इराक: बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविरुद्ध आंदोलनात 100 जणांचा मृत्यू, संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

इराकमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनात जवळपास 100 आंदोलक मारले गेले आहेत. बेरोजगारी, सार्वजनिक सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा आणि भ्रष्टाचाराविरोधात देशभरात तरुण रस्त्यांवर उतरले आहेत.

देशातील नागरिकांचे नाहक जात असलेले बळी थांबवा, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाने इराकला खडसावलं आहे.

UN असिस्टंट मिशन फॉर इराकचे जिएनाईन हेनिस-प्लासचार्ट म्हणाल्या, "सलग पाचव्या दिवशीही लोक मरत आहेत, जखमी होत आहेत. हे थांबायला हवं."

त्या म्हणाल्या, "शनिवारी बगदादमध्ये सुरक्षा बलाने एक मोठं आंदोलन चिरडून टाकलं. यामध्ये सुरक्षा बलासोबत झालेल्या झटापटीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा बलाने पुन्हा एकदा नागरिकांवर गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर केल्याची माहिती हाती आली आहे."

आतापर्यंत सुमारे 99 जणांचा मृत्यू झाला तसंच 4 हजारपर्यंत लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती इराकच्या संसदेने दिली आहे.

इराकमध्ये इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेचा 2017ला पाडाव झाल्यानंतर देशातील सध्याची परिस्थिती सगळ्यांत गंभीर आहे.

सद्यस्थिती काय?

शनिवारी बगदादमध्ये लागू असलेली संचारबंदी उठवण्यात आली. याचा फायदा घेत काही छोट्या मोठ्या संघटनांचे आंदोलनकर्ते पुन्हा रस्त्यावर आले.

शहरातील तहरिर चौक आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर होता. पण शनिवारी तो बंद असल्याचं स्थानिक माध्यमांनी दाखवलं. शनिवारी दुपारनंतर इराकच्या संसदेत तातडीचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही.

काही वृत्तावाहिन्यांच्या कार्यालयांवरही हल्ला करण्यात आला. त्यामध्ये सौदीतील अल-अरेबिया चॅनेलचा समावेश आहे. तसंच नसिरियामध्ये आंदोलनकर्त्यांनी सहा विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांना आग लावली. AFP वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी दिवाणिया परिसरातील राज्यपाल कार्यालय रिकामी केलं.

सध्याच्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आंदोलनकर्त्यांमधला असंतोष वाढतच चालला आहे, असं बीबीसी प्रतिनिधी सबॅस्टियन उशेर यांनी सांगितलं.

देशात वाढती बेरोजगारी, वाईट सार्वजनिक सोयी आणि वाढता भ्रष्टाचारामुळे संतप्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश आहे. पंतप्रधान खोटी आश्वासनं देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मरणाऱ्यांचा आकडा शुक्रवारी दुप्पट झाला. कमीत कमी 10 लोक शुक्रवारीच मारले गेल्याचं वैद्यकीय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोन इराकी नागरिक आणि दोन इराकी पोलिसांना "अज्ञात हल्लेखोरांनी" स्नाईपरने ठार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पंतप्रधानांचं शांतता राखण्याचं आवाहन

इराकचे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी आपल्या सरकारची भूमिका आधीच स्पष्ट केली होती. "गरीब कुटुंबांची मदत करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही समस्येवर तोडगा काढणं जादूच्या छडीने होऊ शकत नाही," असं ते म्हणाले होते.

आपल्या सरकारी धोरणावर ठाम राहताना त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही दिवसेंदिवस इराकमधली निदर्शनं हिंसक होत चालली आहेत. बगदादसह अन्य शहरांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच इंटरनेटच्या वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत.

शुक्रवारी बगदादच्या तहरीर चौकात पोहोचण्याचा प्रयत्न करत असलेल्या निदर्शकांवर सुरक्षा बलाने गोळीबारही केला.

यादरम्यान इराकचे एक ज्येष्ठ शिया नेता अयातोल्लाह अली अल सिस्तानी यांनी याचा निषेध नोंदवून घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

सरकार जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. बदल ही महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचं सरकारने समजून घ्यावं. जनतेला बदल पाहिजे असल्यास सरकारला ते ऐकावं लागेल, असं सिस्तानी यांचे प्रवक्ते अहमद अल सेफी यांनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनेसुद्धा इराकमध्ये बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर सरकारने नियंत्रण ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तसंच सुरक्षा बलाने आंदोलनकर्त्यांना शांततापूर्ण वागणूक द्यावी, असं आवाहन अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेनं केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)