सुकीरथरणी : तामिळ कवयित्रीने अदानी प्रायोजित पुरस्कार नाकारला, म्हणाल्या...

    • Author, दिव्या जयराज
    • Role, बीबीसी तामिळ
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

न्यू इंडियन एक्स्प्रेस समूहातर्फे दिला जाणारा देवी पुरस्कार तामिळ कवयित्री सुकीरथरणी यांना जाहीर झाला होता. मात्र अदानी समूह या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक असल्याने सुकीरथरणी यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

देशभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना न्यू इंडियन एक्स्प्रेस समुहातर्फे दरवर्षी 'देवी सन्मान' देऊन सन्मानित करण्यात येतं.

यावर्षी या पुरस्कारासाठी 12 महिलांची निवड करण्यात आली होती. या बारा महिलांमध्ये तामिळनाडूतील कवयित्री सुकीरथरणी यांचाही समावेश आहे. त्यांनी साहित्यात विशेषत: दलित साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

मात्र हा पुरस्कार सोहळा होण्याआधीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तो न स्वीकारण्याची घोषणा केली.

सुकीरथरणी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहितात की, "अदानी समूह या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. ज्या ग्रुपला अदानी समूहाकडून आर्थिक मदत मिळते असा कोणताही पुरस्कार स्वीकारण्यात मला रस नाही. मी नेहमीच अशा मुद्द्यांवर बोलत आले आहे त्यामुळे मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही."

सुकीरथरणी मागील 25 वर्षांपासून तमिळ साहित्यात सक्रिय आहेत.

महिलांचे अधिकार असतील किंवा समाजातील पीडित लोक असतील, सुकीरथरणी यांनी वेळोवेळी आपली लेखणी समाजातील दुर्बल घटकांसाठी चालवली आहे. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे.

सुकीरथरणी यांनी या संपूर्ण प्रकरणावर बीबीसी तामिळशी खास चर्चा केली.

'तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालाय याची माहिती कधी मिळाली आणि कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी तुम्ही तो न घेण्याचा निर्णय का घेतला?'

- माझ्यावर लहानपणापासूनच पेरियार, आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव राहिला आहे. माझ्या लिखाणात तुम्हाला या तिघांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसेल. 23 डिसेंबरला पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मला ग्रुपकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी मला अधिकृत मेल पाठवला.

पुरस्कार स्वीकारणार होते पण...

सुरुवातीला मला खूप आनंद झाला. मी नास्तिक असल्याने देवीच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराबद्दल मी थोडी साशंकच होते. पण हा स्त्रीशक्तीचा सन्मान असल्याचं काहींनी मला सांगितलं आणि मग 28 डिसेंबर रोजी मी हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचं त्यांना सांगितलं.

यानंतर असं काय घडलं की तुम्ही पुरस्कार स्वीकारणार नसल्याची घोषणा केली?

- मी पुरस्कार स्वीकारणार असल्याचं सांगताच हिंडनबर्ग रिपोर्ट समोर आला. हा पुरस्कार सोहळा आठ फेब्रुवारीला पार पडणार होता. न्यू इंडियन एक्स्प्रेस ग्रुपने यासंबंधीचे प्रोमो व्हीडिओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. तीन फेब्रुवारीला मी जेव्हा तो प्रोमो पाहिला तेव्हा त्यावर मला अदानी समूहाचा लोगो दिसला.

हा पुरस्कार अदानी समूहाशी संबंधित असल्याने सुकीर्तराणी यांना आश्चर्य वाटलं.

त्या पुढे सांगतात, "त्यानंतर मी न्यू इंडियन एक्स्प्रेस समूहाला विचारलं की या कार्यक्रमात अदानी समूहाची भूमिका नेमकी काय आहे. त्यावर त्यांचं उत्तर आलं की, ते मुख्य प्रायोजक आहेत. त्यानंतर मी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं ठरवलं.

मला वाटतं की, आपण कुठल्याही स्तरावर असलो तरी आपण आपल्या नैतिक मूल्यांशी तडजोड करता कामा नये. मी ज्यापद्धतीने राजकारण आणि सिद्धांताबद्दल बोलते, त्यानुसार तर मी अदानी समुहाकडून दिला जाणार पुरस्कार न घेणं योग्य आहे. आणि त्यांना माझी ही गोष्ट पटली."

मग हिंडनबर्ग रिपोर्टमुळे तुम्ही हा पुरस्कार नाकारला की काही वेगळं कारण देखील आहे?

- हिंडनबर्गने अदानी समूहाच्या कामकाजावर गंभीर आरोप केलेत. अशा आरोपांमुळे कंपनीवर टीकाही होते. मी भ्रष्टाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या वापरावर पुष्कळ लिखाण केलंय.

त्यामुळे मी असा पुरस्कार कसा काय स्वीकारेन. हे बरोबर दिसलं नसतं. आणि हे केवळ अदानी समूहाशी संबंधित नाहीये तर दुसरी एखादी कंपनी असती तरी मी नकारच दिला असता. सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग सीएसआर वर खर्च करतात.

या सीएसआरच्या पैशातून ग्रामीण भागात अनेक शाळा चालवल्या जातात. आणि आम्हीही या गोष्टी नाकारत नाही. पण भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर तो पुरस्कार स्वीकारणं योग्य नव्हतं.

पुरस्कार न स्वीकारण्याची खंत वाटली का?

अजिबात नाही, माझ्या निर्णयावर मी ठाम होते. तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळ, दलित आणि आंबेडकरी चळवळींचा जास्त प्रभाव आहे, त्याला मोठा वारसा लाभलाय. हा वारसाच अशा निर्णयांना बळ देतो. माझं लेखन पुरस्कार मिळवण्यासाठी नसून ते लोकांसाठी आहे. लोक ते वाचतात एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.

पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तर घेतला नाही ना ?

- तसं अजिबात नाहीये. जगप्रसिद्ध प्रकाशन असलेल्या 'वर्सो बुक्स'ने साहित्य विश्वातील गेल्या चार हजार वर्षांतील प्रभावशाली महिला लेखिकांची यादी तयार केली आहे. त्यातील टॉप 200 लेखिकांमध्ये माझं नाव आहे. कन्नड, मल्याळम, तेलुगु, गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी, मलेशियन आणि अगदी जर्मन भाषेतही माझ्या कवितांचे अनुवाद करण्यात आलेत. पुरस्कार न स्वीकारून मला प्रसिद्धी मिळेल असं मला कधी वाटलंच नाही.

सुकीरथरणी यांना भलेही असं काही वाटलं नसेल पण हा पुरस्कार न स्वीकारण्याच्या घोषणेनंतर त्यांना केवळ तामिळ साहित्यिकांचेच नव्हे तर देशभरातील साहित्यिकांचे फोन आले.

सुकीरथरणी सांगतात, "सिद्धांत आणि विचारधारा जर योग्य वेळी मांडता आली तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होते."

साहित्यातील योगदान

सुकीरथरणी तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यातील लालपेट सरकारी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तमिळ साहित्याव्यतिरिक्त त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स ही पदवी मिळवली आहे.

आतापर्यंत त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यात काइपट्टी येन कनवु केल, इरावु मिरुगम, कामत्तिपू, थीनदापदाथा मुथम, अवलई मोजिपेयार्थल आणि इप्पडिक्कु येवल यांचा समावेश आहे.

त्यांच्या बऱ्याच कविता तामिळनाडूच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

त्यांच्या लेखनात जातीभेद, अत्याचारासोबतच स्त्री देहावरही चर्चा करण्यात आली आहे. त्या सांगतात, स्त्री देहामुळे अनेकजणी शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात आणि यात दलित महिलांचं प्रमाण जास्त आहे.

दुसरीकडे न्यू इंडियन एक्स्प्रेस समूहाचा हा पुरस्कार सोहळा 8 फेब्रुवारीला चेन्नईच्या आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये पार पडला.

यात शास्त्रज्ञ गगनदीप कांग, भरतनाट्यम नृत्यांगना प्रियदर्शिनी गोविंद, सामाजिक कार्यकर्त्या राधिका संथानकृष्णा आणि स्क्वॅशपटू जोश्ना चिनप्पा यांच्यासह इतर 11 जणींचा गौरव करण्यात आला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)