You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भक्ष्याच्या शोधात असलेल्या कुत्र्यांनी केली गरोदर महिलेची हत्या
एक 29-वर्षीय महिला आपल्या कुत्र्यांना फिरवायला जंगलात घेऊन गेली होती. त्यावेळी शिकारी कुत्र्यांना घेऊन तिथे काही लोक शिकारीसाठी आले होते. भक्ष्याच्या शोधात असलेल्या त्या शिकारी कुत्र्यांनी त्या महिलेचीच शिकार केली.
उत्तर फ्रान्समधील व्हिलर्स-कोटेरेटस् या खेड्याजवळ एका जंगलात या महिलेचा मृतदेह सापडला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
तिचा मृत्यू अनेक कुत्रे तिला चावल्याने झाला, असं तिथले सरकारी वकील फ्रेडरिक ट्रीन्ह यांनी सांगितलं. तिच्यावर नेमक्या कोणत्या कुत्र्यांनी हल्ला केला हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी 93 कुत्र्यांची तपासणी केली. यात त्या महिलेच्या पाच कुत्र्यांचाही समावेश होता.
या महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लक्षात आलं की या महिलेच्या डोक्यावर, छातीवर आणि हातांवर कुत्र्यांनी चावे घेतले होते. मात्र हा सदोष मनुष्यवध आहे का, याची तपासणी करायला सुरुवात पोलिसांनी केली आहे.
सरकारी वकिलांच्या ऑफिसनुसार, या महिलेने तिच्या नवऱ्याला फोन करून, शिकारी कुत्र्यांचा एक कळप तिच्यावर हल्ला करेल, अशी भीती व्यक्त केली होती. यानंतर लगेचच तिचा नवरा तिला शोधत गेला आणि त्याला तिचा मृतदेह आढळला.
त्यांच्या पाळीव कुत्र्यांचं विव्हळणं ऐकून त्याला आपल्या बायकोचा मृतदेह सापडला, असं त्याचं म्हणणं आहे. स्थानिक वृत्तपत्र 'ले कुरिअर' यांनी म्हटलंय की शिकारी कुत्र्यांचा हा कळप एका हरणाच्या मागावर होता.
तिथल्या अॅनिमल वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष ब्रिजेट बॅरडॉट यांनी सांगितलं या हंगामातल्या सगळ्या शिकारी मोहिमा थांबवण्याची मागणी केली आहे.
फ्रेंच हंटिग असोशिएशनने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलंय की या महिलेची हत्या शिकारी कुत्र्यांनी केली, याचा काहीही पुरावा मिळाला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)