शंकर आबाजी भिसे : आपल्या बुद्धिमत्तेने ब्रिटिशांवर गारूड घालणारा मराठी माणूस

शंकर आबाजी भिसे, वैज्ञानिक, भारत, ब्रिटिश
फोटो कॅप्शन, शंकर आबाजी भिसे
    • Author, दिन्यार पटेल
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

त्यांना 'भारताचे एडिसन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या शोधामुळे जगभरातल्या प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रांती घडेल, यावर आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांचा विश्वास होता.

भारतातल्या महत्त्वाच्या नेत्यांना आणि व्यक्तींना त्यांचं कौतुक होतं आणि पाठिंबाही होता. 19 व्या शतकामधले ते एक अग्रणीचे भारतीय संशोधक होते.

पण असं असूनही शंकर आबाजी भिसेंचा सगळ्यांना विसर पडला.

असं का झालं?

भारत हे आता जरी संशोधनाचं आणि वैज्ञानिक घडामोडींचं केंद्र असला तरी त्या काळामध्ये वैज्ञानिक, संशोधक आणि इंजिनियर्सना प्रोत्साहन देणाऱ्या फारशा संस्था अस्तित्वात नव्हता.

त्या काळात भिसे कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःच्या प्रयत्नांनी नावारूपाला आले. त्या काळातल्या बॉम्बे म्हणजे आताच्या मुंबईत शंकर भिसेंचं बालपण गेलं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉल्सवरची 'सायंटिफिक अमेरिकन' मासिकं चाळण्यात त्यांचा दिवस जाई.

"त्या अमेरिकन मासिकामधून मिळालेल्या यंत्रांसंबंधीच्या ज्ञानामुळेच आज मी इथे आहे," असं अनेक दशकांनंतर ब्रुकलिनमधल्या एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.

भिसोटाईप प्रिटिंग प्रणालीत क्रांती आणेल, असा दावा करण्यात आला होता
फोटो कॅप्शन, भिसोटाईप प्रिटिंग प्रणालीत क्रांती आणेल, असा दावा करण्यात आला होता

त्यांनी मुंबईमध्ये एका वैज्ञानिक क्लबची सुरुवात केली आणि विशीत असतानाच त्यांनी विविध उपकरणं आणि यंत्रांची डिझाईन्स रेखाटायला सुरुवात केली होती. सीलसोबत छेडछाड न करता येणाऱ्या (Tamper Proof) बाटल्या, इलेक्ट्रिकल सायकलसारखं वाहन आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्टेशन्सवरील इंडिकेटर चं डिझाईन त्यांनी केलं होतं.

पण त्यांना खरी संधी मिळाली 1890च्या दशकात. संशोधकांसाठीच्या एका ब्रिटीश जर्नलतर्फे वाणसामानाचं वजन मोजण्यासाठीच्या यंत्राची रचना करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

लंडनला स्थलांतर

उत्सहाच्या भरात एक दिवस पहाटे तीन ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अशाच एका यंत्राचं डिझाईन रेखाटलं आणि सर्व ब्रिटीश प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिंकलेही.

तो पर्यंत या हुशार भारतीय संशोधकाची दखल बॉम्बेच्या प्रशासकांनीही घेतली होती. भिसेंना लंडनमध्ये स्थायिक होत गुंतवणूकदार मिळवायचे होते. प्रशासकांनी त्यांना पाठिंबा दिला.

"यश मिळत नाही किंवा जोपर्यंत शेवटचा पाऊंड खर्च होत नाही, तोपर्यंत घरी परत येणार नाही, " असा निर्धार त्यांनी बॉम्बेमधल्या मित्रांकडे बोलून दाखवला होता.

इथूनच सुरू झाला त्यांच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा.

इंडियन नॅशनल काँग्रेसचे बॉम्बेमधले सचिव दिनशॉ वाच्छा यांनी दिलेलं पत्रं घेऊन भिसे लंडनमध्ये दाखल झाले. वाच्छा हे भारतातल्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे नेते तर होतेच पण सोबतच एक धूर्त व्यापारीही होते. त्यांची नजर तांत्रिक कौशल्य हेरणारी होती.

असेच एक दिवस भिसे वाच्छांनी पाठवलेलं पत्र दादाभाई नवरोजींना देण्यासाठी पोहोचले. दादाभाई राष्ट्रवादी नेते तर होतेच पण त्यासोबतच लंडनमध्ये त्यांनी दीर्घ व्यावसायिक कारकीर्दही घडवली होती.

भिसे यांच्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अनेकदा लिहून आलं होतं.
फोटो कॅप्शन, भिसे यांच्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अनेकदा लिहून आलं होतं.

भिसेंच्या नावावर असलेलं आंतरराष्ट्रीय पेटंट्स पाहून प्रभावित झालेल्या नवरोजींनी भिसेंसोबत व्यापारी संबंध प्रस्थापित कऱण्याची तयारी दाखवली. करार केल्यानंतर त्यांनी भिसेंना भारतासाठीचा राष्ट्रवादी अजेंडा जाणून घेण्यासाठीच्या वाचनाची यादी दिली.

उत्तर लंडनमधल्या एका कुबट, थंड कार्यशाळेतून भिसेंनी काम करायला सुरुवात केली.

संशोधनांची मालिका

भिसेंनी एका अनोख्या इलेक्ट्रॉनिक साईनबोर्डचा शोध लावला. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये हा बोर्ड पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. नंतर मध्य लंडन, वेल्स आणि कदाचित पॅरिसमधल्या अनेक दुकानांनी असे बोर्ड लावले.

किचनमधली उपकरणं, टेलिफोन, डोकेदुखी नाहीशी करणारं उपकरण आणि आपोआप फ्लश होणारं टॉयलेट अशा आपण लावलेल्या अनेक शोधांची यादीच त्यांनी नवरोजींना सांगितली.

1905 मध्ये तर त्यांनी एका पुश-अप ब्राच्या प्रोटोटाईपचं पेटंट घेतलं होतं. 'स्तनांचा आकार वाढवणारं उपकरणं' ज्यामुळे ' स्तन सुंदर आणि भरदार दिसतात' असं या प्रोटोटाईपचं वर्णन करण्यात आलं होतं.

(बुजऱ्या स्वभावाच्या भिसेंनी कदाचित आपल्या या शोधाबद्दल नवरोजींना सांगितलं नसावं.)

स्पिरिट टाईपराईटरसाठी भिसेंच्या पेटंटचा अर्ज
फोटो कॅप्शन, स्पिरिट टाईपराईटरसाठी भिसेंच्या पेटंटचा अर्ज

पण भिसेंनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध होता प्रिटींगच्या क्षेत्रातला. त्यांनी याला नाव दिलं - भिसोटाईप (Bhisotype). या टाईपकास्टरमुळे प्रिटींग क्षेत्रात क्रांती घडणार होती.

पुस्तकं आणि वर्तमानपत्रं छापण्यासाठी वापरण्यात येणारे टाईप या यंत्राच्या मदतीने वेगाने आणि स्वस्तात तयार करता येत होते. आणि इंडस्ट्रीमध्ये त्यावेली असणाऱ्या आघाडीच्या अशा उपकरणांपेक्षा या भिसोटाईपचा वेग आणि क्षमता जास्त होती.

यानंतर आता अधिक श्रीमंत गुंतवणूकदारांचा भिसेंनी शोध घ्यावा असं नवरोजींनी सुचवलं. आणि त्यांना त्यांचा मित्र हेन्री हिंडमन यांच्याकडे पाठवलं. त्यांना 'फादर ऑफ ब्रिटीश सोशलिझम' म्हटलं जाई.

हिंडमन हे कार्ल मार्क्सचे शिष्य होते आणि आणि ब्रिटीशांनी भारतावर राज्य करण्याला विरोध करणाऱ्यांपैकी होते. लंडनच्या 'नफेखोर उच्चभ्रूंवर' ते टीका करत. पण गंमतीची गोष्ट अशी की भांडवलाशाहीच्या विरोधात असणारे हिंडमन स्वतः एक आघाडीचे उद्योगपती होते आणि त्यांची प्रिंटींग क्षेत्रात चांगली ओळख होती.

भिसोटाईपसाठी तब्बल 15,000 पाऊंड उभे करण्याचं त्यांनी वचन दिलं.

इथेच सगळ्या गोष्टी बिनसायला लागल्या.

लिनोटाईप या प्रिंटींग क्षेत्रातल्या मोठ्या कंपनीची भिसोटाईप विकत घेण्याची ऑफर भिसेंनी नाकारली. हिंडमन यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत त्यांनी या मशीनमध्ये सुधारणा करण्यात भरपूर वेळ घालवला.

पण हा निधी उभा करणं शक्य नसल्याचं 1907पर्यंत हिंडमन यांच्या लक्षात आलं. पुढच्या वर्षीपर्यंत नवरोजींकडील निधीही संपला. अपेक्षाभंग झालेल्या भिसेंनी डिसेंबर 1908मध्ये काम थांबवलं आणि बोटीने बॉम्बेला परत आले. तोपर्यंत त्यांनी शब्दशः 'शेवटचा पाऊंड' खर्च केलेला होता.

पण इथेच त्यांना दुसरी संधी मिळाली.

बॉम्बेला जाणाऱ्या त्यांच्या बोटीमध्ये काँग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखलेही होते. भिसेंनी आपल्या टाईपकास्टर बाबत गोखलेंना सांगितल्यावर ते प्रभावित झाले.

मुंबईत आल्यावर गोखलेंने टाटा समूहाच्या रतन टाटांशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत नवीन आणि मोठा व्यावसायिक करार करून दिला.

टाटांसोबतचा हा करार 1917मध्ये संपुष्टात आला पण यामुळे भिसेंना अमेरिकेमध्ये नवी कारकीर्द सुरू करायला मदत झाली.

न्यूयॉर्कमध्ये भिसोटाईपचं मार्केटिंग करण्यात त्यांना यश आलं नाही. पण त्यांनी शोधलेल्या आयोडिन सोल्यूशनमुळे (द्राव) भिसे श्रीमंत झाले.

खरंतर आरोग्याच्या दृष्टीने हा द्राव इतका प्रभावी नव्हता. पण एडगर केयस या अमेरिकन रहस्यवादी व्यक्तीने याचं खुलेपणाने समर्थन केलं. केयसचे समर्थक आजही हे सोल्यूशन वापरतात आणि त्याचा प्रचारही करतात.

अखेरच्या वर्षांमध्ये भिसेंचा गूढतत्वाकडे (Occult) ओढा वाढला. 'स्पिरीट टाईपरायटर' (आत्मांचं कथन टाईप करणारा टाईपरायटर) हा त्यांनी लावलेल्या अखेरच्या शोधांपैकी एक होता. ही Ouijia board. ची सुधारित आवृत्ती होती.

भिसोटाईपला आलेलं अपयश आणि त्यानंर या टाईपरायटरचं अपयश यामुळे या भारतीय एडिसन कारकीर्द गूढपणेच संपुष्टात आली. कदाचित म्हणूनच भिसेही आता विस्मरणात गेले आहेत.

Machines
फोटो कॅप्शन, Bhisey was described as a "pioneering Indian inventor"

पण तरीही त्यांच्या कारकीर्दीतली एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. भिसेंच्या सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेला ब्रिटीशविरोधी कानमंत्र भिसेंनी मरेपर्यंत लक्षात ठेवला.

लंडनमध्ये ते नवरोजी आणि हिंडमन यांच्यासोबतत निदर्शनांमध्ये आणि बैठकींमध्ये सहभागी झाले.

न्यूयॉर्कमध्ये त्यांनी गांधीजींच्या विचारांचा प्रचार केला आणि भारतीयांना स्वतःकडे ते ठेवून घेत.

भारतातून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जाताना भिसेंनी प्रगत राजकारण आणि विज्ञानाचा मेळ घातला. अशा माणसाचं महत्त्व सांगण्यासाठी खरंतर कोणत्याही 'स्पिरीट टाईपरायटरची'ही गरज नाही.

(दिन्यार पटेल हे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)