कोरोना व्हायरस: चीनमधल्या वुहान शहरात आज काय स्थिती आहे?

फोटो स्रोत, ANI
चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान. इथूनच कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. हळूहळू कोरोना व्हायरसने जगभरातील प्रत्येक देशात प्रवेश केला.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीवर क्वारंटाईन होऊन राहण्याची वेळ आली आहे.
चीनमध्ये सुरू झालेल्या या विषाणूमुळे सर्वप्रथम इराण, नंतर इटली, स्पेन आणि आता अमेरिकेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना गेले काही दिवस चीनमध्ये याचा वेग मंदावल्याचं दिसून आलं.
जिथून या व्हायरसची सुरुवात झाली, ते वुहान शहरही तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू अंशतः खुलं करण्यात येत आहे.
शनिवारी रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्यानंतर वुहानच्या रेल्वे स्टेशनवर गर्दी पाहायला मिळाली.
सध्या लोकांना शहरात प्रवेश करण्यास परवानगी आहे. पण शहरातून बाहेर पडण्यास अद्यापही बंदी असल्याची माहिती मिळाली आहे.

फोटो स्रोत, AFP
चीनमध्ये आजपर्यंत 82 हजार व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. यापैकी 50 हजारपेक्षाही जास्त व्यक्ती वुहान शहरातीलच आहेत. हुबेईमध्येच सुमारे 3 हजार कोरोना व्हायरसग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

- वाचा- कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

पण चीन सरकारने दिलेल्या आकडेवारीमध्ये नंतर मोठ्या प्रमाणात घट झाला. शनिवारी हुबेई प्रांतात कोरोनाची फक्त 54 नवी प्रकरणं नोंदवण्यात आली, पण त्यांच्यानुसार हे रुग्ण इतर देशातून आलेले होते.
आता चीनमध्ये बाहेर देशातून संसर्ग झालेले प्रवासी येण्याचा धोका असल्यामुळे सध्यातरी चीनने परदेशी नागरिकांवर बंदी घातली आहे. त्यांच्याकडे व्हिसा किंवा राहण्यासाठीची परवानगी असली तरी ही बंदी लागू असेल.
त्याशिवाय चीन आणि इतर देशांदरम्यान होणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या घटवून आठवड्याला फक्त एक अशी करण्यात आली आहे. उड्डाण घेणाऱ्या विमानात 75% पेक्षा जास्त प्रवासी नसावेत, अशी अटही घालण्यात आली आहे.
वुहान पुन्हा खुलं होण्याचे काय परिणाम?
वुहानच्या सी-फुड मार्केटशी संबंधित लोकांमध्ये सर्वप्रथम कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून आली होती. याला जंगली प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापाराची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातं.
1 कोटी 10 लाख लोकसंख्येचं वुहान शहर जानेवारीच्या मध्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. शहरात फिरण्यावर तसंच दैनंदिन व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते.
पण शुक्रवारी मध्यरात्री शहरात प्रवेश करण्यासाठी रस्ते खुले करण्यात आले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

फोटो स्रोत, AFP
देशाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रेल्वेमार्गही खुले करण्यात आले. आता वुहानमधील 17 रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवेश करू शकतात.
19 वर्षीय विद्यार्थी गुओ लिआंगकाय वुहानमध्ये तीन महिन्यांनंतर आला. रॉयटर्सशी बोलताना गुओ सांगतो, "सर्वप्रथम इतक्या दिवसांनी माझ्या कुटुंबीयांना भेटण्यास मला अतिशय आनंद होत आहे. मला त्यांना मीठी मारू वाटत आहे. पण सध्याच्या स्थितीत लांब राहूनच भेटू शकतो."
वुहानमध्ये येत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारने बनवलेल्या अॅपवर आपण निरोगी असल्याबाबतचा ग्रीन कोड दाखवणं बंधनकारक आहे.

फोटो स्रोत, AFP
शहरातून बाहेर पडण्यावरची बंदी 8 एप्रिल रोजी उठवण्यात येईल. त्याच दिवशी इथली देशांतर्गत विमानसेवासुद्धा सुरु केली जाऊ शकते, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये डिसेंबर महिन्यात झाला होता. सुमारे चीनमध्ये एकूण 3300 नागरिकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. पण सध्या चीनपेक्षाही जास्त मृत्यू इटली आणि स्पेनमध्ये झाले आहेत.
विदेशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर सध्या लक्ष ठेवलं जात आहे.
हेवाचलंतका?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, , ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























