युरोपातल्या कडव्या उजव्यांचा नवा 'पोस्टर बॉय' : मार्टिन सेलनर

मार्टिन सेलनर

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

टी शर्ट, जीन्स आणि स्टायलिश केस असलेला मार्टिन सेलनर युरोपातल्या कडव्या उजव्या विचारसरणीचा नवा पोस्टर बॉय आहे. त्याने ऑस्ट्रियामध्ये स्थापन केलेली संघटना जनरेशन आयडेंटिटी (GI) अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. आपली संघटना वर्णद्वेषी किंवा हिंसक नसल्याचं मार्टिनचं म्हणणं आहे. मात्र त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

युरोपात पश्चिम आशियातून येणाऱ्या स्थलांतरित आणि निर्वासितांचा प्रश्न गंभीर बनलाय आणि त्यातूनच युरोपात कडवा राष्ट्रवादही उदयाला येत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, मानवतावादी दृष्टीकोन यातून या स्थलांतरितांना सामावून घेण्याचा दबाव युरोपीय राष्ट्रांवर आहे.

मात्र पश्चिम आशियातून येणाऱ्या आणि प्रामुख्यानं मुस्लीम असणाऱ्या या निर्वासितांमुळे भविष्यात युरोपात गंभीर आर्थिक, सामाजिक आणि वर्णवर्चस्वाचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्यातूनच टोकाची उजव्या विचाराची जनरेशन आयडेंटिटी (GI) ही संघटना ऑस्ट्रियामध्ये उदयास आली आहे.

या GI संघटनेचा संस्थापक आहे मार्टिन सेलनर. फॅशनेबल जीन्स, फॅशनेबल हेअरकट आणि गॉगल लावलेल्या 29 वर्षांच्या मार्टिनकडे बघितलं तर इतर कुठल्याही स्टाईल कॉन्शिअस तरुणाप्रमाणे तो ही एक वाटेल.

त्याच्याशी बोलल्यावर मात्र त्याच्यातला टोकाचा राष्ट्रवाद स्पष्ट दिसतो. बहुसंस्कृतीवादाचा धोका, मुस्लीम कसे युरोपवर कब्जा करण्याचा डाव आखत आहेत, यावर तो तासनतास बोलतो.

मार्टिनच्या यूट्यूब व्हिडियोमध्ये अनेकदा त्याच्यासोब त्याची गर्लफ्रेंड ब्रिटनी पेटीबोन हीसुद्धा दिसते. तीसुद्धा कडव्या उजव्या विचारसरणीची आहे. ती अल्ट-राईट म्हणजेच गोऱ्यांचं वर्चस्व मानणारी वर्णद्वेषी ब्लॉगर आहे.

यावर्षीच्या सुरुवातीलाच सेलनर आणि पेटीबोन दोघांच्या ब्रिटन प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. 'एखादी व्यक्ती द्वेष पसरवण्याच्या उद्देशानं येत असेल, तर तिला ब्रिटनमध्ये येण्यापासून रोखण्याचा आम्हाला अधिकार आहे.', असं तिथल्या गृहखात्याचं म्हणणं आहे.

गोऱ्यांच्या चळवळीचा नवा चेहरा

मार्टिन सेलनर केवळ GIचा संस्थापक नाही. तर मुस्लीम स्थलांतरितांविरोधात युरोपभर पसरलेल्या Identitarian Movement म्हणजेच स्वतःची ओळख टिकवण्यासाठी गोऱ्यांनी सुरू केलेल्या चळवळीचाच तो नवा चेहरा बनला आहे.

मुस्लीम स्थलांतरित म्हणजे गोऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका आहे आणि त्यांना युरोपात आश्रय दिला तर उद्या युरोपातले गोरे आपल्याच देशात अल्पसंख्य होतील, असा या आंदोलकांचा दावा आहे.

2012मध्ये फ्रान्समध्ये सुरू झालेली ही चळवळ जर्मनी, इटली आणि ब्रिटनसह युरोपातील नऊ देशात पसरली आहे. या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी नसली तरी विरोध प्रदर्शनाच्या महागड्या स्टंट्समुळे ही चळवळ सतत चर्चेत असते.

2017च्या सुरुवातीला GI ने अशाच एका विरोध प्रदर्शनासाठी जनतेच्या देणगीतून तब्बल दीड लाख युरो उभारले होते. या पैशातून त्यांनी एक बोट घेतली. भूमध्य समुद्रातून येणाऱ्या स्थलांतरितांची बोट आम्ही पाण्यात बुडवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यांचा हा कट यशस्वी झाला नाही. त्याआधीच त्यांच्या बोटीसह बोटीवरच्या कॅप्टनला अटक करण्यात आली.

मार्टिन सेलनर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेलनर 2017 मध्ये एका आंदोलनाचं नेतृत्व करताना.

काही महिन्यांनंतर फ्रान्समधल्या आल्प्सच्या पर्वतरांगामध्ये उतरण्यासाठी एक हेलिकॉप्टर घेतलं. तिथं जवळपास शंभर आंदोलकांनी 'स्थलांतरितांनो परत जा' ही घोषणा असलेलं भलं मोठं पोस्टर फडकवलं. या विरोध प्रदर्शनासाठी जवळपास पन्नास हजार युरो एवढा खर्च आला होता.

एप्रिल 2016मध्ये विएन्ना विद्यापीठात सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानातून आलेल्या निर्वासितांचं 'द सप्लिमेंट' हे नाटकही GIच्या आंदोलकांनी उधळून लावलं होतं.

'ढोंगी' असं लिहिलेले फलक प्रेक्षकांना दाखवण्यात आले. त्यांच्या अंगावर लाल रंगाचं पाणी फेकण्यात आलं. या सर्वांमुळे प्रेक्षकांसोबतच नाटकात सहभागी झालेले स्थलांतरितही घाबरून गेले होते. मात्र "कुणालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं नाही", असं म्हणत मार्टिननं आपलं आंदोलन अहिंसक असल्याचा दावा केला.

यानंतर मात्र ऑस्ट्रियामध्ये संघटनेच्या कारवायांना मोठा धक्का बसला. विएन्ना विद्यापीठातल्या घटना तसंच संघटनेची जहाल भाषा ही मुस्लीम, परदेशी नागरिक आणि निर्वासितांविरोधात द्वेष निर्माण करणारी असल्याचं ऑस्ट्रिया प्रशासनाचं मत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रिया प्रशासनानं कठोर भूमिका घेत GIला गुन्हेगारांची टोळी (असामाजिक तत्व) (criminal group) घोषित केलं आहे.

देशासाठी मोठा धोका

GI म्हणजे नवनाझीवादाने पछाडलेल्या तरुणांचा घोळका, अशी मांडणी टीकाकार करतात. मात्र GIच्या कारवाया आणि त्यांची भाषा देशासाठी मोठा धोका आहे, असं लेखिका आणि संशोधक असलेल्या नताशा स्ट्रोब यांना वाटतं.

त्या म्हणताता, "मुस्लीम म्हणजे युरोपवर आक्रमण करण्यासाठी आलेलं इस्लामी सैन्य असल्याचं चित्र ते रंगवतात. त्यांच्या अशा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे स्थानिकांमध्ये द्वेष निर्माण होतो. भर रस्त्यात मुस्लीम स्त्रियांचा छळ केला जातो."

त्यांनी या Identitarian Movement विषयी पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यानंतर त्यांना बलात्कार आणि खूनाच्या धमक्या मिळायला लागल्या.

आम्ही विएन्नाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या GIच्या ऑफिसमध्ये मार्टिनला भेटलो. त्या खोलीत यूट्यूब व्हिडियो बनवण्यासाठी खूप कॅमेरे, लाईट्स आणि लॅपटॉप होते.

आम्ही भेटलो त्याच्या आदल्या दिवशीच मार्टिन आपल्या 16 साथीदारांसोबत तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. तरीही त्याची मुद्रा शांत होती.

तो सांगत होता, "आम्ही खरंच निर्दोष आहोत आणि कोर्टाच्या या निकालाचे आमच्या खटल्याच्या पलिकडे, ऑस्ट्रियाच्या पलिकडे अधिक व्यापक असे पडसाद पडतील, अशी आशा मला आहे. या निकालामुळे GIच्या पुनर्वसनासाठी मदत होईल, असं मला वाटतं."

GI ही संघटना स्वतःला वर्णद्वेषी नसल्याचं सांगते. स्वतः मार्टिनही अगदी तरुण वयात नाझीवादी विचारसरणीने प्रभावित होता. तेव्हा तू स्वतः वर्णद्वेषी नाही का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याच्या उत्तरात ठामपणा नव्हता. तो म्हणाला, "मी वर्णद्वेषी असल्याचं मला वाटत नाही. कारण हा खूप गोंधळून टाकणारा शब्द आहे. मी स्वतःला पुराणमतवादी देशभक्त म्हणेन."

यावर्षीच्या सुरुवातीला बंदी येण्याआधी तो एकदा लंडनला गेला होता. त्यावेळी एका रिपोर्टरनं त्याचं गुप्तपणे चित्रिकरण केलं होतं. त्यात तो वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह विधान करत असल्याचं समोर आलं होतं. त्याबद्दल सांगताना मार्टिन म्हणतो, "मला खरंच वाटलं होतं की 'पाकी' हा अगदी सामान्यपणे वापरण्यात येणारा शब्द आहे. मला माहिती असतं तर मी नक्कीच त्याचा उच्चार केला नसता."

मार्टिन सेलनर

मात्र तू नेहमी लंडनला जातो आणि तरीही हा आक्षेपार्ह शब्द असल्याचं तुला माहिती नव्हतं, हे विश्वास बसण्याजोगं नाही, असं म्हणताच त्यानं पुन्हा तेच स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, "या शब्दामुळे मी कुणाचा अपमान केला असेल तर मी खरंच माफी मागतो आणि पुन्हा हा शब्द उच्चारणार नाही."

सामाजिक एकोप्याच्या कार्यक्रमांना GI नेहमीच लक्ष्य करत असते. मार्टिन म्हणतो, "अशा कार्यक्रमांवर माझा विश्वास नाही. मुस्लिमांनी युरोपिय संस्कृतीशी एकरुप होण्यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. एकरुप होणं म्हणजे तो देश, ते राष्ट्र, त्याचा इतिहास या सर्वांशी एकरुप होणं. नाहीतर तो देशद्रोह ठरेल. तसं केलं नाही तर याचा अर्थ तुम्ही इथल्या समाजाचा विश्वासघात करत आहात. हा समाज तुम्हाला खुल्या हातानं देतोय, तुम्हाला सामावून घेतोय तर तुमच्या हिताच्या आधी तुम्ही इथल्या समाजाच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे."

मार्टिन आणि त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ मुस्लीमच नाही तर ज्यू लोकांबद्दलही द्वेष असल्याचं फॅसिझमविरोधी कार्यकर्ते जेरोम ट्रेबिंग सांगतात.

खेडापाड्यांमध्ये GI बैठका घेते. ट्रेबिंग सांगतात, "या बैठकांमध्ये GIचे कार्यकर्ते केवळ मुस्लिमच नाही तर ज्यूसुद्धा इथल्या भूमिपुत्रांविरोधात असल्याचं म्हणतात."

मात्र ज्यूबद्दल आपल्या मनात कुठलाही पूर्वग्रह नाही, असं मार्टिनचं म्हणणं आहे. ही चळवळ त्याला युरोपातल्या इतर देशातही विस्तारायची आहे. ब्रिटनमध्ये जाण्याला बंदी असल्याने आपला संदेश तो प्रत्यक्ष जाऊन पोहचवू शकत नसला तरी तो ऑनलाईन खूप अॅक्टिव्ह आहे. केवळ फेसबुकने त्याच्यावर बंदी घातली आहे. मात्र मुख्य युरोपात त्याचा आक्रमक आणि चिथावणीखोर मुस्लीम विरोध बिनदिक्कतपणे सुरू आहे.

मार्टिन सेलनर

फोटो स्रोत, Sean Gallup

GIच्या या प्रक्षोभक कारवायांची झळ बेसिमालाही बसली आहे. विएन्ना विद्यापीठात निर्वासितांचं जे नाटक GIने उधळून लावलं त्यात तिनेही भाग घेतला होता. व्यासपीठावर तिच्यासोबत तिचा मुलगा मोहम्मदही होता.

त्या घटनेमुळे मोहम्मद पुरता घाबरल्याचं ती सांगते. "तो घरातून बाहेर पडत नाही. घरातच राहतो. मी बाहेर पडलो तर माझं काही बरंबाईट होईल, अशी भीती त्याला वाटते."

मोहम्मदचं इराकमध्ये अपहरण करण्यात आलं होतं. त्यामुळे तिनं आपल्या तीन मुलांसह इराक सोडलं. दोनवर्षांपूर्वी ती विएन्नामध्ये आली. तेव्हा तिला वाटलं होतं तिचं खुल्या दिलानं स्वागत झालं आहे.

मात्र आता देशात स्थलांतरितांबद्दलच मत बदलत असल्याचं तिला जाणवतं. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "मला वाटलं होतं मला इथे आनंद आणि शांती मिळाली आहे. मात्र आता ही जागाही सुरक्षित राहिली नसल्याचं मला जाणवतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)