You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: प्रिन्स चार्ल्स यांना कोव्हिड-19ची लागण झाल्याचं स्पष्ट - क्लॅरेन्स हाऊस
राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, "मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे," असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही.
प्रिन्स चार्ल्स हे "गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे.
चाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने चार्ल्स यांची अॅबरडीनशायरमध्ये चाचणी घेतली, असं एका अधिकृत निवदेनात सांगण्यात आलं. NHS अर्थात National Health Service ही युनायटेड किंगडममध्ये आरोग्य सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा -कोरोना व्हायरस कुठल्याही पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो?
- वाचा - तुम्हालाही वाटतंय का आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालाय?, मग हे वाचाच
"सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत," असंही पुढे सांगण्यात आलंय.
"गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही," असंही या निवेदनात सांगण्यात आलंय.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 3 लाख 75 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 16 हजारपेक्षा जास्त आहेत.
भारतात 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत बाधितांची संख्या 500पेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे.
पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ब्रिटन तसंच लॉकडाऊन केलं आहे, जशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भारतात केली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडा, शक्य तिथे डिलिव्हरीचा पर्याय निवडा जेणेकरून लोक एकमेकांपासून दूर राहतील आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे.
हे नक्की वाचा
हे आवर्जून पाहा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)