बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की, तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...

1. एअर इंडिया-बोईंग-एअरबस करार : 470 विमानांच्या खरेदी कराराचं महत्त्व काय?

एअर इंडियाने मंगळवारी बोईंग आणि एअरबस विमान निर्मात्या कंपन्यांसोबत एक ऐतिहासिक करार केला आहे.

या कराराअंतर्गत एकूण 470 विमानांची खरेदी केली जाणार आहे. या करारामुळे आशियासह, अमेरिका आणि युरोपमध्येही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

हा जगातील सर्वांत मोठा विमान खरेदी करार असून या माध्यमातून भारताच्या विमान वाहतूक उद्योगाने उंच उड्डाण घेतलं आहे.

हा करार भू-राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत संतुलित असल्याचं विमान वाहतूक उद्योगातील तज्ज्ञ कपिल काक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, "या करारामधून अर्धी विमाने अमेरिकेतून आणि अर्धी फ्रान्सकडून घेतली जात आहेत. ही भू-राजकीय समतोल साधणारी कृती आहे. यामधून भारत किती मोठी खरेदी करत आहे, असा संदेश जगाला दिला जात आहे."

2. एम सी स्टॅन : इन्स्टा आणि यूट्यूबवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेला हा पुणेकर रॅपर नेमका कोण आहे?

रॅपर एम सी स्टॅन बिग बॉस-16 चा विजेता ठरला. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉस 16 चा महाअंतिम सोहळा रंगला होता.

शिव आणि स्टॅन या दोन मित्रांमध्ये जेतेपदाच्या करंडकासाठी चुरस होती. अखेर सूत्रसंचालक सलमान खानने स्टॅन विजेता ठरल्याचं जाहीर केलं.

19 आठवड्यानंतर स्टॅनने जेतेपदावर नाव कोरलं आहे. जेतेपदासाठी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नाव चर्चेत होतं. पण व्होटिंगमध्ये स्टॅनला अधिक मतं मिळाली.

3. 'या' मुंग्या 'वास' घेऊन कॅन्सर शोधू शकतात...

प्राण्यांची, किटकांची घ्राणेंद्रियं तीक्ष्ण असतात हे तुम्हाला माहिती असेलच. पण काही मुंग्या चक्क त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर कर्करोगाचं निदान करू शकतील असं तुम्हाला सांगितलं तर...?

पण यादिशेने खरंच संशोधनाची पावलं पडली आहेत. या मुंग्याची गोष्ट आपण येथे पाहाणार आहोत.

सध्या मुंग्यांना उंदरांमधील कर्करोग ओळखता येईल इतपत संशोधन झालं आहे.

या संशोधनातील प्रमुख संशोधक-लेखक बाप्टिस्ट पिकरेट सांगतात, "उंदरांच्या लघवीचा वास घेऊन त्यांना कॅन्सर झाला आहे का हे ओळखण्यासाठी मुंग्यांना फक्त 10 मिनिटांचं प्रशिक्षण पुरेसं आहे."

4. अमेरिका-चीन : उपग्रहांच्या काळात सर्वेक्षणासाठी फुगा का वापरतात?

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि अमेरिकेला वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय.

त्यांनी नंतर तो लक्ष्य करून पाडला. तेव्हापासून अमेरिका आणि चीनमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला.

5. स्मृती मंधानासाठी बंगळुरूने केला खजिना रिता; 3.4 कोटींची बोली

'विमेन्स प्रीमिअर लीग' अर्थात महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत झाला.

भारतात महिला क्रिकेट 1976 पासून खेळलं जात आहे. 2008 पासून पुरुषांची आयपीएल स्पर्धा होत आहे. यंदापासून वूमन्स प्रीमिअर लीगची सुरुवात होत आहे.

या स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटी रुपये देऊ केले आहेत.

वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेसाठीच्या लिलावात स्मृती मन्धानासाठी बंगळुरु संघाने खजिना रिता केला. बंगळुरु संघाने 3.4 कोटी रुपये खर्चत स्मृतीला ताफ्यात समाविष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)