You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सगळ्या जगातलीच 'बत्ती गुल' झाली तर...
आयुष्य सोपं - सुखकर करण्यासाठी मानवाने जे शोध लावले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा शोध होतो - विजेचा. आधुनिक आयुष्याची ही जणू लाईफलाईन आहे.
विजेशिवाय जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. साधी घरातली वीज जरी गेली तरी घरातलं सारं काम ठप्प होतं.
जणू काही आयुष्यच थांबतं. कल्पना करा, जर साऱ्या देशातली वीज एकाचवेळी गेली तर काय हाहाःकार उडेल. याची झलक पहायला मिळाली लॅटिन अमेरिकेतल्या व्हेनेझुएलामध्ये.
याच वर्षी मार्च महिन्यात व्हेनेझुएलामध्ये अख्ख्या देशातला वीज पुरवठा अचानक बंद पडला. सगळ्या देशात अंधार पसरला. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीला तोंड देण्याची या देशाची तयारी नव्हती.
म्हणूनच वीजपुरवठा थांबल्यावर सगळीकडे हाहाःकार उडाला. सगळ्यात जास्त बिकट परिस्थिती निर्माण झाली हॉस्पिटल्समध्ये. इमर्जन्सीसाठीचे जनरेटर किंवा पॉवर बँक्सही काही काळाच्या वापरानंतर बंद पडल्या.
मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात डॉक्टर्स शस्त्रक्रिया करत होते. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना हाताच्या पंपाच्या आधारे श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
आयसीयूमधली मशीन्स बंद होती. रुग्णांची तब्येत ढासळत होती आणि डॉक्टर्स हवालदिल होते. त्यांच्या डोळ्यांसमोर रुग्णांचा श्वास थांबत होता. तब्बल 5 दिवस व्हेनेझुएलामध्ये ही परिस्थिती होती.
देशभरात वीज नसल्याने या पाच दिवसांत 26 लोकांनी जीव गमावला.
व्हेनेझुएलामधला जीवघेणा ब्लॅकआऊट
या काळामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी बहुतेकजण डायलिसीसवर होते असं या वीज संकटादरम्यान आरोग्यसेवांविषयीचा डेटा गोळा करणाऱ्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे. जर वीज पुरवठा असता आणि उपकरणं चालू राहिली असती तर या रुग्णांचा जीव वाचू शकला असता.
व्हेनेझुएलातल्या या वीज संकटाचा परिणाम इतर गोष्टींवरही झाला. बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचीही अडचण झाली. लिफ्ट्स बंद झाल्याचा फटका वयोवृद्धांना आणि लहान मुलांना बसला. फ्रिज बंद झाल्याने अन्न खराब झालं. मोबाईल आणि कॉम्प्युटर्सची बॅटरी संपल्याने लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला.
लोकांना एकमेकांची खुशाली कळत नव्हती. सिग्नल्स बंद झाल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम्स झाले. रस्त्यांवर गोंधळ उडाला. पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारीवरचे पंप चालू न शकल्याने लोकांना जवळच्या नद्या आणि झऱ्यांवरून पाणी भरावं लागलं.
व्हेनेझुएलाला यावर्षी अनेकदा अशा वीज संकटाला सामोरं जावं लागलं. कधी हे संकट लवकर संपलं तर कधी ब्लॅकआऊट अनेक दिवस कायम राहिला. कधी काही तास ही वीज कपात झाली तर कधी अनेक दिवस चालली. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनेझुएलाच्या जुलिओ कास्त्रो यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या रुग्णालयातली वीज चार तासही जाणं सामान्य नाही. सगळ्यात जास्त पाण्याच्या तुटवडा भासतो.
ज्या दिवशी वीज कपात असेल त्या दिवशी रुग्णांनी घरुन सोबत पाणी आणावं असं सांगण्यात येत होतं.
दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएलामध्ये नैसर्गिक तेलाचे मोठे साठे आहेत. पण तरीही इथल्या लोकांना वीजेसारख्या गरजेच्या गोष्टींसाठी झगडावं लागतंय. पण दहशतवाद्यांमुळे असं होत असल्याचं व्हेनेझुएलाच्या सरकारने म्हटलंय.
पण जुन्या झालेल्या विजेच्या ग्रीड्समुळे देशभरात अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या ग्रीड्सची दीर्घकाळापासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही आणि जुन्या ग्रीड्सच्या जागी नवीन लाईनही टाकण्यात आलेली नाही.
दीर्घकाळासाठी आणि मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा ठप्प होण्याला इंग्रजीत ब्लॅक स्काय इव्हेंट म्हटलं जातं. पण अशी स्थिती टॉवर्सची परिस्थिती खराब असणाऱ्या, वायरिंग जुनं असणाऱ्या देशांतच असते, असं नाही. कॅनडा आणि अमेरिकेसारख्या विकसित देशातही अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते.
इथल्या लोकांनाही मोठ्या कालावधीसाठीच्या वीज कपातीचा सामना करावा लागतो. पण बहुतेकदा समुद्री वादळ वा बर्फाच्या वादळामुळे या देशांमध्ये ही परिस्थिती निर्माण होते.
ट्रॅफिक ठप्प झालेले रस्ते
याच वर्षीच्या जून महिन्यात लॅटिन अमेरिकेतल्या उरुग्वे, अर्जेंटिना आणि पराग्वेत वीज गेल्याने चार कोटी लोकांना अंधारात रहावं लागलं होतं. ऑगस्ट महिन्यात ब्रिटनमधल्या सुमारे दहा लाख लोकांना याच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं. अचानक वीज गेल्याने सगळं काही ठप्प झालं. ट्रेनमधून प्रवास करणारे लोक अडकून पडले. रस्त्यावर ट्रॅफिक जमला.
गॅसवर चालणारे ऊर्जा प्रकल्प आणि पवन ऊर्जा प्रकल्प बंद करावे लागले.
सध्या वीज पुरवठा ठप्प होण्याच्या या घटना फारशी घडत नसल्या तरी तज्ज्ञांच्या मते वाढत्या लोकसंख्येसोबत जसजशी विजेसाठीची मागणी वाढेल तसतसं या ब्लॅकआऊट्सचं प्रमाण वाढेल. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेसारखे पर्याय वापरले जात असूनही हे घडेल.
क्लायमेट चेंज म्हणजेच पर्यावरणात होणाऱ्या बदलांकडे पाहता हे पर्याय फारसे विश्वासार्ह नाहीत. सध्या सगळं जग जोडलं गेलंय. जगभरातल्या लोकांचा एकमेकांशी संवाद सुरू असतो. व्यापारी चर्चा सुरू असतात. हे सगळं होतं कॉम्प्युटरच्या मदतीने जो चालतो विजेवर. त्यामुळेच वीज पुरवठा ठप्प झाल्यानंतर याचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
या ब्लॅक स्काय इव्हेंटची अनेक कारणं असल्याचं आतंरराष्ट्रीय संस्था द इलेक्ट्रिक सिक्युरिटी कौन्सिलचं म्हणणं आहे. नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही गोष्टींमुळे ही गोष्ट घडते. सायबर टेररिस्ट अॅटॅक किंवा एका सुनियोजित रणनीतीद्वारे एखाद्या पॉवर स्टेशन वा ग्रिडचं नुकसान केलं जाऊ शकतं.
याशिवाय वादळ, भूकंप किंवा पावसासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळेही वीज पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असते.
मानवी वा नैसर्गिक कारणांमुळे पॉवर ग्रिडचं नुकसान होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान वापण्याची आणि या पॉवर ग्रिड्सवर भरपूर खर्च करण्याची गरज असल्याचं मत संशोधक मेलिसा लॉट यांचं आहे.
भारतातला ब्लॅकआऊट
2012 साली भारतातही ब्लॅकआऊट झाला होता. तब्बल 60 कोटी लोकांना 2दिवस अंधारात काढावे लागले होते.
पोर्टो रिकोमध्येही एका समुद्री वादळामुळे ही परिस्थिती आली होती. देशातला वीज पुरवठा पूर्णपणे बंद पडला आणि देश अंधारात बुडाला. 2018मध्ये जपानमध्ये भूकंपामुळे होक्काइडो बेटांवरच्या 50 लाख लोकांना विजेशिवाय रहावं लागलं होतं.
पण या सगळ्या देशांमधली वीज नैसर्गिक कारणांमुळे गेली होती. असं घडू नये म्हणून या यंत्रणेवर पैसे खर्च करणं गरजेचं आहे.
पण अनेकदा अशा काही कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो, ज्यांचा अंदाज आधीपासून लावता येत नाही. उदाहरणार्थ सप्टेंबर 2003मध्ये स्वित्झर्लंडमधल्या एका वीज केंद्रावर झाड कोसळलं आणि परिसरातला पुरवठा ठप्प झाला. याच्या बरोबर 24 मिनिटांनी इटलीत एक झाड कोसळलं आणि 2 ग्रिड्स ठप्प झाली. यामुळे त्यांचा युरोपाशी असलेला संपर्क कोलमडला. परिणामी संपूर्ण इटलीत अंधार झाला.
आधुनिक पॉवर ग्रिड्स अतिशय क्लिष्ट आणि एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याचा आधी अंदाज लावणं कठीण आहे. सगळ्यात जास्त ग्रिड्स युरोपीयन देशांत आहेत. हे ग्रीड 24 देशांतल्या 40 कोटी लोकांना वीज पुरवठा करतात. तर अमेरिकेत पाच विविध पॉवर ग्रिड संपूर्ण देशाला वीज पुरवठा करतात.
बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता मोठ्या वीज केंद्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. एखादी गडबड लक्षात आल्यास स्वतःच त्याची दुरुस्ती करेल असं तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे.
अमेरिकेचं ऊर्जा खातं यासाठी 70 लाख डॉलर्सची आर्थिक मदत करत आहे. सोबतच पुरवठा बंद पडल्यास ग्रिडचा जनरेटर चालू रहावा यासाठी ग्रिडमध्ये शक्तीशाली बॅटरी लावण्यात येत आहेत.
पण काहीही केलं तरी ग्रीड पूर्णपणे ठप्प होण्याचं रोखणं कठीण असल्याचं संशोधक ज्युलिया मिया म्हणतात. पण अडचण आल्यास ती लवकरात लवकर सोडवता यावी यासाठीची प्रणाली उभी करणं शक्य आहे. अनेक मोठ्या संस्था यासाठी काम करत आहेत.
आपणही आपल्यापरीने यासाठीची तयारी करायला हवी. घरात इमर्जन्सी लाईट आणि टॉर्चची तरतूद करावी. जास्तीच्या बॅटरीज सोबत असाव्यात . घरात पाणी साठवून ठेवावं. म्हणजे वीज गेली तरी घरात पाणी असेल. शिवाय फ्रीज शिवायही दीर्घकाळ टिकेल असं अन्न घरात असावं. याशिवाय घरात काही रोख रक्कम ठेवावी. फक्त क्रेडिट वा डेबिट कार्डवर अवलंबून राहू नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहनांमध्ये इंधन भरून ठेवावं, म्हणजे गरज पडल्यास या गोष्टी वापरता येतील.
कारण कोणत्याही क्षणी "बत्ती गुल' होऊ शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)