प्रिन्स अँड्र्यू यांनी केला शाही कर्तव्यांचा त्याग

फोटो स्रोत, NEWS SYNDICATION
ब्रिटनच्या राजघराण्यातील ड्युक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांनी शाही कर्तव्यांचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं आहे. जेफ्री एपस्टाईन प्रकरण राजघराण्याठी एक 'मोठा अडथळा' झाल्याचं सांगत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेऊन 59 वर्षिय युवराज अँड्र्यू यांनी आपल्याला कर्तव्याचा त्याग करण्याची विनंती महाराणीकडे केली आहे.
लैंगिक शोषण प्रकरणातील दोषी जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील सर्व पीडित व्यक्तींसह ज्या लोकांना हे प्रकरण न्याय मिळून तडीस लागावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या सर्वांप्रती आपल्या मनात सहानुभूती आहे असं ते म्हणाले.
अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टाईन यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत उल्लेख झाल्यानंतर ड्युक यांच्यावर टीका होत आहे.
काय आहे प्रकरण?
एपस्टाईन बरोबर असलेल्या संबंधांवरून अँड्र्यू यांच्यावर गेले अनेक महिने टीका होत होती. सेक्स-ट्रॅफिकिंगचा आरोप असलेल्या प्रकरणादरम्यानच ऑगस्ट महिन्यात एपस्टाईन यांनी आत्महत्या केली होती.
एपस्टाईन यांच्यावर आरोप करणाऱ्या वर्जिनिया गिफ्रे या महिलेने अँड्रूय यांनीही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तीनवेळा आपल्यावर जबरदस्ती केली असा आरोप केला आहे.
प्रिन्स अँड्र्यू यांनी हे आरोप नाकारले आहेत.
शाही कर्तव्यांपासून दूर राहाण्याच्या त्यांचा निर्णय व्यक्तीगत असल्याचं बकिंगहॅम पॅलेसने स्पष्ट केलं आहे.
जेफ्री एपस्टाईन यांच्याशी असलेल्या संबंधाबद्दल मी खेद व्यक्त करतो, असंही एक विधान त्यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, VIRGINIA ROBERTS
ते म्हणाले, "जेफ्रीच्या आत्महत्येबरोबर अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. त्यांची उत्तरं आता मिळू शकत नाहीत, विशेषतः जी पीडित व्यक्ती आहे तिच्यासाठी. या प्रकरणाचा परिणाम झालेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत माझ्या मनात सहानुभूती आहे. तसंच या प्रकरणाची न्यायपूर्ण तड लागावी असं वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला सहानुभूती वाटते."
हे लोक येत्या काळात आपलं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील अशी मी आशा करतो, असं ते म्हणाले.
बीबीसी प्रतिनिधी डॅनिएला रिल्फ म्हणाल्या, "त्यांनी आता केलेलं विधान आणि पूर्वी मुलाखतीत केलेलं विधान हे पूर्णतः वेगळं आहे. ज्या मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका झाली त्या प्रत्येक मुद्द्याचा समावेश आता त्यांनी या नव्या विधानात केला आहे. पीडित व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा मुद्दाही त्यातच समाविष्ट आहे."
बीबीसी प्रतिनिधी गगन सभरवाल यांचं विश्लेषण
"गेल्या शनिवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रिन्स अँड्रयू यांनी जेफ्री एपस्टाईनशी असेल्या मैत्रीबद्दल सविस्तर चर्चा केली होती, जेफ्री एपस्टाईन यांना लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाली होती. 2002-05 या काळात जेफ्री यांनी आपण अल्पवयीन असताना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप काही मुलींनी केला होता. त्यांची जामिन याचिका रद्द झाली होती. त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आत्महत्या केली होती."
"प्रिन्स अँड्र्यू आणि एपस्टाईन यांचे चांगले संबंध असल्यामुळे या घटनेनंतर प्रिन्स अँड्रूय यांच्यावरही दबाव आला. इतकंच नाही एका मुलीने एपस्टाईन यांनी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केलीच तसंच अँड्र्यू यांनीही तीनवेळा लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. साहजिकच यामुळे राजघराण्यावर दबाव आला."
बीबीसीला दिलेली मुलाखत
"बीबीसीने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अँड्र्यू यांनी मुलाखत दिली. त्यांना या मुलाखतीद्वारे कदाचित आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल मात्र त्यांनी काही सांगितलेल्या काही गोष्टींमुळे सर्व प्रकरण उलटलं आणि त्यांच्यावर टीका सुरू झाली. एपस्टाईन यांच्याबरोबरच्या संबंधाबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त केला नव्हता आणि माफीही मागितली नव्हती. तसंच पीडित व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त केली नव्हती. टीका सुरू झाल्यानंतर सोमवारी काही संस्थांनी प्रिन्स अँड्र्यू यांच्याशी असलेले संबंध तोडले."
"आता त्यांनी सार्वजनिक जीवन आणि जबाबदाऱ्यांपासून आपण दूर राहात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज घराण्यातील व्यक्तीवर आरोप झाल्यावर सार्वजनिक जीवन आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहाणं आजवर घडलेलं नसल्यामुळे हे चकीत करणारं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























