आसाम : बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत शेकडो जणांना अटक, महिलांची निदर्शनं

आसाम

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बालविवाहाला रोखण्यासाठी पती, नातेवाईक आणि लग्न लावून देणाऱ्या धर्मगुरूंना अटक करण्याचा धडाका आसाममध्ये सुरू आहे. आसाम सरकारने उचललेल्या या पावलानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक जण याविरोधात निदर्शनं करत आहेत.

सरकारने बालविवाहाविरोधात युद्ध पुकारल्याचे जाहीर केलं आहे. आतापर्यंत शुक्रवारपासून आसामममध्ये 2,400 जणांना अटक केली आहे.

हा प्रकार केवळ 'फार्स' असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे, मुस्लीम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी हे केलं जात आहे.

भारतात 18 वर्षं पूर्ण होईपर्यंत मुलीचं लग्न लावणे गुन्हा आहे, पण भारतातल्या अनेक भागात 18 वर्षांखालील मुलींची लग्न होताना दिसतात.

सरकारी आकडेवारीनुसार 10 पैकी किमान 2 मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आतच लावलं जातं.

हिमंत बिस्व सरमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिमंत बिस्व सरमा

महिलांचं लग्नाचं वय 18 वरून वाढवून 21 वर्षं व्हावे यासाठी संसदेत कायद्याचा विचार केला जात आहे, पण अद्याप हा कायदा मंजूर झालेला नाही.

मुस्लीम समुदायात मुस्लीम पर्सनल लॉनुसार लग्नं लावली जातात. या कायद्यानुसार मुलीला पौगंडावस्था प्राप्त झाल्यानंतर लग्न लावून देण्याची तरतूद आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि मुस्लीम मुलींचं लग्नाचं किमान वय देशातील इतर समुदायातील मुलींप्रमाणे करावं अशी विनंती केली आहे.

भारतीय जनता पक्षानेही वेळोवेळी मुस्लीम वैयक्तिक कायदा रद्द करून देशात युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी केली आहे. आसाममध्ये भाजपचंच सरकार आहे आणि हेमंत बिस्वा सर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत.

अटकसत्रानंतर महिलांच्या मनात थरकाप

शुक्रवारपासून आसाममध्ये अटकांचे सत्र सुरू आहे. अटकेनंतर पीडित महिला त्यांच्या इतर महिला नातेवाईकांसोबत पोलीस स्थानकाबाहेर निदर्शनं करत आहेत.

आसाम

फोटो स्रोत, Getty Images

अनेक महिला सांगत आहेत की त्यांच्या घरातील पुरुषांना अटक केल्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरुषांवर त्या पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आपली स्थिती हलाखीची बनली असल्याचे त्या सांगत आहे.

मी माझ्या मुलाला आता कसं सांभाळू, असं एका महिलेनी इंडियन एक्स्प्रेसला म्हटलं आहे.

माझे पती हे शेतात काम करतात, मी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे, असं एका दुसऱ्या महिलेनी म्हटलं आहे.

आपलं फक्त प्राथमिक शिक्षण झालं असून कायदेशीर मदत कुठून घ्यायची हे सुद्धा आपल्याला माहीत नसल्याचं त्या महिलेनं म्हटलं आहे.

अश्रुधुराचा वापर

धुब्रीमध्ये पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

14 वर्षांखालील मुलींशी लग्न करणाऱ्याविरोधात आसाम पोलिसांनी पॉस्को लावले आहे. पॉस्कोअंतर्गत शिक्षा झाल्यास सात वर्षांपासून ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आणि त्यात जामीनही मिळत नाही.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 14 ते 18 वयोगटातील मुलींशी लग्न करणाऱ्या किंवा लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच 1 लाखांचा दंड त्यांना लागू शकतो.

सर्मा यांनी सांगितले की आतापर्यंत 8,100 जणांच्या नावे तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणांबाबत कुठलीही सहानुभूती दाखवू नका, असं आपण पोलिसांना सांगितलं असल्याचं सर्मा म्हणाले.

भविष्यात अनेक मुलींना बालविवाहापासून वाचवायचं असेल तर आपल्या पिढीला त्याची किमंत मोजावी लागेल असं त्यांनी ही मोहीम सुरू होण्याआधी म्हटलं होतं.

सरकार हे सामान्य माणसाचं आयुष्य खडतर बनवत आहे, असं विरोधी पक्षातील नेते म्हणत आहेत.

तृणमूलचे नेते रिपून बोरा यांनी या मोहीमेवर टीका केली आहे. सरकार कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बालविवाह प्रतिबंध कायद्याविरोधातील मोहीम 2026 पर्यंत सुरू राहील, असं हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. 2026 मध्ये आसामची विधानसभा निवडणूक आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)