसोनारो बरळत आहेत. ते एका जबाबदार पदावर आहेत आणि त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असायला हवी."
वेरा लुसिया यांच्यासाठी तर आयुष्याचा जोडीदार गमावल्यानंतर एकटीने आयुष्य कसं कंठायचं, हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. त्या म्हणतात, "आयुष्य तर चालतच राहील. मात्र, आमच्या कुटुंबीयांबाबत जे घडलं ते इतर कुणाबरोबरही घडू नये, असंच आम्हाला वाटतं."