कोरोना लॉकडाऊन : तुमचंही इंटरनेट नेटवर्क मंदावलं आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोनामुळे अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र इंटरनेटचा संथ वेग त्यांच्या कामातला अडथळा ठरतो आहे.
जपानी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अस्मिता सध्या वेगळ्याच अडचणीत सापडल्या आहेत.
त्या करत असलेलं काम हे फक्त कंपनीच्या सिस्टीमवरच होऊ शकतं, म्हणून सुरुवातीला घरून काम करता येत नव्हतं...
पर्सनल लॅपटॉपला पर्याय म्हणून त्यांच्या कंपनीने त्यांचा संपूर्ण ऑफिस डेस्कटॉपच घरी न्यायला परवनागी दिली.
दोन मॉनिटर्स, सीपीयू, कीबोर्ड - माऊस, सगळ्या वायर्स असा लवाजमा त्यांनी मुंबईतल्या एका टोकाच्या ऑफिसमधून दुसऱ्या टोकाच्या घरी आणला, तीन मजले वर चढवला.
पण अजूनही त्यांना घरून काम करता येत नाहीये...
कारण....इंटरनेट.

फोटो स्रोत, Getty Images
ऑफिसची अॅप्लिकेशन्स वापरून काम करण्यासाठी किमान 50 mbps चा स्पीड गरजेचा आहे.
पुण्याच्या रचित मेहतांची परिस्थिती काहीशी अशीच
त्यांचंही सगळं काम इंटरनेटवर अवलंबून.
पण अचानक भरपूर लोक इंटरनेट जास्त प्रमाणात वापरायला लागल्याने इंटरनेटचा वेग मंदावलाय.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

बीबीसी मराठीशी बोलताना रचित म्हणाले, "आता आतापर्यंत आमच्याकडे डेटा कार्ड्स होती. पण नुकतीच कंपनीने ही कार्ड परत घेतली. अनेक कंपन्यांनी असं केलं, कारण आता डेटा कार्ड्सचा जमाना गेला. घरून थोडं काम कधी करावं लागलंच, तर हॉटस्पॉट करून आतापर्यंत करत होतो.
पण आता पूर्ण काम घरून करायला हा स्पीड पुरत नाही. शिवाय व्हिडिओ कॉल असेल तर अगदीच अडचण येते. कारण तिथे तुमचा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि इतर ९-१० जणांचा डाऊनलोड होत असतो, त्याला चांगला स्पीड असावा लागतो.
अगदी ईमेलवर हेवी अटॅचमेंट असेल, तरी अडचण येते. आता समजा एखादा मोठा सिक्युरिटी अपडेट आला वा ऑफिस सिस्टीम अपडेट आला तर काय करायचं?"
अचानक वाढलेली मागणी
कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिक व्यवहार बंद झाले.
कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलत देण्यात आली, आणि इंटरनेट डेटासाठीची मागणी अचानक वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
घरून काम करणाऱ्यांना काम पूर्ण करायला डेटा हवाय, तर काम होऊ शकत नाही, शाळा - कॉलेज बंद आहे, घराबाहेर पडू शकत नाही म्हणून घरी बसलेल्यांना टाईमपास करायला इंटरनेट हवंय.
भारतीय आणि इंटरनेटचा वापर
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच ट्राय (TRAI) च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एक ग्राहक एका महिन्याला सरासरी १० जीबी डेटा वापरतो. यामध्ये ओव्हर द टॉप मीडिया (OTT) म्हणजेच स्ट्रीमिंग सर्व्हिसेसद्वारे होणाऱ्या डेटा वापराचं प्रमाण मोठं आहे.
सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने घरून काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
शिवाय मनोरंजन, बातम्या मिळवणं, एकमेकांच्या संपर्कात राहणं यासाठीही इंटरनेटचा वापर होतोय.

फोटो स्रोत, Getty Images
परिणामी टेलिकॉम कंपन्यांकडे डेटासाठीची मागणी वाढलेली आहे.
तर दुसरीकडे आपला साधा ईमेल लोड व्हायलाही वेळ लागत असल्याच्या तक्रारी युजर्सकडून यायला लागल्या आहेत.
सध्याच्या घडीला आधीच अडचणीत असलेला टेलिकॉम सेक्टर यासाठी पुरेसा तयार नसल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
टेलिकॉम क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सांगताना ट्विमबिट (Twimbit) या रिसर्च कंपनीच्या टेलिकॉम अभ्यासक मीनाक्षी घोष सांगतात, "सध्या ज्या इंटरनेट डेटाची मागणी वाढलेली आहे, त्याचा वापर पाहिल्यास सध्या घरून काम करणाऱ्यांचे व्हिडिओ कॉल्स, मीटिंग यासाठी होत आहे.
तर दुसरीकडे 'कन्टेन्ट कन्झम्पशन' म्हणजेच ऑनलाईन सिनेमा वा सीरीज पाहणं वाढलेलं आहे. अमेरिकेमध्ये नेटफ्लिक्सने कमी रिझोल्यूशनमध्ये कन्टेन्ट द्यायला सुरुवात केली आहे. पण भारतामध्ये आपण अजूनही हाय रिझोल्यूशन व्हिडिओज पाहू शकतोय.
"सध्या भारतात बहुतांश ग्राहक एअरटेल वा जिओची सेवा वापरत आहेत. सध्या तरी या कंपन्या ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत असल्याचं दिसतंय. पण होतं काय, की एरवीचा माझा महिनाभराचा जेवढा वापर असतो, तेवढा डेटा मी घरीच असल्याने ५-६ दिवसांत संपवते आणि मग अधिकची मागणी नोंदवली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. अशा हेवी कन्टेन्ट युजर्सकडून त्यांना काही महसूल मिळवता येईल. हा तो ग्राहक वर्ग आहे जो टेक सॅव्ही आहे, जो घरून काम करतोय. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण मोठं नाही, पण या गटाकडून मिळणाऱ्या महसूलाच्या मदतीने टेलिकॉम कंपन्यांना पायाभूत सुविधा सुधारता येतील.
शिवाय ही परिस्थिती एक-दोन महिन्यांपेक्षा जास्त दीर्घकाळ राहिली तर आपल्याला या सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय कालावधी वाढल्यास टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्समध्येही वाढ होईल."
टेलिकॉम कंपन्या म्हणतात
इंटरनेट आणि मोबाईल सेवांच्या वापरात अडथळे येत असल्याची तक्रार करायला ग्राहकांनी एकेकडे सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे कंपन्यांनीही यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय.
या 'ट्रॅफिक लोड मॅनेजमेंटसाठी' म्हणजेच वाढीव मागणीचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या तातडीने पावलं उचलत असून मोबाईल आणि घरगुती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विना अडथळा सुरू रहाव्यात यासाठी टेलिकॉम टॉवर्सची सेवा देणाऱ्यांसोबत काम करत असल्याचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)चे डायरेक्टर जनरल राजन मॅथ्यूज यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितलं.
एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्या या COAI मध्ये आहेत.
टेलिकॉम कंपन्यांची परिस्थिती बदलेल का?
प्रत्यक्ष कामकाज वा घराबाहेर पडणं ठप्प झाल्याने टेलिकॉम कंपन्यांकडच्या डेटा सर्व्हिसेसची मागण यापेक्षा जास्त वाढणार असल्याचं घोष सांगतात. त्या म्हणतात, "यापूर्वी जो डेटा पॅक महिन्याभरात संपायचा तोच आता इतर काही करायला नसल्याने लवकर संपेल.
लोकं बातम्या बघतायत, मनोरंजन करून घेत आहेत, एकमेकांच्या संपर्कात या माध्यमातून रहात आहेत. त्यामुळे आताच्या या काही दिवसांमध्ये या मागणीचा आलेख झटकन वाढेल. पण यामुळे टेलिकॉम क्षेत्राची स्थिती बदलेल का, याविषयी आता सांगता येणार नाही.
पण यामुळे एक गोष्ट नक्कीच झालीय, भारतामध्ये घरून काम करण्याची, ऑनलाईन माहिती मिळवण्याची संकल्पना रुजलीय. आणि ही आता दीर्घकाळ टिकेल. टेलिकॉम कंपन्यांना भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल."
OTT प्लॅटफॉर्म्सना विनंती
इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवर ताण येऊ नये म्हणून पुढचा काही काळ मीडियाचं स्ट्रीमिंग 'हाय डेफिनेशन' मध्ये न करू नये अशी विनंती मोबाईल कंपन्यांनी स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांना केली होती.
जगभरातल्या टेलिकॉम कंपन्यांनी हे केलंय.
हाय डेफिनेशन कन्टेन्ट स्ट्रीम करून पाहण्यासाठी जास्ती इंटरनेट म्हणजेच डेटा वापरला जातो. सध्या जगभरात सगळेच घरी असल्याने या प्रकारच्या सेवा जास्त वापरल्या जात आहेत. शिवाय याचं मोठ्या स्क्रीनवर 'मिररिंग' केल्यास अधिक डेटा वापरला जातो.
म्हणूनच टेलिकॉम कंपन्यांनी भारताल्या ११ स्ट्रीमिंग सेवांना ही विनंती केलेली आहे.
यापैकी नेटफ्लिक्स, हॉटस्टार, Zee5, वायकॉम १८ आणि वूट यांच्यासह युट्यूबनेही असं करायला दुजोरा दिलाय.
टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफर्स
घरून काम करणाऱ्यांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे. जिओने त्यांच्या 4G डेटा व्हाऊचर्सद्वारे सध्यापेक्षा दुप्पट डेटा देण्याचं जाहीर केलंय. तर BSNLने देखील ग्राहकांसाठी 'वर्क फ्रॉम होम' प्लान आणले आहेत. BSNLच्या फोनवरून यासाठीची मागणी नोंदवता येईल.
एअरटेलनेही 100mbps चा वेग देणारे प्लॅन्स आणले आहेत.
तर व्होडोफोनने आपल्या जुन्या प्लान्समध्ये बदल करत या डेटा पॅक्समध्ये दुप्पट डेटा द्यायला सुरुवात केलेली आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश
टेलिकॉम क्षेत्राचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करावा अशी मागणी टेलिकॉम कंपन्यांच्या संघटनांनी केलेली आहे. असं झाल्यास आपल्याला निर्बंधांदरम्यानही ग्राहकांना सेवा योग्य रीतीने देता येतील असं कंपन्यांचं म्हणणं आहे.
याशिवाय वाढीव मागणीसाठी अधिकचा स्पेक्ट्रम मिळावा अशीही टेलिकॉम कंपन्यांची मागणी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























