You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंचा टोला, 'नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात' - राज ठाकरे
अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या प्रयोगाचे सादरीकरण रविवारी (6 नोव्हेंबर) मुंबईत पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे हे फ्री असतील असा लोकांचा समज होऊ शकतो, असे ते आपल्या खुमासदार शैलीत म्हणाले.
ते म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबत असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात. या कार्यक्रमाला आज मी येणारच नव्हतो. पण प्रशांत यांच्यासाठी आलो. नाहीतर उगाच लोकांना वाटायचं की हे एकावर एक फ्री मिळतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबतच असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात."
यावेळी राज ठाकरे यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचं कौतुल केलं. ते म्हणाले, "प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील खूप वेळ नाटकांसाठी दिला आहे. सरासरी तीन तासांचं नाटक असतं. 12 हजार 500 प्रयोग झाले म्हणजे दामले 37 हजार म्हणजे ते 1562 दिवस रंगमंचावर आहेत. एवढी वर्षं स्वत:बाबत कुतहल कायम ठेवणं ही सोपी गोष्ट नाही." एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
"मराठी माणूस नाटक वेडा आहे. परंतु आपल्याकडे कलाकरांचा आदर केला जात नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
2. माझ्या बापाला मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध का घेतला नाही? - पूनम महाजन
जागर मुंबईचा या कार्यक्रमाअंतर्गत भाजपाची नुकतीच एक जाहीर सभा मुंबईत बीकेसी मैदानावर पार पाडली. या सभेत खासदार पूनम महाजन यांनी धक्कादायक वक्तव्य केलं.
पूनम महाजन म्हणाल्या, "माझ्या बापाला कोणी मारले हे मला माहिती आहे. या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण होता? तुम्ही सत्तेत असताना याचा शोध का घेतला नाही?" असे प्रश्न पूनम महाजन यांनी भर सभेत उपस्थित केले आहेत.
त्या पुढे असंही म्हणाल्या, "मला माहिती आहे माझ्या बापाला कोणी मारले. त्यामागे मास्टरमाईंड कोण होतं? तुमचं सरकार असताना माझे वडील गेले, तेव्हा तुम्ही मास्टरमाईंड शोधून दाखवला नाही." झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
26 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी पूर्णा इमारतीतल्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. दरम्यान भाजपचे नेते आणि प्रमोद महाजनांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान 3 मे रोजी प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला.
आता 16 वर्षांनंतर पूनम महाजन यांनी या प्रकरणावर जाहीर सभेत प्रश्न उपस्थित केले आहेत.
3. राहुल गांधीची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात दाखल होणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला दोन महिने पूर्ण होत असून ही यात्रा आजपासून (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल होत आहे.
तेलंगानानंतर सोमवारी (7 नोव्हेंबर) भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून सुरू होत आहे. तेलंगणाच्या सीमेवर देगलूर शहरात संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात येणार आहे.
या यात्रेत राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याचं नांदेड जिल्ह्यातील स्वागत नियोजनाचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
यासाठी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते एकत्र आले आहेत. तसंच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
ही यात्रा नांदेडमध्ये चार दिवस, हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात दाखल होईल.
यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
4. 'गुजरात निवडणूक न लढवण्यासाठी भाजपाची ऑफर', अरविंद केजरीवाल यांचा दावा
'गुजरात निवडणूक लढू नका त्याबदल्यात दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावरील केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी थांबवण्यात येईल,' अशी ऑफर आम आदमी पार्टीला दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
एनडीटीव्ही न्यूज चॅनेलच्या टाऊनहॉल कार्यक्रमात अरविंद केजरीवाल म्हणाले, "मनीष शिसोदिया यांनी आप सोडून दिल्लीत मुख्यमंत्री बनण्याच्या त्यांचा (भाजपा) प्रस्ताव अमान्य केला. आता त्यांनी मला संपर्क केला आहे. ते म्हणाले जर तुम्ही गुजरात सोडून दिलं असतं आणि तिथे निवडणूक लढवली नसती तर आम्ही सत्येंद्र आणि शिसोदिया दोघांना सोडून देतो आणि त्यांच्यावरील आरोपही मागे घेतो."
हा प्रस्ताव कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, "मी माझ्या जवळच्या कोणाचं नाव कसं घेऊ शकतो. प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून आला आहे. ते (भाजपा) कधीही थेट संपर्क करत नाही. ते कोणाच्यातरी माध्यमातून पोहचतात."
भाजपाना अरविंद केजरीवाल यांचा दावा फेटाळला आहे. हा दावा खोटा असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
भाजपाचे प्रवक्ते सैय्यद जफर इस्लाम यांनी म्हटलं, "हा आरोप लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि भाजपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी केवळ एक वक्तव्य. आहे. केजरीवाल यांनी दिल्ली आणि देशातील इतर लोकांची दिशाभूल केली आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा वापर केला आणि नंतर त्यांना सोडून दिलं."
5. कुंकुसाठी आग्रही असणारे मराठी शाळांसाठी का नाही? - चिन्मयी सुमित
टिकली किंवा कुंकु लावा असे सांगणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मातृभाषेसाठी आग्रह का धरत नाहीत असा प्रश्न अभिनेत्री आणि 'मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत' अभियानाच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केला आहे.
मराठी शाळांचे प्रश्न, पटसंख्या, बंद होणाऱ्या शाळा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
यावेळी चिन्मयी सुमित म्हणाल्या, मी मराठी शाळेत शिकले. माझ्या मुलांनाही मराठी शाळेत शिकवले. सरकार दरबारी मराठी शाळांचे प्रश्न मांडताना मला विविध बाबी समोर दिसू लागल्या आहेत. संकेतस्थळ आणि नोकऱ्यांसाठी विविध अर्ज मराठी भाषेतून उपलब्ध झाल्यास मराठीचे महत्त्व अधोरेखित होईल अशीही चर्चा यावेळी करण्यात आली.
हे वाचलंत का?
- कॉम्रेड कृष्णा देसाई हत्या प्रकरण, ज्यामुळे शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेवर निवडून गेला
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुस्लिमांबद्दलची भूमिका बदलत आहे का?
- उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे दसरा मेळावा : गर्दी जमली होती की जमवली होती?
- उद्धव ठाकरेंचा टोला, '40 डोक्यांच्या रावणामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवलं गेलं'
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)