You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कायद्याचा अभ्यास करूनच सरकार स्थापन केलं, सुप्रीम कोर्टात आपणच जिंकणार - देवेंद्र फडणवीस #5मोठ्या बातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. कायद्याचा अभ्यास करूनच सरकार स्थापन केलं, सुप्रीम कोर्टात आपणच जिंकणार - देवेंद्र फडणवीस
"आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजूने निकाल लागेल," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले, "सध्या महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालं आहे, ते सरकार खुद्दारांचं आहे. 2019 मध्ये स्थापन झालेलं सरकार गद्दारांचं होतं."
फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीचे नेते रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले 10-15 आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे." ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार - प्रकाश आंबेडकर
आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार असून आपण कधीही मॅजिक करु शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
आंबेडकर यांनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीत सहभागी होण्याची आपली इच्छा नाही, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आधी काँग्रेस राष्ट्रवादीलाच इशारा दिला होता. मात्र, आता त्यांनी मविआत सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. यासंदर्भात निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.
सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असताना त्यामध्ये आंबेडकर यांनी आणखी एक धक्का त्यांना दिला.
आपण या निवडणुकीत राहुल कलाटेंच्याच बाजूने राहणार आहोत, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
3. विद्यार्थिनींना स्वयंसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे
समग्र शिक्षणाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 हजार 259 उच्च प्राथमिक आणि 1 हजार 279 माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांमधील सहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाअंतर्गत स्वयंसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
हे प्रशिक्षण 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचनाही शिक्षण विभागाने दिली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांचे आयुक्त यांना यासंदर्भात पत्र पाठवून सूचना केली. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. आरआरआरचं स्टिव्हन स्पीलबर्गकडून कौतुक
एस. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटाचं कौतुक जगभरात अजूनही सुरू आहे.
RRR चित्रपटाला नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्काने सन्मानित करण्यात आलं होतं. आता अमेरिकेतील सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांनीही 'आरआरआर' चित्रपटाचं कौतुक केलं.
ते म्हणाले, "तुमचा चित्रपट अप्रतिम आहे. आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी हा चित्रपट पाहिला नव्हता. पण, गेल्या आठवड्यात मी तो पाहिला. आणि मला तो खूप आवडला. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. इतका छान हा चित्रपट आहे. तुमच्या चित्रपटातील दृश्यही फार सुंदर होती." ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. मृत सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबीयांना सव्वादोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई
नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. या इंजिननिअरच्या कुटुंबियांना 2 कोटी 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई शनिवारी लोक न्यायालयात देण्यात आली. मृत तरुणाचे वय, पगार, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांची संख्या या आधारावर भरपाई दिली आहे. जिल्हा लोक न्यायालयात मोटार अपघातांच्या प्रकरणात ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरपाई ठरली आहे.
शैलेंद्रसिंह गणसिंग राजपूत (वय 38, मुळ रा. एरंडोल) यांचा मार्च 2022 मध्ये पुण्यातील डांगे चौकात अपघात झाला. शैलेंद्रसिंह त्यांच्या दुचाकीस ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. शैलेंद्रसिंह हे पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते.
या अपघातामुळे त्यांची पत्नी, दोन मुले व वृद्ध आई-वडील यांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबीयांनी नुकसान भरपाईसाठी अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. ही बातमी दिव्य मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)