कोरोना व्हायरस LIVE: नरेंद्र मोदींचं सार्क देशाच्या प्रमुखांना एकत्र येण्याचं आवाहन

फोटो स्रोत, AFP
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सार्क समूहातील देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, "देशातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी भारत सज्ज आहे. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. सोशल मीडियावर जागरुकता मोहीम राबवली आहे."
"भविष्यात कोरोना व्हायरस कसं रुप धारण करेल, ते आताच सांगता येत नाही. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी मिळून यावर काम करायला हवं," असंही ते म्हणाले.
या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे, भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा उपस्थित होते.


दरम्यान, चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अमेरिका, युरोपमध्येही धुमाकूळ घातलाय. त्यामुळे सर्वच देशांनी आपापल्या परीनं उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या रोगाला आळा घालण्यासाठी जगभरात काय पावलं उचलली जात आहेत.
पाहा सर्व ताजे अपडेट्स इथे -

टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेप्रमाणेच होणार - शिंजो आबे
टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेप्रमाणेच होईल, असा विश्वास जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी व्यक्त केलाय.
कोरोना व्हायरस जगभर जगातील अनेक देशात वेगानं पसरत असल्यानं अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्यात, तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवर आगामी ऑलिम्पिक स्पर्धेबाबतही तर्क-वितर्क लढवले जात होते. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोत नियोजित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र या तर्क-वितर्कांना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, "ठरल्याप्रमाणेच ऑलिम्पिक स्पर्धांच आयोजन केलं जाईल. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) घेईल."
कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखला जाईल आणि आपण या संकटातून बाहेर येऊन कुठल्याही अडथळ्याविमान ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करू, असा विश्वासही शिंजो आबे यांनी व्यक्त केला.
जपानमध्येही कोरोना व्हायरसनं धुडगूस घातलाय. जपानमध्ये आतापर्यंत 1,400 रुग्ण आढळले असून, 28 जणांचा मृत्यू झाला.
भारताच्या सीमा बंद
भारतानेही बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या देशांशी संलग्न सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या चार देशांच्या सीमा भारतातील 8 राज्यांना लागून आहेत. त्यात आसाम, बिहार, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुद्धा बंद केलंय. आज मध्यरात्री म्हणजेच 16 मार्चपासून हा सीमाबंदीचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिलीय.
ट्रंप कोव्हिड-19 निगेटिव्ह
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप यांनी फ्लोरिडामधील रिसॉर्टमध्ये ब्राझिलियन शिष्टमंडळासोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या ब्राझिलच्या काही अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
ब्राझीलचे राष्ट्रपती फॅबिओ वजनगर्टेन यांनाही कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यानंतर तातडीनं डोनाल्ड ट्रंप यांची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांना लागण झाली नसल्याचं चाचणीनंतर स्पष्ट झालं.
इराणमधील 236 भारतीय मायदेशी परतले
चीननंतर सर्वांत वेगानं कोरोना व्हायरस इराणमध्ये पसरतोय. याच इराणमध्ये अनेक भारतीय अडकले होते. त्यांना भारत सरकारनं मायदेशी आणलं आहे.
236 भारतीय नागरिकांना भारत सरकारनं परत आणलं असून, त्यांना राजस्थानमधील जैसलमेर इथं वेगळं ठेवण्यात आलंय.

फोटो स्रोत, Twitter
भारतीय लष्कराच्या इंडियन आर्मी वेलनेस सेंटरमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलंय.
जैसलमेर इथल्या वेलनेस सेंटरमध्ये इराणमधून परतलेल्या नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधा करण्यात आल्यात. उपचारासाठी वैद्यकीय सुविधाही तयार ठेवण्यात आल्या आहेत.
इटलीतून 218 जण भारतात परतले
इटलीत कोरोना व्हायरसनं धुडगूस घातलाय. इटलीतल्या अनेक प्रांतांमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलीय.
इटलीतल्या मिलान या शहरात अनेक भारतीय अडकले होते. या भारतीयांना सरकारनं मायदेशी आणलंय.

फोटो स्रोत, Twiiter
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या माहितीनुसार, 218 जणांना इटलीतून परत आणण्यात आलंय. यात 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना 14 दिवस वेगळं ठेवण्यात येईल.
जिथं जिथं भारतीय अडकले आहेत, त्या सर्वांना मायदेशी आणलं जाईल, असंही परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी सांगितलं.
गोव्यातील चर्च बंद
ज्या लोकांचा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांसोबत संबंध आलाय, त्यांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, तसंच चर्चमधील प्रार्थनेसाठीही येऊ नये, असं गोव्याच्या रोमन कॅथलिक चर्चनं सांगितलंय.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























