कोरोना व्हायरसमुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये एका दिवसात 475 जण मृत्यूमुखी पडले आहेत. इटलीमधील मृतांचा एकूण आकडा 3 हजाराच्या आसपास पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्राण गमावले आहेत. 

इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 35, 713 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांपैकी 4 हजार जणांवरील उपचार यशस्वी झाले असून ते बरे झाले आहेत. 

इटलीमधील लोम्बार्डीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला असून इथे एकाच दिवसात 319 जणांचा मृत्यू झाला आहे. 

चीनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. कोरोनानं आतापर्यंत 8,758 जणांचा बळी घेतला असून चीनमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

युरोप आणि वेस्टर्न पॅसिफिक भागामध्येच (ज्यामध्ये आशिया खंडाचा खूप मोठा भाग येतो) कोरोनाचा संसर्ग झालेले 80 टक्के रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं दिली आहे.

अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मोठे कार्यक्रम रद्द करणे यासारखे उपाय तातडीनं अंमलात आणले जात आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही, असा विचार या उपायांमागे आहे.

पण हा साथीचा आजार नियंत्रणात ठेवायचा असेल तर देशांनी अलगीकरण, चाचण्या, उपचार आणि रुग्णांचा ट्रॅक ठेवणं या गोष्टी गरजेच्या आहेत, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसिस यांनी बुधवारी (18 मार्च) स्पष्ट केलं.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेले दोन दिवस इटलीमध्ये लॉक डाऊनची परिस्थिती आहे. लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पण तरीही इटलीमधील मृतांचा आकडा वाढतच आहे.

WHO चे आपत्कालीन संचालक माइक रेयन यांच्यामते मुळातच रुग्णांचा मोठा आकडा आणि लोकसंख्येमधील वृद्धांचं प्रमाण यामुळे मृतांची संख्या वाढली आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाच्या लसीची चाचणी सुरू आहे. मात्र चाचणी यशस्वी होऊन लसीचा वापर सुरू होण्यासाठी काही महिने लागू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

युरोपमधली परिस्थिती कशी आहे?

स्पेनमध्ये कोरोनामुळे 598 जणांचा मृत्यू झाला असून 13,716 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माद्रिदमधल्या एका रुग्णालयात झालेल्या 17 रुग्णांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. या रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेले शेकडो रुग्ण उपचार झाले आहेत.

फ्रान्समध्ये मंगळवारी (17 मार्च) कोरोनाबाधितांचा आकडा 16 टक्क्यांनी वाढला. आता फ्रान्समध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 7,730 झाली आहे, तर कोरोनामुळे 175 जणांनी प्राण गमावले आहेत. मृतांपैकी 7 टक्के लोक हे 65 पेक्षा कमी वयाचे आहेत.

युकेमध्ये कोरोनामुळे 104 जणांनी प्राण गमावले आहेत.

जर्मनीमध्ये कोरोनाचे 8,198 रुग्ण आढळून आले आहेत, तर 12 जण मृत्युमुखी पडले आहेत. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं, की जर्मनीच्या एकीकरणापासून किंबहुना त्याही आधी अगदी दुसऱ्या महायुद्धानंतरच आपल्या देशासमोर इतकं मोठं आव्हान उभं राहिलं नव्हतं, ज्याला सामोरं जाण्यासाठी आपण एकजूट होण्याची गरज आहे.

बेल्जियममध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून 1,486 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)