अमित शाह म्हणतात, 'धोका देणाऱ्यांना सोडायचं नसतं' #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
1. धोका देणाऱ्यांना सोडायचं नसतं- अमित शाह
"निवडणुका एकत्रित लढविल्या. फलकावर आपल्यापेक्षाही मोठ्या आकारामध्ये नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मागितली. मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिवसैनिकांशी द्रोह केला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने त्यांना सत्य कळले असेल," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून शनिवारी टीका केली.
"राज्यातील सर्व जागा युतीला मिळतील असा संकल्प करताना धोका देतात त्यांना कधी सोडायचं नाही," अशी टिप्पणी करत शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने 'मोदी @ 20' या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकात प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांच्या 20 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
2. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून राज्यांना जीएसटीची थकबाकी मिळाली, महाराष्ट्राला सर्वाधिक रक्कम
जीएसटी परिषदेने राज्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासूनची थकबाकी राज्यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेची बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यांची पाच वर्षांची थकबाकीची रक्कम, जीएसटीची भरपाई राज्यांना देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार, केंद्र सरकार राज्यांना 16,982 कोटी रुपये देणार आहे. जीएसटी परिषदेने हा निर्णय घेतला आहे दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक सह इतर अनेक राज्यांच्या जीएसटीच्या भरपाईची माहिती यावेळी देण्यात आली. तर काकवी, पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी कमी होणार आहे तर इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहे. टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.
गुटखा, पान मसाला याविषयी मंत्री परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. आता क्षमता आधारित कर आकारणी करण्यात येणार आहे. त्याविषयीची मंजुरी देण्यात आली आहे. जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचा अहवाल स्वीकारण्यात आला आहे. पण राज्यांच्या अपेक्षा आणि शिफारशीनुसार यामध्ये बदल करण्यात येणार आहे.
3. आयोगाच्या निर्णयानंतरही ठाकरे गटाच्या पक्षाकडून कोट्यवधीचा पक्षनिधी ट्रान्सफर
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर काही तासात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याच बरोबर राज्यभरातून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. काल (18 फेब्रुवारी) कलानगर येथे उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याचवेळी शिवसेनेचा कोट्यवधी रुपयांचा पक्षनिधी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
सत्तासंघर्षातील सुनावणीत निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याविरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने ठाकरे गडाकडून पक्षाचा निधी ट्रान्सफर करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यासाठी बँकेत नवे खाते उघडण्यात आले आणि त्यावर कोट्यवधीचा पक्षनिधी ट्रान्सफर करण्यात आला आहे.
शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यास ते पक्षनिधीवर देखील दावा करू शकतील, यामुळेच हा निधी अगोदरच वळवण्यात आलाचे समजते. दरम्यान हा पक्षनिधी नेमका किती कोटींचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.
4. तुम्ही मुख्य आरोपींना अटक कधी करणार? मुंबई हायकोर्टाने ईडीला सुनावले
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या संजय राऊत जामिनावर आहेत. त्यांच्या जामिनाला आवाहन देण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीलाच धारेवर धरल्याची माहिती मिळाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अद्यापही मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यावरून कोर्टाने ईडीला जाब विचारला आहे. तुम्ही मुख्य आरोपींना अटक करणार आहात की नाही? ते पोलीस कोठडीत नसून न्यायालयीन कोठडीत आहेत. तुम्हाला आरोपीला अंडरट्रायल कैदी म्हणून ठेवायचे आहे का आणि तुम्ही मुख्य आरोपाीला अटक का करत नाही असा प्रश्न ईडीला कोर्टाने विचारला.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
5. एकोणीस वर्षीय मुलीला किस करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षांची शिक्षा
मुंबईत वांद्रे स्टेशनवर एका मुलीचं ओठावर चुंबन करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुुनावण्यात आली आहे. अशोक कनोजिया असं या आरोपीचं नाव आहे. अवघ्या अडीच महिन्यात या खटल्याचा निकाल लागला आहे. अशोक कनोजिया असं या आरोपीचं नाव आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
या शिक्षेबरोबरच त्याला 5000 रुपये दंड आणि नुकसानभरपाई म्हणून पीडितेला 3000 रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
9 जून 2022 ला ही घटना घडली होती. पीडित तरुणी चर्चगेटला जात होती. खार स्टेशनऐवजी वांद्रे स्टेशनला उतरली. तेव्हा अशोक या 35 वर्षीय व्यक्तीने तिला मानेला धरून तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























