You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाचं लोटांगण; दिल्ली कसोटी जिंकत भारताची मालिकेत 2-0 आघाडी
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर करंडकातील दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय मिळवला. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने खणखणीत चौकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसरी कसोटी जिंकत भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
सामन्यात 10 विकेट्स आणि 26 धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाच्या 263 धावांसमोर खेळताना भारताने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 61/1 अशी मजल मारली होती. पाहुण्याचं पारडं जड होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी मात्र रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीसमोर ऑस्ट्रेलियाने 52 धावांत 9 विकेट्स गमावल्या.
फिरकीला पोषक खेळपट्टीवर स्वीपचा फटका खेळत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आत्मघातकी मार्ग अवलंबला. रवीचंद्रन अश्विनने ट्रॅव्हिस हेडला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. हेडने दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात आक्रमक खेळ केला होता. अश्विनच्या फिरकीचं कोडं अनुभवी स्टीव्हन स्मिथला उलगडलं नाही. त्याने 9 धावा केल्या. रवींद्र जडेजाने मार्नस लबूशेनला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. फिरकीचा आत्मविश्वासाने सामना करणाऱ्या लबूशेन माघारी गेल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या.
डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला लागल्याने काँकशन सबस्टिट्यूट म्हणून संधी मिळालेल्या मॅट रेनशॉला या डावातही मोठी खेळी करता आली नाही. अश्विनने त्याला पायचीत पकडलं. फिरकीविरुद्ध उत्तम बचावासह खेळणाऱ्या पीटर हँड्सकॉम्बला रवींद्र जडेजाने कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडलं. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा कर्णधार पॅट कमिन्सचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि तो त्रिफळाचीत झाला.
नॅथन लॉयन, अलेक्स कॅरे, मॅथ्यू कुन्हेमन या तळाच्या फलंदाजांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावांतच गडगडला. रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 विकेट्स पटकावल्या. अश्विनने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
अवघड अशा खेळपट्टीवर 115 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारताला पहिला धक्का के.एल.राहुलच्या रुपात बसला. लॉयनने त्याला बाद केलं. कर्णधार रोहित शर्माने या खेळपट्टीवर कसं खेळावं याचा वस्तुपाठ सादर करत खेळी साकारली. पण चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला. त्याने 31 धावा केल्या.
विराट कोहली-चेतेश्वर पुजारा जोडीने भारताला विजयाच्या दिशेने नेलं. टॉड मर्फीने कोहलीला बाद केलं तर पाठोपाठ लॉयनने श्रेयस अय्यरला तंबूत धाडलं. श्रीकर भरतने पुजाराला साथ देत ऑस्ट्रेलियाला चमत्काराची कोणतीही संधी दिली नाही. पुजाराने नाबाद 31 तर भरतने नाबाद 23 धावा केल्या.
ख्वाजा-हँड्सकॉम्ब चमकले
उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 263 धावांची मजल मारली. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येची आवश्यकता होती पण भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे त्यांना अडीचशे धावांचाच टप्पा ओलांडता आला.
ख्वाजाने 12 चौकार आणि एका षटकारासह 81 धावांची खेळी केली. हँड्सकॉम्बने 9 चौकारांसह 72 धावा केल्या. भारतातर्फे मोहम्मद शमीने 4 तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
अक्षरची एकाकी झुंज
नॅथन लॉयनच्या फिरकीसमोर आघाडीच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर अक्षर पटेलने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रवीचंद्रन अश्विनने 37 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
अक्षरच्या खेळीच्या बळावर भारताने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला एका धावेची आघाडी मिळाली. लॉयनने 67 धावांत 5 विकेट्स पटकावल्या. मॅथ्यू कुन्हेमन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेडची आक्रमक सुरुवात
डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाल्याने सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या दिवसअखेर वेगवान पद्धतीने खेळायला सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत हेडने नाबाद 39 धावा करत भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली. ऑस्ट्रेलियाची बढत जेवढी वाढेल तेवढ्या भारतीय संघासमोर समस्या होत्या पण तिसऱ्या दिवशी अश्विन-जडेजासमोर ऑस्ट्रेलियाने शरणागतीच पत्करली. स्वीपचा फटका मारणं त्यांच्या अंगलट आलं.
विराट कोहलीच्या 25000 धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत विराट कोहलीने कारकीर्दीत 25,000 धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा सगळ्यात वेगवान पूर्ण करण्याचा मान कोहलीने पटकावला. कोहलीने 549व्या सामन्यात हा टप्पा गाठला.
सचिन तेंडुलकरच्या नावावर 577 सामन्यात 34,437 धावा आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)