You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'प्लाझ्मा म्हणून मोसंबीचा ज्यूस चढवला,' डेंग्यू रुग्णाचा मृत्यू
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झालाय. डेंग्यूच्या रुग्णाला प्लाझ्माऐवजी मोसंबीचा ज्यूस दिल्याचा आरोप या रुग्णालयावर होतोय.
प्रयागराजमध्ये ग्लोबल हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर नावाचं खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात एका डेंग्यू झालेल्या रुग्णाला ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.
या रुग्णाला प्लाझ्माऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
यासंबंधीचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल होतोय. यात एक व्यक्ती सांगतोय की त्याच्या हातात असलेल्या रक्ताच्या पाकीटात मोसंबीचा ज्यूस आहे. त्याने यावर प्रश्न उपस्थित केलेत.
चौकशीचे आदेश
हा व्हीव्डिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तसंच मीडियामध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, हे खासगी रुग्णालय सील करण्याचे आदेश दिलेत. तसंच रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "प्रयागराज जिल्ह्यातील झाल्वा येथील ग्लोबल हॉस्पिटलचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस दिल्याचं दिसतंय. या व्हीडिओची गंभीर दखल घेत रुग्णालय तात्काळ सील करण्यात आलंय. तसंच त्या प्लेटलेट्सचं पॅकेट चाचणीसाठी पाठवण्यात आलंय. यात रुग्णालय दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल."
तसंच मुख्य वैद्यकीय अधिकार्यांसोबत एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्याचंही ब्रजेश पाठक यांनी सांगितलंय. काही तासांत अहवाल सादर करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
प्रदीप कुमार यांना 17 ऑक्टोबर रोजी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डेंग्यूचं निदान झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र दोन दिवसांतचं त्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा एखाद्या रुग्णाला डेंग्यू होतो तेव्हा त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात. त्याची कमतरता भरून निघावी म्हणून त्याला प्लाझ्मा चढवला जातो.
प्लेटलेट्स चढवताना रिऍक्शन आली
पण प्रदीप कुमारला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. प्लाझ्मा घट्ट आणि पिवळ्या रंगाचा असतो आणि मोसंबीचा ज्यूस सुद्धा त्याच रंगाचा असतो.
त्यामुळे प्लाझ्माच्या बॉटलमध्ये ज्यूस होता का? आणि जर तो होता तर हा हलगर्जीपणा कसा काय झाला याची चौकशी सुरू आहे.
आयजी राकेश सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "या सगळ्या घटनेनंतर चौकशीसाठी एका तपास पथकाची स्थापना करण्यात आलीय. तसेच काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलंय."
त्यांनी पुढे सांगितलं की, "त्या पॅकेट मध्ये मोसंबीचा ज्यूस होता की नाही याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाहीये. मागच्या काही दिवसांपूर्वी एक बनावट ब्लड बँक सुद्धा पकडण्यात आलीय."
रुग्णालयाचे मालक सौरभ मिश्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "प्रदीप कुमार यांच्या प्लेटलेट्स 17 हजारांवर आल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना प्लेटलेट्स घेऊन यायला सांगितलं होतं."
"त्यांच्या नातेवाईकांनी एसआरएन हॉस्पिटलमधून पाच युनिट प्लेटलेट्स आणले. त्यानंतर हे प्लेटलेट्स रुग्णाला चढवले तेव्हा रिऍक्शन यायला लागली. मग आम्ही ते प्लेटलेट्स चढवणं बंद केलं."
आता हे प्लेटलेट्स त्यांनी कुठून आणले याची चौकशी करायला हवी. कारण त्यावर एसआरएन हॉस्पिटलचं स्टिकर दिसतंय, अशी माहिती सौरभ मिश्रा यांनी दिली. पण एसआरएन रुग्णालयाकडून यासंदर्भात कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)